नामदार गोखले-चरित्र 83
सर्व प्रयत्न हरले तेव्हा राशबिहारी हे अध्यक्ष आम्हास पसंत नाहीत असे राष्ट्रीय पक्ष म्हणू लागला. याला एक कारणही त्यास सापडले. नियोजित अध्यक्ष राशबिहारी घोष यांनी राष्ट्रीय पक्षासंबंधी अनुदार उद्गार कौनॅसलंमध्ये उच्चारले होते. राष्ट्रीय पक्ष झाला तरी तो देशासाठीच तळमळत होता. चुकत असला तरी स्वार्थासाठी झुरत नव्हता; तर मातृभूच्या उध्दारासाठीच. आपसांत कितीही भांडणे झाली तरी आपणां दोघांसही चिरण्यास जो शत्रूप्रमाणे टपला आहे, त्याच्या जवळ एकमेकांची नालस्ती करणे म्हणजे फार निंद्य गोष्ट होय असे आम्हांस वाटते. या बाबतीत ना. गोखले हे जास्त थोर मनाचे होते. ते नेव्हिन्सन साहेबांजवळ टिळक पक्षाविषयी बोलताना म्हणाले, 'But we are not likely to denounce a section of our own people in the face of the bureaucracy. For after all they have in the view the same great object as ourselves.' राष्ट्रीय पक्षाने लालाजी अध्यक्ष व्हावे म्हणून सुचविले. पण त्याचे म्हणणे गोखल्यांनी संयुक्तिकपणे खोडून काढले. सर्व स्वागतकमिटीने राशबिहारी यांस अध्यक्ष निवडले असता आता लालाजींस अध्यक्ष करण्याने पुष्कळ लोकांची मने दुखवतील. लालाजींस आज जी सर्व राष्ट्राची सहानुभूती पाहिजे ती नाहीशी होईल. लालाजींस विनापराध हद्दपार केले. याचा सरकारास जाब विचारताना सर्वांनी लालाजींस पाठिंबा दिला पाहिजे असे गोखल्यांचे म्हणणे होते. लालाजींस अध्यक्ष करण्यास गोखले भीत होते, असा त्यांच्यावर पुष्कळांनी आरोप केला आहे. परंतु गोखले इतके भ्याड खास नव्हते. ते लालाजींची स्नेही होते व त्यांच्या सुटकेसाठी त्यांनी प्रयत्नही केले होते. लालाजींस गोखले जर सरकारच्या मोहबतीखातर भिते तर त्यांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी टाइम्समध्ये पत्र का प्रसिध्द केले असते? परंतु एका चरित्रकाराने म्हटल्याप्रमाणे 'people always are misunderstood. They are blameless, but their conduct is misrepresented. They are conscious of having felt precisely the reverse of what is attributed to them : and they wonder that they are not known better.' याप्रमाणे गोखल्यांच्या सध्देतूचाही विपर्यास करण्यात आला.
