नामदार गोखले-चरित्र 12
उपोदघात
"Hope, faith and charity-these are the three graces. We must all cultivate, and if we keep them ever in mind and hold steadily by them we may be sure that we may still regain our last position and become a potent factor in the world's history."
M. G. RANADE
१८९४, Madras
कोणतीही परिस्थिती फार वेळ टिकत नसते. काळ हा बहुरुपी आहे. तो क्षणात उग्र रूप धारण करितो तर क्षणात फुलाप्रमाणे हसतो. काही राष्ट्रे अवनतीच्या खोल दरीत लोटून देतो तर दुसरी राष्ट्रे उन्नतीच्या उत्तुंग शिखरांवर चढवितो. त्याचा हा नेहमीचा खेळ आहे. त्याची ही लीला अगम्य व अगाध आहे. त्याची स्वत:ची एकरूपता असली तरी त्यास इतरांची पाहवत नाही. कोणतीही वस्तू एकाच स्थितीत ठेवणे हे त्याच्या जीवावर येते. लोकांस रडविणे वा खुलविणे, दोन्ही कामात त्यास सारखाच आनंद वाटतो; दोन्हगी कृत्यांत तो रमतो. परंतु काळ हा स्वत: निर्विकार असला, त्याला सुखदु:ख वाटत नसले तरी राष्ट्रांची स्थिती तशी नाही. राष्ट्रे सुखदु:खातीत नसून तदधीनच असतात. जे राष्ट्र पदतली तुडविले जाते ते दु:खाचे सुस्कारे सोडीत असते. आपली खाली झालेली मान पुन: वर कधी येईल, सध्या ज्या हालअपेष्टा आपण निमूटपणे भोगीत आहो, जे अपमान गिळून बसत आहो, त्या सर्वांचे परिमार्जन होऊन आपली नैसर्गिक योग्यता कशी प्राप्त होईल या विचारात जित राष्ट्र गुंग होऊन जाते. परंतु जेत्या राष्ट्राची गोष्ट निराळी असते. जित राष्ट्राला निर्जीव कसे करता येईल, त्याची धुगधुगी साफ मारता कशी येईल, त्याची वरखाली होणारी नांगी कशी मोडता येईल, त्याचे विषारी दात पाडून निर्विष सर्पाप्रमाणे गतमद होत्साते आपल्या कह्यात ते अखंड कसे राहील या प्रश्नाकडे जेत्या राष्ट्राचे मुत्सद्दी लक्ष घालून असतात. काळ हा कलिपुरुष आहे. अशा जित-जेत्यांच्या लढाया लावण्यात त्यास मौज वाटते; या कामात तो तरबेज असतो. या लढायांत ज्याची धमक अधिक, धैर्य अप्रतिहत, स्वार्थत्याग दांडगा व इच्छा दुर्दमनीय, प्रयत्न अखंड व न मरणारी आशा, त्यासच विजयश्री माळ घालते.