नामदार गोखले-चरित्र 52
या वेळेस हिंदुस्तानची सूत्रे लॉर्ड कर्झन साहेबांच्या हातात होती. एका लेखकाने असे म्हटले आहे की, जर लॉर्ड कर्झनमध्ये आहे त्याच्यापेक्षा कमी घमेंड असती तर ते फारच मोठे गृहस्थ झाले असते. मोठपणाबरोबर थोरपणाही त्यांच्यामध्ये आहे असे जगास दिसले असते. हिंदुस्तानच्या व्हाइसरॉयपदावर केव्हा ना केव्हा तरी अधिष्ठित होईन अशी महत्त्वाकांक्षा बालपणापासून त्यांनी धरिलेली. ती महत्त्वाकांक्षा सफल झाली होती. लहानपणचे मनोहर मनोरे खरोखरच उभारले गेले. कर्झनसाहेबांस धन्य वाटले असेल. तेहतीस कोटी लोकांचा मी अधिकारी, अनेक संस्थानिक माझ्याशी रुंझी घालावयास तयार. हा वैभवशाली देखावा पाहून त्यांना आवेश चढला. मोठमोठे बेत त्यांनी केले होते. निरनिराळे बारा सुधारणाप्रकार त्यांनी जाहीर केले होते. हळूहळू ते पोटातून बाहेर येत होते. आपण म्हणू ते करू आणि जे करू ते शहाणपणाचे, दुस-यास त्यात सुधारणा सुचविण्याची किंवा ढवळाढवळ करण्याची योग्यता अगर अक्कल मुळीच नाही असे त्यांस स्वाभाविक वाटत असे आणि जे काही करावयाचे ते सर्व देशात व्यवस्था राहावी, घडी उसकटू नये म्हणून अशी त्यांची समजूत होती.
अशा या अनाठायी बाणेदारपणा बाळगणा-या गृहस्थासमोर गोखल्यांस जावयाचे होते. कर्झनसाहेबास 'आजपर्यंतच्या सर्व गव्हर्नर जनरलांमध्ये आपण वयाने लहान आहो असा अभिमान वाटे. त्यांचे वय फक्त ४३ वर्षांचे होते! गोखल्यांचे वयही फार नव्हते. ते ३६ वर्षांचे म्हणजे कर्झनसाहेबांपेक्षा सात वर्षांनी लहान होते. कर्झनसाहेबात तडफदारपणा व तरतरीतपणा होता आणि गोखल्यांच्या तोंडावरही विद्वत्तेचे तेज चमकत असे, पाणीदारपणा एकवटलेला दिसे. कर्झन अरेराव व ताठेबाज; गोखले मनमिळावू, नेमस्त परंतु योग्य प्रसंगी भीडभाड न ठेवणारे. कर्झनसाहेबांस एतद्देशीय म्हणजे गो-यांच्या पदकमलासभोवार रुंझी घालणारा वाटे; तर गोखले हे खरे भारतसेवक आपल्या देशास समान दर्जा प्राप्त व्हावा यासाठी अव्याहत झगडणारे. अशा या दोघां वीरांचा कौन्सिलमध्ये मोठा प्रेक्षणीय संग्राम होई.
