नामदार गोखले-चरित्र 62
कर्झन साहेबांच्या एकंदर धोरणाचे त्यांनी खालील वाक्यांत यथार्थ स्वरूप दाखविले आहे. 'Let us cripple them once and all, so that they shall be incapable ever of rising.' सरकार संशयपिशाचाने कसे भारले गेले आहे, हिंदुस्तानातील लोक आज राजनिष्ठ दिसले तरी पुढे मागे कदाचित ते अराजनिष्ठ होतील या भीतीने त्यांस आताच तारेच्या कुंपणात अडकवून टाकणे बरे ही सरकारची सैतानी व सुलतानी वृत्ती कशी उघड होते याचे गोखल्यांनी यथार्थ वर्णन केले. मुलगा मोठा झाल्यावर आपणास नीट वागविणार नाही या भीतीने लहानपणीच मुलाचे हातपाय कापून टाकण्यासारखे हे सरकारचे कृत्य आहे. परंतु या कृत्याने लोक पुढे अराजनिष्ठ होण्या-या ऐवजी आजच असंतोषाने धुमसू लागतील. पुढे मुलाने आपणास चांगले वागवावे अशी बापाची इच्छा असेल तर बापाने त्या मुलाचे खरे कल्याण केले पाहिजे. त्याला उत्तम शिक्षण दिले पाहिजे. त्यास पोटास मिळविण्यास शिकविले पाहिजे. त्याप्रमाणेच सरकारनेही जर प्रजेची निष्ठा सरकारास पाहिजे असेल तर प्रजेस सुशिक्षित केले पाहिजे, तिचे खरे खरे कल्याण केले पाहिजे, पोटापाण्यास प्रजेस मिळते की नाही आणि पुढे मिळेल की नाही इकडे लक्ष पुरविले पाहिजे, तरच प्रजा दुवा देते. सरकारची विश्वासवृत्ती डळमळली आहे; तरी वेळीच सावध होऊन हिंदुस्तानातील चालत आलेल्या कारभारास योग्य अशी कलाटणी द्या; असे गोखल्यांनी सर्वत्र सुचविले. त्यांनी जेथे जेथे व्याख्याने दिली तेथे तेथे त्यांनी हिदुस्तानचा चित्रपट मोठा हृदयद्रावक रंगविला. कर्झन साहेबांची कारकीर्द म्हणजे व्याख्यानाला विषयांची तूट नाहीच. परंतु त्याशिवायही हिंदुस्तानातील वाढते दारिद्रय, शेतक-यांची कंगाल स्थिती वारंवार पडणारे दुष्काळ, अज्ञानांधकारात लोळणा-या शेकडा नव्याण्णव अगर जास्त लोकांच नोकरीत मज्जाव, या सर्व वृत्तांताने त्यांनी श्रोत्यांची मने थरारून सोडली. आक्टोबर ९ रोजी त्यांनी लंडनमध्ये 'हिंदूच्या दृष्टीने हिंदुस्तानचा कारभार'या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यानात हिंदुस्तानातील सध्या बेजबाबदारपणे चालणा-या पध्दतीचे वर्णन करून लष्काराकडे होणारा अपरंपार खर्च शिक्षणाकडे, उद्योगधंद्याकडे खर्च केला तर किती चांगली होईल याचे त्यांनी चित्र काढले. हिंदुस्तानातील अनेक जातींमुळे लोकांस राज्यकारभार करिता येणार नाही या चिरंतन आरोपाचा त्यांनी या भाषणात इन्कार केला. वसाहतीच्या दर्जाचे स्वराज्य आपणास पाहिजे, निदान ताबडतोब तरी काही हक्क दिले पाहिजेत आणि ते हक्क कोणते हेही त्यांनी उघड सांगितले. १५ नोव्हेंबर १९०५ रोजी सर हेन्री कॉटन यांच्या अध्यक्षतेखाली गोपाळरावांनी लंडन शहरी आणखी एक व्याख्यान दिले. सुशिक्षित लोकांची सर्वत्र निराशा होत असल्यामुळे देशात असंतोष अधिकाधिक पसरणार असा भावी धोका जो होता तो त्यांनी दाखवून दिला. पन्नास दिवसात गोपाळरावांनी पंचेचाळीस ठिकाणी भाषणे केली, कोठे निबंध वाचले, कोठे वर्तमानपत्रात लेख लिहिले, कोठे मुलाखती दिल्या, कोठे नवीन पुढा-यांशी विचारविनिमय केला. त्यांनी स्वत:च्या देहाला विश्रांती अशी दिलीच नाही. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर दिसून येऊ लागला. ते अशक्त आणि थकल्याभागल्यासारखे दिसू लागले.