परंतु शेवटी लालाजींनी स्वत: मनाच्या थोरपणाने 'मी अध्यक्ष होत नाही,' असे जाहीर केले. या करण्यामुळे तर राष्ट्रीय पक्ष फारच चिरडीस गेला. कलकत्त्याचे पास झालेले स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वराज्य वगैरे ठराव येथे नापास होणार, ते ठराव पत्रिकेत घातलेलेही नाहीत, अशी त्याने खोटीच आवई उठविली. खरे पाहिले तर कलकत्त्यास 'स्वराज्य' असा ठराव पास झालाच नव्हता. तो शब्द फक्त दादाभाईंच्या स्फूर्तिप्रद भाषणात बाहेर आला. बहिष्कार हा सर्वराष्ट्रीय करून सर्व सरकारी संस्थांवर घालावयाचा असे जरी राष्ट्रीय पक्षास वाटत होते तरी वस्तुत: ते तसे नव्हते. कारण कलकत्त्यास गोखल्यांनी उठून हे म्हणणे मोडून काढले होते. जे ठराव कलकत्त्यास ज्या स्वरुपात पास झाले तेच ठराव येथेही ठरावपत्रिकेत घातले होते. कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेचा रिपोर्ट अद्याप प्रसिध्द झाला नसल्यामुळे गोखल्यांस 'इंडिया'पत्रातून त्या वेळचे ठराव आपल्या ठराव पत्रिकेत घालावे लागले. असे करताना स्वदेशीच्या ठरावात दादाभाईंनी स्वत: टिळकांच्या सांगीवरून घातलेले 'घस सोसूनही स्वदेशी वापरणे' हे शब्द गाळले गेले. परंतु इंडिया पत्रातील प्रसिध्द झालेल्या ठरावातसुद्धा हे शब्द नव्हते. शिवाय ही ठरावपत्रिका म्हणजे काही वज्रलेप नव्हे की, त्यातील ठराव व त्यांची भाषा यांच्यावर रणे माजवावी. आजपर्यंत असे अनेकदा झाले असले की, पत्रिकेत घातलेले ठराव विषयनियामक कमिटीत साफ बदलले; केव्हा नवीन शब्द घातले; केव्हा काही ठराव गाळले. तेव्हा विषयनियामक कमिटीच्या आधीच गोखल्यांवर आग पाखडणे न्याय्य नव्हते. या ठरावपत्रिकाही वेळेवर छापून मिळाल्या नाहीत त्यास गोखले काय करणार? जेव्हा छापून झाल्या तेव्हा ताबडतोब त्यांनी एक प्रत टिळकांस दिली, एक लालाजींस दिली. यानंतर टिळकपक्षाचे असे म्हणणे पडले की जर कलकत्त्याचे ठराव त्याच स्वरुपात येथे पास होणार असतील तर अध्यक्षांच्या सूचनेस आम्ही विरोध करणार नाही; नाही तर आम्हांस अध्यक्ष पसंत नाहीत. परंतु सोळाशे सभासदांनी हमी गोखले कशी बरे घेणार? असे विचारणे म्हणजे राष्ट्रीय सभा मोडण्यासारखेच होते आणि अखेर तसेच झाले. गोखल्यांनी पुष्कळ सभासदांस बोलावून सांगितले की ठराव मागे घेण्यात आलेले नाहीत, विषयनियामक कमिटी काय ठरवील ते खरे. शेवटी २७ वी तारीख उजाडली. अडीच वाजता सभेच्या कामास सुरुवात झाली. स्वागताध्यक्षाचे भाषण झाल्यावर अंबालाल सक्करलाल यांनी अध्यक्षांची सूचना पुढे मांडली. डॉ. घोष यांचे नाव उच्चारताच 'नको नको' असे उद्गार उठू लागले. परंतु त्यांनी या हलकल्लोळातून आपले भाषण कसेबसे संपविले. नंतर सुरेंद्रनाथ दुजोरा देण्यासाठी उठले. त्यांचे पहिलेच वाक्य उच्चारले जाते न जाते तोच, त्यांस खाली बसावयास लावण्यासाठी काही लोकांनी एकच गोंगाट सुरू केला, स्वागताध्यक्षाने पुन:पुन: शांत राहण्यासाठी लोकांस विनंती केली; परंतु काही उपयोग झाला नाही. सुरेंद्रनाथांनी विचारले, 'Have things come to such a pass?' त्यावर 'होय, होय' अशी उत्तरे मिळाली. शेवटी अध्यक्षांनी 'जर तुम्ही शांत राहणार नाही, तर मी सभा बरखास्त करीन' असे सांगितले. सुरेंद्रनाथ बोलू लागले. परंतु त्यांचा खडा स्वरही लोकांच्या गर्जनेत विलीन झाला. अध्यक्षांनी सभा बरखास्त केली.
रात्री टिळक हे गोखले वगैरे मंडळीस भेटण्यासाठी जाणार होते, परंतु गोखल्यांनीच त्यांना झिडकारिले असे खोटेच प्रसृत करण्यात आले. गोखल्यांच्या जवळ टिळक यासंबंधी बोलले नाहीत; त्यांनी तशी इच्छा दर्शविली नाही; किंवा चिठी वगैरेही काही पाठविली नाही.