नामदार गोखले-चरित्र 35
त्याप्रमाणेच शिवाजी- उत्सवाने मुसलमानांत वाईट वाटेल हा दुसरा आक्षेप. वाईट वाटण्याचे कारण? शिवाजीने मुसलमानांस सळो का पळो केले. या गोष्टीच्या अनुकरणार्थ काही आज आम्ही शिवाजी- उत्सव करीत नाही. तर जो धर्माभिमान, जो राष्ट्राभिमान, जे तेज, जे धैर्य, जे वीर्य, जे शौर्य, जो स्वार्थत्याग, जे युक्तिबल, शिवाजीने व त्या वेळच्या लोकांनी दाखविले तेच गुण आजही आपल्या अंगात पाहिजेत. आपण शेळपट; नादान होत चाललो आहो, याची जाणीव लोकांच्या मनात टिळकांना उत्पन्न करावयाची होती. मुसलमानांस वाईट वाटण्याचे यात कारण काय? मुसलमानांस आणि हिंदूस सोवळा असा नेल्सन, वेलिंग्टन, नेपोलियन यांपैकी कोणाचा उत्सव आम्ही सुरू केला पाहिजे होता की काय असे चिरोलसाहेबांस आमचे विचारणे आहे. जी विभूती लोकांस आपलीशी वाटेल, अवतारी वाटेल तीच त्यांच्यापुढे ठेवावी लागते. मुसलमानांनी सुध्दा शिवाजी-उत्सव करावयास हरकत नाही. त्याने त्यांच्या धर्मावर हल्ला केला नाही; त्यांच्या मशिदी पाडून मंदिरे उभारली नाहीत; परधर्मी म्हणून त्यांच्या मुंडक्यांची रास केली नाही; परधर्मांतील स्त्रियांशी विवाह केला नाही; परकी स्त्रिया जनानखान्यात घातल्या नाहीत; तेव्हा असे उदाहरण त्यांच्या हिंदुस्थानांतील इतिहासात क्वचितच सापडेल. शिवाजीचे गुण आपल्यात आणण्यासाठी हा उत्सव आहे. आणि त्या गुणांची सदा सर्वकाळ जरूरी आहेच.
परंतु टिळकांच्या या दोन उत्सवांनी सरकारास वाटले की यात जातीजातींचे वैमनस्य वाढविण्याचे बीज आहे. त्याचीच री मवाळांनीही ओढली, मलबारी या गृहस्थांनी ईस्ट आणि वेस्ट या मासिकात १८९७ मध्ये सद्य:स्थिती या विषयावर एक लेख लिहिला आहे. या उत्सवासंबंधी ते म्हणतात : ''His movement to revive the memory of Shivaji though deserving of sympathy from every generous heart so far as it aims at the unity of the Deccan, is historically an anachronism.'' आणि पुढे म्हणतात ''Mind has been liberated to a certain extent, not so the heart.'' पहिल्याच वर्षी मुंबईत दंगे झाले. मुसलमानांस हिंदूंनी आपल्यासारखा दहा दिवसांचा उत्सव सुरू केला हे खपले नाही. हिंदूंनी आपणांस वचकावे, त्यांनी नरमून असावे ही त्यांची इच्छा. हिंदू तुमच्या मोहरमात भाग घेतात. तुम्ही गणपत्युत्सवात घ्या- असे म्हणणे किती मुसलमानांस रुचले असते? हा उत्सव त्यांस वर्मी झोंबला आणि म्हणून त्यांनी दंगे केले. परंतु या दंग्याचे कारण निरुपद्रवी विघ्नहर्ता गणपतीचा उत्सव हे नसून, चढेल मुसलमानांचे फाजील धर्मवेड हेच होय हे डोळयांआड करून चालणार नाही. हे दोन उत्सव आणि टिळकांचा सामाजिक बाबीतला परंपरेला होता होईतो एकदम न टाकण्याचा दृढ निश्चय या तीन गोष्टींमुळे त्यांस या रानडेपक्षीय लोकांनी जहाल हे विशेषण दिले. आपल्यास सवता मुभा काढावयाचा तर काढावा, परंतु तो काढण्यासाठी आपले मताधिक्य