नामदार गोखले-चरित्र 15
जन्म, बालपण आणि शिक्षण
शुध्द बीजा पोटी । फळे रसाळ गोमटी
- तुकाराम.
रत्नागिरी जिल्हा हा अन्वर्थक आहे. खरोखरच त्याने अनेक रत्ने गेल्या शतकांत आपणास दिली. न्या. रानडे, लो. टिळक, भारत- सेवक गोखले, गणित - विशारद प्रिं. परांजपे, कर्मवीर कर्वे यांच्यासारखे सर्व महाराष्ट्रास किंबहूना हिंदुस्थानास ललामभूत झालेले थोर पुरुष आपणांस रत्नागिरीनेच दिले. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी कोतळूक मुक्कामी झाला. सत्यभामाबाई या वेळेस माहेरी बाळंतपणासाठी गेल्या होत्या. माहेरी दोन-तीन महिने झाल्यावर बाळबाळंतीण ताह्मनमळयास आली. तेथे दोन-तीन महिने सत्यभामाबाई होत्या. कोकणांतील निसर्गाच्या मांड़ीवर गोपाळ खेळत होता-लोळत होता. कोकणच्या हवेचा शुध्दपणा त्याच्या रोमारोमात भरला होता. कोकणातील डोंगरांची भव्यता त्याच्या अजाण हृदयावर परिणाम करीत होती. आई आपल्या तान्ह्या बाळासह लवकरच कागलास आपल्या पतीकडे आली.
गोपाळचा वडील भाऊ गोविंद. तो शाळेत जात असे. गोपाळही मोठा झाल्यावर शाळेत जाऊ लागला. त्याच्या बुध्दिमत्तेच्या गोष्टी ऐकिवात नाहीत. परंतु त्याच्या मनाची प्रामाणिकता तेव्हाही होती. एके दिवशी गुरुजींनी घराहून गणित करून आणण्यास सांगितले होते. वर्गात फक्त गोपाळाचे गणित बरोबर! गुरुजींनी त्यास शाबासकी दिली. परंतु काय? गोपाळ ओक्साबोक्शी रडू लागला. आनंद व सुख होण्याऐवजी गोपाळाचे डोळे पाण्याने भरले? गुरुजी बुचकळयात पडले आणि मुले चकित झाली. 'गोपाळ तू का रडतोस?' गुरुजींनी विचारले. 'माझे गणित बरोबर असले तरी ते मी स्वत: सोडविले नाही. मी ते दुस-यांच्या मदतीने केले. मला पहिला नंबर नको.' गोपाळाच्या मनाला सत्य प्यार वाटे. रानडे हेही याप्रमाणेच सत्यप्रिय होते. मनाचा हाच सूक्ष्म तराजू गोपाळजवळ मरेपर्यंत होता. पुढे पुढे तर तो जास्तच सूक्ष्म झाला. दुसरी एक गोष्ट आहे ती खेळतांना झाली. आटयापाटयांचा खेळ रंगात आला होता. गोविंद व गोपाळ विरुध्द होते. गोविंद गोपाळास म्हणतो, 'गोपाळ, मला सोडून दे. मला धरू नको.' 'छे भाऊ, असे कसे म्हणतोस? मी पाहिजे तर खेळ सोडून जातो. परंतु खोटे करून माझ्या बाजूच्या गडयांचे मी नुकसान करणार नाही.' लहानपणीचा खरे बोलणारा गोपाळ मरेपर्यंत तसाच होता. 'जे गुण बाळा, ते जन्म काळा' म्हणतात ते यथार्थ आहे. या प्रकारे कागलास मनाची व शरीराची प्राथमिक तयारी- पहिला विकास चालू होता.
गोपाळ दहा वर्षांचा होईपर्यंत कागलासच होता. त्याचे मराठी शिक्षण येथेच झाले. मराठी शिक्षणानंतर त्यास वडील भावासह कोल्हापुरास इंग्रजी शिकण्यासाठी पाठविण्यात आले. 'गोविंद गोपाळ हे दोघे बंधु' एकमेकांवर फार प्रेम करीत. त्यांचा इंग्रजीचा अभ्यास जोराने चालला होता. या वेळेस लोकहितवादी किंवा रानडे यांच्या वेळी असणारा इंग्रजीविरुध्द कटाक्ष नव्हता. आता जगात पुढे येण्यास इंग्रजीची फार जरूर होती. मुसलमानी अमदानीत ब्राह्मण जसे फारसी पंडित होऊन मोठमोठया सन्मान्य नौकया पटकावीत त्याप्रमाणे मोठया पगाराची जागा मिळण्यासाठी आता इंग्रजीशिवाय गत्यंतर नव्हते. गोविंद गोपाळ सुट्टीत वगैरे घरी जात असत.