नामदार गोखले-चरित्र 113
शंकराचार्यांच्या पीठाची तीच रड. तेव्हा हे पाहून संस्था वगैरे स्थापण्यावर माझा विश्वास नाही.' टिळकांच्या या म्हणण्यात खोल अर्थ आहे. व त्याचा त्यांच्यावर टीका करणारांनी विचार करावा. पुढे संस्था निकामी होतील म्हणून निर्माणच न करणे हे अव्यवहार्य आहे असेही पुष्कळ म्हणतील. परंतु टिळकांची वरील विचारसरणी जी आहे ती हिंदुस्तानात तरी कठोर असली तथापि सत्य आहे. या संस्था इकडे जोमाने का चालत नाहीत याचे एक कारण त्या वंशपरंपरागत असतात किंवा गुरू आवडत्या शिष्यास अधिकारी देतो हे होय. संस्था लोकामतानुवर्ती असाव्या; त्यांस घटना असावी. म्हणजे पाश्चात्य देशात संस्था टिकतात तशा आपणाकडेही टिकतील, यात शंका नाही. रा. ब. महाजनी म्हणतात 'रामदासांनी आपले कार्य आपल्या मागे चालविण्याकरिता हिंदुस्तानभर मठांचे जाळे पसरून त्या त्या ठिकाणी महंतांची स्थापना केली. ही योजना स्वामींच्या कल्पकतेची साक्ष देते, तशी त्यांच्या दीर्घदृष्टीची देत नाही, हे कष्टाने कबूल करावे लागते.' टिळकांना दीर्घदृष्टी होती असे म्हणणे यावरून सहजच प्राप्त होते. पुस्तकांचा, रिपोर्टांचा व साधनांचा संग्रह टिळकांनीही केला. 'पण ही साधनसमृध्दी बाह्य उपकरण- समृध्दी होय. ती दृढ व्यासंगाने मनात रुजविली पाहिजे, आपलीशी केली पाहिजे. इतके झाल्यावरही विवेकानंद ज्यास देशभक्तीची दुसरी पायरी समजतात, ती उपाययोजना, अभेद्य किल्लेकोट उभारण्याची हातोटी, हे कौशल्य 'देणे ईश्वराचे' असेच म्हणणे प्राप्त आहे. ओढून ताणून हे येत नसते. बांधली शिदोरी किती काळ पुरणार?'
या विवेचनावरून टिळक, 'संस्था-संस्थापक' नव्हते म्हणून त्यांस कितपत लघुत्व द्यावे हे सुज्ञ वाचकांनी आपल्या मनाशी ठरवावे. टिळकांमध्ये व्यावहारिक शहाणपणाही होता. अरविंद घोष, लजपतराव, बिपिनचंद्र पाल या सर्वांपेक्षा तडफ, चिकाटी, व्यावहारिक शहाणपणा, बुध्दीचा खोलपणा आणि निश्चितपणा व केवळ उचंबळलेल्या मनोवृत्तींबरोबर वाहत न जाता त्या मनोवृत्ती कार्यक्षम करून घेण्याचे सामर्थ्य हे गुण टिळकात जास्त असल्यामुळे साहजिकपणेच जहाल पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. ते तुरुंगात गेल्यावर राष्ट्रीय पक्ष कसा विस्कळित झाला, आणि तुरुंगातून आल्याबरोबर पुन: जोमाचा संघटित पक्ष त्यांनी कसा उभा केला हे पाहिले म्हणजे संघटनाचातुर्य त्यांच्यात होते हे नि:संशय ठरते.
टिळकांचे व्यवहारचातुर्यही ते सुटून आल्यावर दिसून आले. 'परिस्थिती ओळखून तिच्यापासून फायदा करून घेणे हा गुण टिळकात नव्हता असे मेथा म्हणत. 'परंतु ते जर याही गुणाने युक्त असते तर मग त्यांस पूर्ण पुरुष म्हटले असते' असे ते गौरवाने म्हणत. दुर्दैवाने मेथाहि जगले नाहीत. टिळक कैदेतून सुटून आल्यावर त्यांनी परिस्थितीचे सिंहावलोकन केले. आपल्या व्यापक बुध्दीने त्यांनी सर्व रागरंग तानमान जाणले; चवली किंमतीच्या मोर्लेमिंटो सुधारणा मिळाल्यामुळे आशेस जागा आहे असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. 'लढाईत सरकारास मदत करा; राजनिष्ठ राहा. सरकारने जर आम्हास मानाने वागविले व हिंदी सैनिकांस योग्य जागा दिल्या तर मी हजार सैनिक मिळवून देतो'' असे त्यांनी जाहीर आव्हान दिले; कारण सरकारची नड ती आपल्या फायद्याची गोष्ट हे त्यांस पक्के पक्के माहीत होते. या वेळेस सरकारास मदत करू तर मग वाटेल ते हक्क मागण्यास आपणास हक्क आहे; मग सरकारला आपणांस अराजक असे नाव ठेवता येणार नाही असा त्यांनी कयास बांधला. ते विलायतेस गेले. फ्रान्समध्ये सर्व राष्ट्रांच्या पुढे त्यांनी आपल्या देशाचा अर्ज पाठविला. सुधारणा पदरात घेऊन कौन्सिलात शिरून ती लोकहितास कशी जाचक आहे, प्रत्यक्ष फायदा त्यामुळे काहीच कसा होणार नाही हे सरकारास व जगास दाखवून उरलेल्या चवदा आण्यांसाठी झटण्याची त्यांची योजना पाहून परिस्थितीचे यथार्थ आकलन त्यांस कसे करता येई व परिस्थित्युरूप मार्ग ते कसा कसा आखीत हे स्पष्ट दिसते. परिस्थितीप्रमाणे मार्ग आखणे म्हणजे पगडी बदलणे असेही पुष्कळ म्हणतील, परतुं मुत्सद्दयांमध्ये हा प्रमुख गुण समजला जातो.