नाही, ही खरी गोष्ट जी सांगावयाची ती टाळून हा पक्ष जहाल आहे अशी टिमकी वाजवावयास या पक्षाने सुरुवात केली, आणि आपल्याच देशबांधवांस जहाल अशी नावे ठेवून तो पक्ष सरकारच्या अवकृपेस जास्तच पात्र केला. नवीन सभा काढण्यास बळकट आधार कशाचाच नव्हता. ज्यांचे मताधिक्य आहे, त्यांच्याबरोबर काम करण्यात आपली मानखंडना आहे असे वाटल्यावरूनच ही निराळी सभा स्थापण्यात आली आणि म्हणूनच टिळकांनी ती स्थापणा-यांवर टीकेचे जळजळीत अस्त्र सोडले. हा विस्तार करण्याचे कारण येवढेच की जो पक्ष मताने मातबर असेल त्याच्याशी भांडून जर त्या पक्षाने आपली मते स्वीकारली तर ठीकच; नाही तर जे मताधिक्याने ठरेल त्याचा टिळक प्रसार करीत. परंतु टिळक आग्रही आहेत असा टिळकांवर आरोप करणारे मात्र आपले अल्पसंख्यांकत्व झाल्याबरोबर वेगळे होतात! टिळक मतासाठी, आपले मत दुस-यास पटविण्यासाठी, मातबर लोकांशी झगडतील; आकाशपाताळ एक करितील; परंतु जर आपले म्हणणे मताधिक्याने पसंत ठरले नाही तर उठून जाणार नाहीत; उलट जे ठरेल त्याचे लोण सर्व जनतेत पोचवितील आणि दुस-या प्रसंगी आपले मताधिक्य करण्याचा प्रयत्न करतील. परंतु सवते सुभे काढणे, वेगळे होणे हे नेमस्त मंडळींसच बाळकडू आहे; टिळकांस नाही असे आम्ही स्पष्टपणे म्हणतो. गोखले आता डेक्कन सभेचे सेक्रेटरी झाले. याच वर्षी गोपाळराव ग्रज्युएटांतर्फे बॉम्बे युनिव्हर्सिटीचे फेलो निवडून आले. मरेपर्यंत ते युनिव्हर्सिटीचे फेलो होते. कर्झनसाहेबांच्या युनिव्हर्सिटीच्या कायदेकानूनंतर त्यांस युनिव्हर्सिटीनेच फेलो नेमले. एक वर्ष ते सिंडिकेटचेही सभासद होते, परंतु पुढे मात्र निवडून आले नाहीत. पुढे पुढे सीनेटच्या बैठकीसही त्यांस वेळेवर जाता येत नसे. कारण कामाचा बोजा त्यांच्यावर किती पडे हे त्यांचे, त्यांनाच कळे. ते हजर असले म्हणजे मात्र वादविवादात लक्षपूर्वक मन घालावयाचे. शिक्षण हा त्यांचा जिव्हाळयाचा विषय होता बी. ए.च्या परीक्षेस इतिहास हा विषय सक्तीचा असावा की नाही या प्रश्नावर जेव्हा भवति न भवति होत होती तेव्हा गोपाळरावांनी उत्कृष्ट भाषण केले. हेच त्यांचे शेवटचे भाषण होय. हिंदुस्थानातील तरुणांस इतिहासाची फार आवश्यकता कशी आहे ते त्यांनी स्पष्टपणे सांगितले. हा विषय आवश्यक असावा असे त्यांचे म्हणणे होते आणि त्याच वेळेस जर मते घेतली असती तर गोपाळरावांचा जय झाला असता. कारण त्यांच्या भाषणाने खरोखरच मनावर परिणाम घडवून आणला असे ते भाषण ऐकणारे लोक सांगत. परंतु उपयोग झाला नाही. नवीन 'ऐच्छिक इतिहास' या विषयाचा अभ्यासक्रम जेव्हा आखण्यात आला तेव्हा मात्र त्यांच्या मतास- म्हणण्यास मान देण्यात आला. राजनीतिशास्त्राचा अभ्यास आणि अर्थशास्त्र हा विषय बी. ए.ला व हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती हा विषय एम. ए.ला ठेवण्यात त्यांनीच भीड खर्च केली. ते पुष्कळ वर्षे इतिहास व इंग्रजी यांचे परीक्षकही होते.