नामदार गोखले-चरित्र 34
जुनी सभा सोडून नवीन सभा स्थापण्यास आता रानडेपक्षाचे लोक कारणे शोधू लागले आणि ज्या नावांनी हिंदुस्थानच्या राजकीय चळवळीत खळबळ उडविली ती नावे जन्मास आली. टिळकपक्ष हा जहाल पक्ष आहे; आमचा पक्ष नेमस्त पक्ष आहे; दोघांचे जमणे अशक्य, म्हणून हा सवता सुभा आम्हांस काढणे भाग आहे असे या रानडेपक्षाच्या लोकंनी जाहीर केले. आजपर्यंत नेमस्तपश्राचा वरचष्मा होता तेव्हा अल्पसंख्याक पक्षाने आत्मघातकी, पक्षभेदाची चळवळ केली नाही. एका घरात भांडणे असू देत. जो मताने अधिक त्याचे खरे ठरेल. परंतु निरनिराळी घरे बांधून भांडणे म्हणजे सरकारास आपल्यातील भिन्नता आणि विरोध दाखविण्यासारखे आहे. परंतु आपलेच शेवटास नेऊ पाहणारे जे हे नेमस्त बंधू त्यांनी मात्र आता निराळी सभा स्थापण्याचे ठरविले, आणि १८९५ च्या नोव्हेंबर महिन्यात डेक्कन सभा स्थापन केली. आपले महत्त्व कमी होणार असे दिसताक्षणीच हे नवीन अपत्य निर्माण करणा-या रानडयांवर टिळकांनी 'हा म्हातारचळ की पोरखेळ?' हा अग्रलेख लिहून खरपूस टीका केली. नेहमी मिळते घ्यावयास खरोखर टिळकच तयार असत, परंतु ते बहुमत लाथाडीत नसत. आजपर्यंतच्या राष्ट्रीय सभा जरी नेमस्तांनीच भरविल्या तरी राष्ट्रीय सभेचा महाराष्ट्राच्या कानाकोप-यात शिरकाव टिळकांनीच केला. ते असे नाही म्हणाले, की या मवाळ मताच्या काँग्रेसचा आपण पुरस्कार का करावा. ते आपले मताधिक्य वाढविण्याची खटपट करीत होते. ही खटपट प्रत्येक पक्ष करितोच. काँग्रेस म्हणजे काही मवाळास मिळालेली सनद नव्हे. देशामध्ये ज्या वेळेस जे जनमत असेल - जे बहुमत असेल ते सरकारास स्पष्टपणे कळविण्यासाठी काँग्रेसचा जन्म आहे. परंतु बहुमताचा वास ज्यांस सहन होत नाही त्या आमच्या रानडेपक्षीयांनी दुस-या पक्षाचे बहुमत झाले असे पाहताच सवता सुभा स्थापावा आणि राजकारणात नेमस्त आणि जहाल असे पक्ष पाडावे हे अनुचित होय. टिळक म्हणत: “सामाजिक सुधारणेत 'नेमस्त आणि जहाल' असे पक्ष होऊ शकतील; परंतु हिंदुस्तानच्या राजकारणात 'नेमस्त आणि जहाल” हे आपणांस समजत नाही. परकी सरकारच्या लोखंडी रुळाखाली सर्व सारखेच चिरडले जातो आहो. या चरकातून सर्वच चिपाडे होऊन बाहेर पडणार. टिळकपक्ष सरकारास- प्रचलित राज्य पध्दतीत- नामशेष करण्यासाठी झटणार आणि रानडेपक्ष त्याचा उदोउदो थोडाच करणार आहे? ध्येय जर एक आहे तर त्या ध्येयासाठी बहुमताने ज्या वेळेस जो मार्ग ठरेल तो हाती धरावयाचा आणि कामाचा धौशा चालवावयाचा.'' टिळकपक्ष हा जहाल पक्ष आहे असे दाखविण्यासाठी, त्यांनी १८९३ साली सुरू केलेला गणपत्युत्सव आणि १८९५ साली सुरू केलेला शिवाजी-उत्सव ही दोन कारणे रानडे-पक्षीयांनी पुढे केली, परंतु या गोष्टींचा राष्ट्रीय सभेच्या कार्यक्रमाशी काही एक संबंध नव्हता. हे सामाजिक आणि धार्मिक प्रश्न आहेत. लोकांस एकत्र आणण्यास आणि त्यांच्या उत्सवप्रियतेसही पुष्ट करण्यास टिळकांनी हा गजाननोत्सव सुरू केला. राजकीय विघ्नाचे हरण होण्यासाठी या विघ्नहर्त्याचा सार्वजनिक पूजामहोत्सव करण्याची त्यांनी रूढी पाडिली. तेहतीस कोटि देवता असता हिंदू लोक स्वाभिमानरहित होऊन मुसलमानांच्या मोहरमात भाग घेतात, त्यांच्या डोल्यांपुढे नारळ फोडतात. पाणी ओततात. नाके घासतात- हे काय? परकी धर्माबद्दल सहानुभूती मनात बाळगा, परंतु स्वत्वाचा अभिमान सोडू नका. मुसलमान तुमच्या गणपत्युत्सवात विष्णुपूजेत भाग घेतो काय? कधीही नाही. तो जर तुमच्यांत मिसळत नाही तर तुमचे काय अडले आहे त्यांच्यापुढे नाकदु-या काढण्याचे? परस्परांनी परस्परांबद्दल सहानुभूती, सलोखा, प्रेम दाखविले तर रास्त आहे. परंतु एकाने नाक घासावयाचे आणि दुस-याने तर्र असावयाचे हे आम्हांस सहन होत नाही. सत्त्व विसरणा-या लोकांस स्वत:चा फाजील अभिमान बाळगणा-या लोकांजवळ गोडीने वागता येणे शक्य नाही. शेळी आणि वाघ एका वनात राहणे शक्य नाही, दोघे वाघ राहू शकतील. समान दर्जाचे लोक एकत्र राहतील. विषम दर्जाचे लोक संतोषाने गुण्यागोविंदाने राहणे म्हणजे पाणी आणि विस्तव एकत्र राहण्याप्रमाणे आहे. सर्पाशी दर्पानेच वागले पाहिजे. तर तो नमेल. आपण दूध पाजू लागलो आणि आपल्या घरात त्याला ठेविले तर तो विषच वमणार आणि दंश करणार. मानवी स्वभाव असाच आहे. तेव्हा टिळकांनी हिंदूंचे दौर्बल्य जाणून त्यांस मुसलमानांच्या दर्जाला आणण्याचा प्रयत्न केला. मुसलमानांत अभिमान आहे; आपल्यांतही पाहिजे. 'उत्सवप्रियतेमुळे जर मोहरमात तुम्ही भाग घेत असाल तर हा गजाननोत्सव मी सुरू करितो- चला या इकडे' असे टिळकांनी म्हटले म्हणजे टिळक वितुष्ट पाडणारे झाले काय?