नामदार गोखले-चरित्र 25
कोणाच्या डोळयांतून टिपे गळणार नाहीत? कोणाचे हृदय फाटणार नाही? तत्त्वासाठी सर्व सहन करणारे बुध्दिप्रधान टिळक, पण तेही रडले. टिळक बुध्दिप्रधान, तर्ककठोर; आगरकर जरी बुध्दिप्रधान, तर्कप्रधान असले तरी त्यांच्या हृदयात ओलावा जास्त दिसे. टिळकांच्या हृदयात जर आपण डोकावू लागलो तर प्रथम ज्ञानाचे बुध्दीचे खडक लागावयाचे आणि त्यांच्यावर आपण आदळावयाचे. परंतु एकादा खंबीर गडी जर हे फत्तर फोडून खाली पाहील तर त्यास सात्त्वि व कोमल वृत्तीचा झुळझुळ झरा तेथे वाहत असलेला आढळेल. आगरकरांच्या अंत:करणात बुध्दीच्या दरीतून प्रेमगंगा वाहत होती किंवा प्रेमाच्या दरीतून बुध्दिगंगा वाहत होती; यामुळे दोन्ही गोष्टी आपणांस ताबडतोब दिसत. आगरकरांच्या मृत्यूने टिळकांची बुध्दी फोडून त्यांच्या अंतरंगाचा ठाव घेतला आणि ही हृदयपाताळातील गंगा नयनांमध्ये दिसून आली. दोघे झगडले तरी तत्त्वासाठी झगडले. त्यांनी एकेमकांवर घुसून एकमेकास जखमी केले तरी ते स्वार्थासाठी नव्हे तर स्वत:ला प्राणाहून प्रिय वाटणा-या विचारांच्या संरक्षणासाठी. त्यामुळे प्रेम हे थोडेच सुकून जणार? प्रेम आहे असे त्यास दाखवावयाचे नसते; ते त्यांच्या अंतरी मात्र असते. रामतीर्थांनी आपल्या एका पत्रात लिहिले आहे : ''आपले म्हणणे असे असेल की, बाह्य व्यवहारलोकोपचार यथास्थित रीतीने न पाळल्यास त्यामुळे प्रेमात कमतरता येते, तर हे म्हणणे मला बिलकुल पसंत पडत नाही.'' ''बाह्य सन्मानात किंवा व्यवहारात काही न्यूनता किंवा अपूर्णता राहत असली तर तेवढयाने आपणावरून माझे मन उडाले आहे, अशा प्रकारचे अनुमान बांधू नये.'' ''प्रेम हा आंतरिक संबंध आहे, मग तो वरवर आपणास न का दिसेना.'' हेच उद्गार टिळक आणि आगरकर यांच्या बाबतीत आम्हांस आठवतात. इतर सर्वांपेक्षा टिळकांचेच आगरकरांवर प्रेम होते आणि ते खरे शुध्द, सात्त्वि व नि:स्वार्थी प्रेम होते; असो.
आगरकरांच्या मृत्यूने गोपाळराव गोखले फार खचले. परंतु कार्य तडीस नेणे हे पहिले कर्तव्य असल्यामुळे शोकावेग गिळून नवीन माणसे पडलेले काम उचलावयास मिळविण्यासाठी त्यांस खटपट करावी लागली. आगरकरांची जागा शेल्वीसाहेबांचे पट्टशिष्य गोविंद चिमणाजी भाटे यांस संस्थेत आणून त्यांनी भरून काढली. वासुदेवराव केळकरांची जागा योग्य रितीने त्यांस लवकर भरून काढता आली नाही. परंतु पुढे एक वर्षाने कराचीच्या कॉलेजातील नाणावलेले प्रो. वैजनाथ काशिनाथ राजवाडे हे फर्ग्युसन कॉलेजात मिळाले. याप्रकारे चिपळूणकरांपासून प्राप्त झालेले लोण गोखल्यांनी पुढे चालू केले, आता ते फक्त इतिहास व अर्थशास्त्र या विषयांचेच प्रोफेसर राहिले. आणि या विषयातच त्यांनी अलौकिक प्राविण्य संपादन केले. ते त्यास कसे प्राप्त झाले हे आता आपण पाहू या.