गोपाळरावांवर या वर्षीच्या कामगिरीचे ओझे किती होते याची कल्पना वाचकांस आली असेल. परंतु आणखीही फार महत्त्वाची कामगिरी त्यांचे देशबंधू त्यांच्यावर लादीत होते. बनारस येथे भरणा-या राष्ट्रीय सभेस गोपाळरावच अध्यक्ष पाहिजेत असे तेथील स्वागत कमिटीने इतरांच्या मतानुसार ठरविले. गोपाळरावांनी नापसंती दर्शविली. मी अद्याप लहान आहे; माझ्याहून लायक लोक पुष्कळ आहेत आणि माझी प्रकृती पण नादुरुस्त आहे असे त्यांनी कळविले. परंतु छे:, गोखलेच अध्यक्ष पाहिजेत असे लोकांनी ठरविले. आपल्या देशबांधवांचा आपल्यावरील लोभ पाहून गोपाळरावांस आनंदाचे भरते आले! १८९७ सालच्या काँग्रेसमध्ये गोखल्यांसंबंधी निंदाव्यंजक ठराव येण्याचे घाटत होते. पण आठ वर्षांत केवढा फरक पडला! १९०५ मध्ये ते राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष निवडले गेले. ते हिंदुस्तानात येण्यास निघाले. परंतु इंग्लंडातील भाषणांनी त्यांचा घसा दुखू लागला होता. बोटीवर असताना तो सुजला. यामुळे बोटीवर असताच घशावर शस्त्रक्रिया करावी लागली पुढे प्रकृती बरी होत चालली. ते मुंबईस आले, तेव्हा लोकांनी त्यांचा जयजयकार केला. त्यांच्या इंग्लंडमधील नि:स्वार्थ व निरपेक्ष सेवेस तर मोलच नव्हते. त्यांनी प्रकृतीचीही काळजी केली नाही. देशासाठी असा अविरत प्रयत्न करणारा सुपुत्र परत आपल्यात आलेला पाहून कोणास धन्य वाटणार नाही? त्याच्या उदाहरणाने, पवित्र दर्शनाने, कोणास कर्तव्यस्फूर्ती होणार नाही? अशाच पवित्र व उदात्त प्रसंगांनी लोकांस कर्तव्यक्षम होता येते. पुण्यास जेथे त्यांनी शिक्षणविषयक कामगिरी केली, जेथे त्यांनी राजकारणाचे धडे घेतले, जेथे त्यांची सहकारी, मित्र आणि राजकारणातील प्रतिपक्षीही होते अशा पुण्यपावन त्यांचे फार थाटाचे स्वागत झाले. महाराष्ट्रास वंदनीय झालेले डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली त्यांस मानपत्र अर्पण करण्यात आले. या समारंभात टिळकांनी प्रामुख्याने भाग घेतला होता. विलायतेत किंवा इतर देशांत अशा प्रकारच्या चळवळी केल्यामुळे कसे फायदे आहेत व या कामाची कशी जरूरी आहे हे त्यांनी आपल्या भाषणात दिग्दर्शित केले.
गोपाळरावांस विश्रांती घेण्यास सवड नव्हतीच. राष्ट्रीय सभेचे ते नियोजित अध्यक्ष होते. त्यांस आपले भाषण तयार करावयाचे होते. ते कलकत्त्यास गेले. बंगालची परिस्थिती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. तेथील पुढा-यांशी विचारविनिमय केला आणि तदनंतर आपले भाषण लिहून काढले. भाषण लिहून काढल्यानंतर ते पुढा-यांसह बनारसला गेले.