नामदार गोखले-चरित्र 51
वरिष्ठ कायदेकौन्सिलात प्रवेश
पत्राचे काम झाले आणि गोपाळराव हे वरिष्ठ कायदेकौन्सिलात निवडून आले. १९०२ पासून त्यांच्या वरिष्ठ कायदेकौन्सिलातील कामास सुरुवात झाली. ते काम आमरण चालले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचा संबंध कमी कमी होत गेला. कॉलेजमधील त्यांचे शेवटचे व्याख्यान सप्टेंबर महिन्यात झाले. विद्यार्थ्यांस फार वाईट वाटले. गोखल्यांस जरी इंग्रजी वगैरे इतर विषय मनोरंजकपणे शिकविता येत नसले तरी त्यांची इतिहास, अर्थशास्त्र यांवरील व्याख्याने फार सरस वठत. इतिहास शिकविताना ते नेहमी तुलनात्मक पध्दतीने शिकवावयाचे. आयर्लंड वगैरे देशांची व हिंदुस्तानची तुलना करून त्यांत साम्य किती आहे आणि विरोध कोठे आहे हे अचूक पटवून द्यावयाचे. इंग्लंडच्या इतिहासात त्यांस फार अभिमान. आपल्याकडील इतिहास म्हणजे रक्तपात, खून, लुटालूट व आपसातील भांडणे यांनी येथपासून तेथपर्यंत भरलेला. थोडेफार अपवाद सोडले तर जो तो आपल्या पोळीवर तूप ओढण्यास सवकलेला. लोकांच्या हक्कांचे समर्थन येथे झालेच नाही. आपणांस काही हक्क आहेत याची लोकांसही जाणीव नाही. परंतु इंग्लंडकडे पाहा! आपल्या हक्कांच्या समर्थनासाठी हॅम्पडनसारखे लोक पुढे घुसतात; राजाची आहुती पडते. आपले धर्मरक्षण होत नाही. म्हणून लोक परकी देशात हजारो मैल लांब जाऊन वसाहत करतात, जंगले तोडतात, नवीन संसार थाटतात आणि मायभूमीने नवीन नवीन कर बसविले तर '' म्हणजे, 'ना हक्क, ना कर' असा रोख जबाब देऊन जबरी होऊ लागताच, लष्करी शिक्षण नीट मिळाले नसले तरी सर्व लोक दंड थोपटून 'हा आपला मायदेश आहे' ही कल्पना बाजूस ठेवून, युध्दास सिध्द होतात! देवासाठी नातीगोती दूर करावी, तसेच आपल्या नैसर्गिक आणि रास्त हक्कांची पायमल्ली होत असता, आपली विनाकारण गळचेपी होत असता, कोणता स्वाभिमानी पुरुष स्वस्थ बसेल? इंग्लंडच्या इतिहासाचे गोखल्यांनी फार मनन केले होते. त्याचप्रमाणे अर्थशास्त्रावरही त्यांचा दांडगा व्यासंग. रानडे आणि ग. व्यं. जोशी यांच्याजवळ सर्व प्रश्नांचा त्यांनी साधकबाधक रीतीने ऊहापोह केलेला. या सर्व गोष्टींमुळे त्यांची शिकवणूक अधिकारी शिक्षकाप्रमाणे असे. त्यांच्या अस्खलित आणि सुंदर भाषापध्दतीने मुलांस फार आनंद वाटे. असा योग्य शिक्षक आपल्यामधून जावा याची विद्यार्थांस साहजिकच खिन्नता व उद्विग्नता वाटली. परंतु खालच्या पायरीवरून ते वरच्या पायरीवर जात आहेत, हिंदुस्थानच्या कारभाराची दिशा कशी असावी याचे शिक्षण सरकारास देण्याकरिता आपले गुरुजी जात आहेत या विचाराने त्यांस आनंदही झाला. गोखल्यांनी सप्टेंबरमध्ये शेवटचे भाषण करून दोन वर्षांची फर्लो घेतली. १९ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी त्यांस मानपत्र अर्पण केले. त्यास उत्तर देताना गोखल्यांचे गोड व मृदू मन भरून आले. ज्या शिक्षणसंस्थेत आगरकर, टिळक यांच्या थोर उदाहरणामुळे आपण शिरलो, टिळक सोडून गेले असता आणि पुढे आगरकर- केळकरांसारखे मोहरे अकाली निवर्तले असता, जिची धुरा आपणावर घेतली, जिच्यासाठी नाना कष्ट करून पैसा जमा केला, जिच्यासाठी पैशानेही न मिळणारी अशी नवीन विद्वान माणसे गोळी केली, ज्या