नामदार गोखले-चरित्र 8
विहंगावलोकन
ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन होऊन आज दहा वर्षे लोटली. या अवधीत आणखी कित्येक लोकाग्रणी दिवंगत झाले. त्यांतल्या एकाचे चरित्र-वाङमय महाराष्ट्रामध्ये बरेच बाहेर पडले, परंतु गोखल्यांचे विस्तृत व ज्यामध्ये त्यांच्या अनेकविध कर्तृत्वासंबंधी संकलित माहिती दिलेली आहे, असे एकही चरित्र आजवर प्रसिध्द झाले नव्हते. गोखल्यांची महाराष्ट्रीयांनी लिहिलेली इंग्रजी, मराठी दोन्ही मिळून चार संक्षिप्त चरित्रे उपलब्ध आहेत. त्यांमध्ये चरित्रनायकांच्या चरित्राची रूपरेषा पाहावयास सापडते. याच लहान लहान पुस्तकांनी इतके दिवस जिज्ञासूंचे समाधान केले आहे. मराठीप्रमाणेच अन्य प्रांतात व अन्य भाषांमध्ये गोखल्यांची बरीच चरित्रे आहेत. ज्या वर्षी गोखले इहलोक सोडून गेले त्या वर्षातच यांतल्या पुष्कळ चरित्रपुस्तकांचा अवतार झाला असून त्यांच्याच खपानुसार आवृत्त्या निघाल्याची उदाहरणे आहेत. परंतु त्यापेक्षा जास्त मोठया प्रमाणावर या बाबतीत झालेला पहिला प्रयत्न म्हणजे रा. साने यांनी लिहिलेले प्रस्तुत चरित्र होय. रा. साने यांचे याविषयी अभिनंदन करणे अशक्य आहेच, पण त्यापेक्षा जास्त अभिनंदनाला खरोखर या पुस्तकाचे प्रकाशक रा. ताम्हनकर हेच पात्र होत, असे एकंदर परिस्थिती लक्षात घेतल्यास प्रत्येकाला कबूल करावे लागेल. त्यांनी मनावर घेतले नसते तर हे चरित्र इतक्या लवकर प्रसिध्दीस येण्याचा संभव नव्हता.
या चरित्रासंबंधात पहिली ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट ती ही की, आजवर इतके विस्तृत चरित्र मराठीत झालेले नाही. टिळकांची लहानमोठी बरीच चरित्रे असल्याने त्यांची बाजू समजण्याचे साधन लोकांपुढे आहे. गोखल्यांच्या चरित्राची बाजू समजण्याचे साधन उपलब्ध नव्हते. ही उणीव काही अंशी रा. साने यांनी काढून काढली आहे व त्याबद्दल सत्यान्वेषी तरुण पिढीकडून त्यांना नि:संशय धन्यवाद मिळतील. प्रयत्नशील पुरुष चिकाटीच्या उद्योगाने उत्कर्षाच्या किती उंचीवर जाऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण जर कोणते असेल तर ते गोखले यांचेच एक आहे. कोणी म्हणतात गोखल्यांच्या आंगी असामान्य बुध्दिमत्ता नव्हती. कोणी दुसरे एखादे न्यून दाखवून त्यांची महती कमी करता आल्यास पाहतात. पण ही न्यूनेच गोखल्यांच्या चरित्राचे महत्त्व सिध्द करणारी आहेत हे निंदकांच्या ध्यानात राहत नाही. सामान्य बुध्दिमत्तेचे गोखले केवळ अविश्रांत उद्योगाच्या जोरावर असामान्य बुध्दिमंतांना कर्तबगारीने थक्क करू लागले, ही गोष्ट स्फूर्तिदायक नाही असे कोण म्हणेल? निरलस यत्नाच्या बळाने सामान्यतवाची सरहद्द ओलांडून ज्या पुरुषाने असामान्यत्वाच्या क्षेत्रातले अत्युच्च स्थान पादाक्रांत केले, त्यांचा कित्ता गिरवावा अशी प्रेरणा कोणाला होणार नाही? अलौकिक बुध्दिमत्ता, विख्यात कुळ, अपार धनसंचय ही सुध्दा मोठेपणाला नेऊन पोचविणारी साधने आहेत, परुंत ती दैवयत्ता असल्यामुळे ज्यांना ती जन्मत: प्राप्त झाली असतील, त्याचे चरित्र अनुकरणाच्या दृष्टीेन आटोक्याबाहेरचे वाटल्यास नवल नाही. गोखल्यांच्या चरित्राची मातब्बरी या दृष्टीने विशेष आहे. देशहिताची तळमळ असल्यास सामान्य बुध्दी, दारिद्य वगैरे विघ्ने माणसाच्या कर्तृत्वाला बाधा करू शकत नाहीत, हे गोखल्यांच्या चरित्राचे रहस्य आहे. या रहस्याचा तरुण जनतेच्या मनानप ठसा उत्पन्न करणारे जेवढे वाङमय उत्पन्न होईल तेवढे थोडेच ठरेल.