गोखल्यांची वरिष्ठ कौन्सिलातील सर्वश्रेष्ठ व अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांची अंदाजपत्रकांवरील भाषणे. सरकारचे अंदाजपत्रक वाचण्यात आले की हा आकडेबहाद्दर त्या पत्रकावर अशी काही टीका करी की, सरकारास तोंड उघडता येऊ नये. गोखल्यांचे अंदाजपत्रकावरील पहिले भाषण १९०२ मार्चमध्ये झाले. १८९० च्या सुमारास बजेटात तूट येत असल्यामुळे काही नवीन कर बसविण्यात आलेले होते. मिठावर कर, प्राप्तीकर कर, जमिनीवरील सा-याची वाढ या सर्व गोष्टी करण्यात आल्या होत्या. परंतु अलीकडे दोनतीन वर्षे तूट न येता दरवर्षी भरपूर शिल्लक पडत चालली होती. हिंदुस्तान सरकार म्हणजे कोठेही न आढळणारे उधळे सरकार. अशा या सरकारजवळ सुध्दा शिल्लक राहू लागते हे जगातील सात आश्चर्याच्या जोडीचे आठवे आश्चर्य होय! हिंदुस्तानची भरभराट होत आहे, देश सधन होत चालला असून माझ्या कारकीर्दीत रामराज्य आहे असे कर्झनसाहेबांनी सांगण्यास सुरुवात केलीच असेल! परंतु जगात - प्रजेत काय चालले आहे याची सिमल्यास राहणा-या शंभूस काय कल्पना असणार? लोक पिळवटून चालले आहेत, मिठासारख्या अत्यंत आवश्यक वस्तूवरही जबरदस्त कर बसवावे, सरकारजवळ पैसा उरत असला तरी कराचे ओझे यत्किंचित् ही कमी होऊ नये! खरोखरच भाग्य आम्हा हिंदुस्तानच्या लोकांचे!! सरकारास हिंदुस्थानातील लोकांची पर्वाच नाही. बेगुमान व बेपर्वा बनून प्रजेला जळवा लावून पैसे उकळावयाचे आणि सिमल्यास देशसंपन्नतेचा नगारा बडवावयाचा! 'क्वचिद्वीणावाद : क्वचिदपिच हाहेति रुदितम्' अशातलीच ही स्थिती. जो पैसा घेण्यात येतो त्याच्या शतांश तरी रयतेच्या ख-या कल्याणासाठी खर्च करण्यात येतो काय? शिक्षण, आरोग्य, शेतकी, उद्योगधंद्यास भांडवल- सर्वत्र नकारघंटाच घणघणत आहे. वाहवा रे माबाप सरकार! सरकारची जावई- खाती लष्कर आणि सिव्हिल सरव्हंट यांच्या अवाढव्य खर्चात किती पैसा गडप झाला तरी खळगा भरतो आहे कोठे? गोखल्यांनी या सर्व गोष्टीप्रमाणे देऊन सिध्द केल्या. लोकांचे कर कमी झाले पाहिजेत, लोकांस जास्त मोठया पगाराच्या जागा देण्यात आल्या पाहिजेत, शिक्षणाकडे कानाडोळा करू नये, सरकारने सैन्य कमी करावे आणि जे राहील त्या सैन्याच्या खर्चापैकी बराचसा बोजा इंग्लंडने सोसावा. १८८५ मध्ये ३०००० सैन्य वाढविले. कशास तर म्हणे रशियाचा बागुलबोवा आहे म्हणून! रशियाचा बागुलबोवा दूरच राहिला. परंतु या आधीच भिऊन गेलेल्या सरकारने जे नवीन लष्कर ठेवले त्याचा खर्च चालावा म्हणून मात्र कर वाढविण्यात येतात! आणि रशियन पिशाच्चाची भीती नाहीशी झाली तरी हिंदुस्तानच्या रयतेच्या छाताडावर नंगा नाच घालणारे हे करांचे भूत! याला मात्र मूठमाती देण्यात येत नाही! केवढी लोककल्याणाची तयारी! यासाठीच आम्ही या सरकारचे ऋणी असावयाचे काय? लोकांनी पोटास चिमटा घेऊन दिलेले कर लष्करच्या लाडक्या लोकांच्या सुखसोयींसाठी खर्च व्हावे ना? कर्झनसाहेब मोठा उपदेशाचा आव आणून धीरगंभीर वाणीने सांगतात, 'हिंदुस्तानाने संकुचित राष्ट्राभिमानाची दृष्टी अत:पर टाकून व्यापक साम्राज्याभिमानाची दृष्टी ठेवावी.' हे शब्द बोलताना कर्झन शुध्दीवर होते की नाही कोण जाणे? किंवा हिंदुस्तानी लोकांस आपण गव्हर्नर जनरल असल्यामुळे सांगू ते रुचेल व पटेल असे तरी त्यांस वाटले असावे. हिंदुस्तानने साम्राज्याभिमान कशासाठी बाळगावयाचा? आफ्रिकेत, कानडात, आस्ट्रेलियात सर्वत्र वसाहतींमध्ये हिंदू लोकांच्या होणा-या अनंत यातनांसाठी तर नव्हे? एतद्देशीय लोक म्हणजे पशूच असे समजण्याची उदारता हे वसाहतवाले दाखवतात म्हणून की काय? परंतु लांब कशाला, प्रत्यक्ष हिंदुस्तानात लोकांच्या डोक्यावर सदैव दंडुका उगारलेला असतो, तेव्हा या परम भाग्यासाठीच आम्ही साम्राज्याभिमान बाळगावयाचा ना?