नामदार गोखले-चरित्र 45
कौन्सिलातील कामगिरी
या वर्षाच्या अखेरीस ते मध्यभागातर्फे कौन्सिलमध्ये निवडून आले. त्यांच्या अभिनंदनार्थ पुण्यास हिराबागेत समारंभ झाला होता. डॉ. भाण्डारकर आणि गंगाराम भाऊ म्हस्के यांनी गोखल्यांची स्तुती व गौरव केला. समारंभास गोखल्यांचे गुरू रानडे हेही हजर होते. गोखले हे जात्याच विनयशील आणि नम्र. भाषणाच्या अखेरीस ते म्हणाले : “न्या. मू. रानडयांनी मला हाताशी धरिले. त्यांच्या चरणाशी बसून शिकण्याची संधी मला मिळाली; म्हणूनच आज मला ही स्थिती प्राप्त झाली आहे.” केवढी ही गुरुभक्ती! अलीकडे अशा प्रकारचे गुरुशिष्यसंबंध फारसे आढळत नाहीत.
१९०० पासून आपल्या मृत्यूपर्यंत गोपाळराव हे प्रांतिक नाही तर वरिष्ठ- कोणत्या ना कोणत्या तरी कौन्सिलचे सभासद होतेच. या वर्षीच्या पहिल्याच भाषणात त्यांनी दुष्काळपीडितांची कष्टप्रद कथा निवेदन केली. सरकारचे त्यासंबंधी कर्तव्य काय तेही सुचविले. सर्व विधाने आकडे देऊन सशास्त्र सिध्द केली होती. अंमलदार कर कसा जुलुमाने वसूल करतात, ज्या अंमलदाराकडून कर वसूल केला जात नाही त्याला कसा दपटशा देण्यात येतो, हे खानदेश वगैरे जिल्ह्यातील प्रत्यक्ष प्रमाणांनी त्यांने सिध्द केले. या वर्षी सूट दिली तर ती पुढील वर्षी वसूल करण्यात येते आणि अशा तऱ्हेने शेतक-यांच्या माना या परंपरागत बाकीने आवळल्या जातात असे सांगून गोखले म्हणतात : In the present situation of our peasantry, it is necessary to give many of them a fresh start in life without placing the mile-stone of arrears round their necks. सरकारचे म्हणणे असे की एक वर्ष जर दुष्काळाचे तर दुसरे सुबत्तेचे असले पाहिजे आणि दक्षिणेत पिकांची सरासरी काढून कर ठरविण्यात आल्यामुळे सूट अगर तगाई देण्याची जरुरच नाही. या विधानांची विफलता आणि त्यांतील फोलपणा त्यांनी पटवून दिला. शेतक-याने कर्ज काढून कर देऊ नये या शब्दाची 'कर्जाने तो जर निरंतर बांधला जाणार असेल' अशी खानदेशच्या कलेक्टरांनी केलेली ओढाताण त्यांनी पुढे मांडली. सातारा जिल्ह्यात तालुक्यातील तलाठी वगैरे लोकांस बाकीसह वसूल जमा न केल्याबद्दल दंडही ठोठावण्यात आले. या सर्व प्रकारांची चवकशी होऊन दुष्काळग्रस्त प्रजेस अल्प तरी सुख देऊन तिचा दुवा घ्यावा, असे त्यांनी कळकळीने विनविले.
गोपाळरावास इंग्लंडमध्ये गेल्यापासून वाटे की, दादाभाईंप्रमाणे आपणही इंग्लंडमध्ये राहूनच काम करावे, पार्लमेंटचा सभासद व्हावे, देशहिताची चळवळ करावी; परंतु न्या. रानडे म्हणावयाचे : 'तुम्ही तिकडे जाऊन इकडील कामे कोण करणार? येथे कौन्सिलमध्ये कोण झगडणार? सरकारचा नैतिक अध:पात कोण दाखवून देणार? लोकांस राजकीय विचार करावयास कोण शिकविणार? अस्पृश्यांचा उध्दार कोणी करावयाचा? दारूचा आळा कसा घालावयाचा? शिक्षण कसे वाढावयाचे? मृत्यूसंख्या वाढत आहे तिला आळा कसा पडावा? आरोग्य कसे सुधारेल? शेती कशी वाढेल? कर कसे कमी होतील? उद्योगधंद्यास हातभार कसा लावता येईल? आपसातील तंटेबखेडे मोडून एकी कशी घडवून आणता येईल. प्रेम, सलोखा कसा वाढेल? कामांचे डोंगर इकडे पडले असता इंग्लंडात जाऊन काय करणार? पाया भरावयाचे काम आधी करा. सध्या येथेच राबावयाचे तुमचे काम आहे. तुमच्यासारखी सर्वस्व देणारी माणसे पाहिजे आहेत. आम्ही नोकरदार; आम्ही किती करणार? रानडयांच्या या उपदेशाचा गोपाळरावांवर फार परिणाम होई. या कामासाठी यंदा त्यास कौन्सिलमध्ये जाऊन काम करावे लागले.