नामदार गोखले-चरित्र 59
बंगालची फाळणी व गोखल्यांची विलायतेतील शिष्टाई
१९०४ सालच्या काँग्रेसच्या वेळी बेडरबर्न साहेबांनी मोठया कळकळीने सांगितले होते की, प्रत्येक प्रांताने दोन दोन प्रतिनिधी किंवा एकेक तरी इंग्लंडमध्ये हिंदुस्तानची बाजू मांडण्यासाठी पाठवावा. १९०५ साल उजाडले आणि हिंदुस्तानातही नवीन युग निर्माण झाले. या नवीन युगाचे- नवीन क्रांतीचे सम्यक् स्वरूप लक्षात येण्यासाठी आपण जरा आजूबाजूसही पाहिले पाहिजे.
आशियातील राष्ट्रासंबंधी एकोणिसाव्या शतकात युरोपातील राष्ट्रांची अशी समजूत झाली होती की आशियातील राष्ट्रे म्हणजे निर्माल्यवत्. त्यांच्यावर गो-या लोकांचेच स्वामित्व राहणार. गो-या राष्ट्रांची इभ्रत, त्यांचे शास्त्रीय ज्ञान, त्यांचे व्यापारातील प्रभुत्व आणि या प्रभुत्वामुळे प्राप्त झालेली संपत्ती, या सर्व समन्वयामुळे युरोपातील राष्ट्रांस स्वर्ग चार बोटे राहिला होता. मुसलमान लोकांच्या पूर्वीच्या स्वा-यांचा युरोपातील उन्मत्त राष्ट्रास आता विसर पडला होता. परंतु अशा वेळी त्यांच्या डोळ्यांत चरचरीत अंजन पडले. आशियातील ईशान्य दिशेस असणा-या चिमुकल्या जपानने अवाढव्य रशियाचा पराजय केला. त्याचे आरमार रसातळास नेले. अलौकिक शौर्य, लोकोत्तर धैर्य, प्रचंड व अतुल स्वार्थत्याग, शास्त्रीय ज्ञान आणि विजय मिळविल्यानंतरही केलेले कौतुकास्पद व आदरणीय वर्तन यामुळे जपानकडे सर्व राष्ट्रांचे डोळे वळले. युरोपातील पहिल्या प्रतीच्या राष्ट्रांत त्याचा समावेश झाला. बरोबरीने तह करण्यासाठी अहमहमिका सुरू झाली. युरोपातील मदोन्मत्त हत्तीचा मद या सिंहाच्या छाव्याने हरण केला. जपानची इभ्रत वाढली; आणि त्याबरोबरच आशियातील राष्ट्रांचीही वाढली. आपण प्रयत्न करू तर युरोपातील राष्ट्रांची बरोबरीचशी काय परंतु त्यांच्यावरही ताण करून त्यांचा नूर उतरू अशी धमक या विजयाने आशियातील लोकांच्या मनात उत्पन्न केली. आपणही माणसे आहो, थोरामोठ्यांचे वंशज आहो, मनात आणू, हातपाय हलवू तर पाश्चात्यांस टक्कर देण्यास कमी पडणार नाही हा स्वाभिमान जागृत होऊ लागला. तुर्कस्तान, चीन, इराण या देशात क्रांत्या घडून येऊ लागल्या. राष्ट्रीय पक्ष पुढे येत चालले; तरुणांचे रक्त सळसळू लागले; स्वातंत्र्यवृत्तीचे वारे लोकांत, आशियातील जगात खेळू लागले; या चळवळींचा परिणाम हिंदुस्तानवरही झाल्याविना कसा राहील? मोर्ले साहेबांनी या वेळच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे ते पहा:-
"It was among the students in part of India that unrest especially prevailed. That class was rapidly being drawn into something like spirit of revolt against the British Government, and movement was unmistakably coming to a head, notably in Upper India. A feeling gained ground that the last twenty years had been a period of reaction, and in combative response the idea of complete independence of England began to appeal to youthful imagination. This marked the line of cleavage between moderates and extremists in the native party of reform. It was no question of the terrible military mutiny of half a century ago repeating itself, the danger arose from a mutiny, not of sepoys about greased cartridges, but of educated men armed with modern ideas supplied from the noblest arsenals and proudest trophies of English literature and English oratory. Official persons of high station and responsibility assured the new Viceroy that the political change within the last dozen years was enormous, and though the mass of the people remained ignorant and unmoved, it would be a fatal mistake to suppose that the change was confined to the preachings of political agitators. The fairly educated Indias were thoroughly dissatisfied with the old order of things. The victories of Japan, the revolutionary movements in Turkey, China, Persia did not pass unobserved. A new and ominous suspicion that England had come to a stop in her liberating mission made way,''
मोर्ले साहेबांची घमेंड पहा. ते म्हणतात की, इंग्लंड स्वातंत्र्यदानाच्या व्रतापासून च्युत होत चालले असे हिंदुस्तानातील लोकांस वाटू लागले आहे. जणू अद्यापपावेतो इंग्लंड आपले व्रत चालवीतच होते! कॉलरिज या कवीने १०० वर्षांपूर्वी म्हटले आहे :-