शिक्षणसंस्थेची सर्वतोपरी भरभराट व्हावी म्हणून आपल्या आयुष्यातील ऐन उमेदीची, उत्साहाची- ज्या वेळेस लाथ मारू तेथे पाणी काढू, असा हिय्या असतो, मान मिळवू पैसा कमावू, लोकांस चकित करू अशी महत्त्वाकांक्षा असते- अशी वर्षे निरपेक्षपणे तनमनधन खर्च करून वाहिली, जेथे आपले मित्र आणि आपले लाडके शिष्य होते ते सर्व सोडून आज त्यांस जावयाचे होते. जुने बांधलेले घर सोडून पुन:नवीन घर बांधण्यास जावयाचे होते. कॉलेजमधील कामात विशेष दगदग नव्हती; काळजी नव्हती. विद्यार्थी बरे, आपली पुस्तके बरी, आपले काम बरे. आता ते लोकांपुढे जाणार होते. सरकारपुढे छातीवर स्वस्तिकाकार हात ठेवून झगडण्यांसाठी ते जाणार होते. स्वत:च्या जबाबदारीची त्यांस जाणीव होती. त्यांनी आपल्या भाषणात तुफान दर्यांत होडी लोटणा-या कोळयाची गोष्ट सांगितली. क्षणात पर्वतप्राय लाटांच्या 'आ' पसरलेल्या जबडयात आपण गिळंकृत होणार असे त्यास वाटते तर दुस-या क्षणी त्याची होडी लाटांवर, समुद्राच्या वक्ष:स्थलावर मोठया डौलाने डुलत असते. आपल्या कामगिरीत यश मिळणार का अपयश पदरी पडणार या विचाराने त्यांचे मन खालीवर होत होत होते. परंतु आशानिराशा बाजूस ठेवून यश मिळो वा अपयश येवो; आपले पवित्र कर्तव्य म्हणून मी जात आहे असे त्यांनी सांगितले, आणि या जबाबदारीच्या कामातून- या दिव्यातून- ते यशस्वीपणाने अलौकिक यशाने बाहेर पडले. कौन्सिलमध्ये काम करावयाचे, लोकांमध्ये राजकीय चळवळ चालू करावयाची हे काम अत्यंत त्रासाचे आणि जिकरीचे असते. लोकांत तर मतामतांचा गलबला माजलेला; धर्माप्रमाणे समाजातही नाना पंथ बोकाळलेले आणि एकमेकांवर टीका करण्यास अस्तन्या सारून सरसावलेलेले. 'जो तो बुध्दिच सांगतो,' अशी जेथे स्थिती आहे तेथे आपले म्हणणे कितपत ऐकू जाईल; जेथे सरकारी अधिकारीही कठोर आणि अधिकाराने मगरूर आणि फार शहाणे, तेथे आपण कसे वागले पाहिजे याची गोखल्यांस फार चिंता वाटत होती. परंतु आता आपल्या मनातील कार्यास वाहून घेताना कोणाच्याही टीकेस भीक न घालण्याचे त्यांनी ठरविले. टीकांचा पाऊस कोसळला, निंदांचा कडकडाट झाला तरी आपले कार्य बरे की आपण बरे असे त्यांनी मनात पक्के ठसविले. कशाचीही क्षिती न बाळगिता, जो मार्ग आपणास हितप्रद व कल्याणकार असा दिसतो आहे, जो आपल्या पूज्य व दूरदृष्टी गुरूने चोखाळला आणि आपणास व जो पाहील त्या दाखविला, त्या मार्गाने सदसद्विवेक बुध्दीस अनुसरून लोभालोभ दूर ठेवून जाण्याचे आणि लोकांस नेण्याचे त्यांनी ठरविले. स्वत:च्या ध्येयावर एकान्तिक निष्ठा ठेवून, कधी उल्लसित मनाने तर कधी पोळलेल्या मनाने, आपले काम १९०२ पासून मरेपर्यंत या थोर पुरुषाने केले. तो इतिहास फार हृदयंगम- कधी उद्विग्न करणारा तर कधी थरारून सोडणारा असा आहे. त्या इतिहासाकडे आता आपण वळले पाहिजे. येथे जाता जाता एक गोष्ट सांगावयाची ती ही की, गोखले हे आता आजपर्यंतच्या आपल्या चळवळीचे स्थान जे पुणे ते सोडून मुंबईस कायमचे राहण्यास जाणार होते. मेथा वगैरेंचाही आग्रह होता. परंतु पुण्याच्या मित्रांची फार गळ पडली आणि त्यांस पुणे म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष याच वर्षी निवडल्यामुळे मुंबईस जाण्याचा बेत कायमचा मागे पडला.