नामदार गोखले-चरित्र 63
बनारसला गोपाळरावांचे अलौकिक स्वागत झाले. गोपाळरावांच्या श्रमांचे फळ त्यांना मिळाले. ते या अध्यक्षपदासाठी हपापलेले नव्हते. परंतु देशाने त्यांच्या कामगिरीचा गौरव केला. काम करण्याने मनुष्य खचत नसतो. परंतु कामे करून सवरून जर दुस-याने त्या कामाचा उल्लेखही केला नाही तर मात्र मन खट्टू होते. मनाचा उत्साह मंदावतो. आईची चार कामे करावयास या मुलास लाज वाटत नाही किंवा श्रमाची तो पर्वा करीत नाही; परंतु पाठीवर हात फिरवून आईने 'दमलास हो बाळ, जरा बस आता' असे शब्द काढले की मुलाच्या लहानशा हृदयात आनंदास पारावर राहत नाही. दुप्पट कार्य करण्यास त्यास हुषारी येते. उल्हास द्विगुणित होतो. तीच गोष्ट गोखल्यांसारख्या हळूवार मनाच्या लोकांची असते. आपल्या कामाची वाहवा होवो न होवो, ते लोकास रुचो वा न रुचो, कार्य करीत राहावयाचे. अशा धमकीने केवळ नि:संग ते काम करणारा एकादाच: जवळ जवळ नाहीच म्हटले तरी चालेल. गोखले हे मुलाप्रमाणे होते. आपल्या कामगिरीचा गौरव झाला हे पाहून त्यांस गहिवर आलेला होता. काशीसारख्या पुरातन काळापासून पवित्र झालेल्या नगरीत, जेथे विश्वंभराचे वास्तव्य, जेथे गंगेचा गंभीर प्रवाह, अशा पुण्यपावन ठिकाणी गोखल्यांसारखा तरुण, उत्साही व देहाची सुध्दा पर्वा न करात देशकार्य करणारा पुढारी राष्ट्रीय सभेचा अध्यक्ष नेमण्यात आला होता.
परंतु यंदाच्या काँग्रेसचे काम फार बिकट होते. राष्ट्रात पूर्वीपासून दिसून येणारे मतभेद आता अधिक स्पष्टपणे दिसू लागले. बहिष्कार बंगाल प्रांतापुरता न ठेवता सर्वराष्ट्रीय करावा, राजपुत्राच्या स्वागतावर बहिष्कार घालावा वगैरे प्रश्नांवर मोठी रणे माजली. परंतु एकंदरीने सर्व सुरळीत पार पडले. गोखल्यांनी फेरोजशहांस तारा केल्या. परंतु फेरोजशहा या सभेस हजर राहिले नाहीत. गोखल्यांस वाटत होते की, या वेळेस फेरोजशहांसारखा वजनदार गृहस्थ आपणास सल्ला देण्यास असेल तर काम जास्त सुरळीत पार पडेल. परंतु तितकी विशेष भानगड झालीच नाही.
गोखल्यांचे अध्यक्षपदावरून वाचण्यात आलेले भाषण फारच सणसणीत होते. आपल्या व्याख्यानाच्या आरंभी कर्झनशाहीची अवरंगजेबशाहीशी त्यांनी मार्मिक व यथार्थ तुलना केली. अवरंगजेब कर्तबगार होता, परंतु घमेंड व सर्वांचा संशय या दोन कारणांनी त्याची कारकीर्द सुखावह झाली नाही. खुद्द त्याच्या कारकीर्दीत बंडे वगैरे विशेष झाली नाहीत, तरी त्याच्या पाठीमागे सर्वत्र बजबजपुरीच माजली. कर्झन गेले खरे परंतु त्यांच्या नंतर आलेल्या मिंटोसाहेबाच्या कारकीर्दीत अराजकतेला व्यक्त स्वरूप आले. कर्झनच्या कारकीर्दीत मनात बीजारोपण झाले, मिंटो साहेबांच्या कारकीर्दीत त्याचा रोपटा झाला. कर्झनची कृष्णकृत्ये व त्यांची फळे यांची निस्तरानिस्तर मिंटो साहेबांस करावी लागली. लॉर्ड कर्झनच्या योग्य गुणाची गोपाळरावांनी तारीफ केली. परंतु त्या गुणाचे चीज झाले नाही. 'But the gods are jealous and amidst such lavish endowments, they withehld from him a sympathetic imagination without which no man can ever understand an alien people.' सुशिक्षितांचे मत बाजूला लोटणे मुत्सद्देगिरीचे होणार नाही असे म्हणणारे कर्झन त्याच मताची कायदेबाज पायमल्ली करण्यात सर्वांवर ताण कसे करते झाले, याचे त्यांनी उत्कृष्ट चित्र रेखाटले. कर्झनसाहेबांनी मुंबईच्या चरम भाषणात असे उद्गार काढिले की मी शिक्षणात जास्त पैसा खर्च केला. परंतु शिक्षणात अडीच लक्ष रुपये जास्त खर्च करण्यास दिले तर लष्काराकडे पन्नास लक्ष जास्त खर्च केले! युरोपियन लोकांसाठी तर इतक्या नवीन जागा निर्माण केल्या की बोलून सोय नाही. आधीच नोकरीवर होते त्यांचे पगार वाढविले आणि हे सर्व का? तर 'He did not regard it as wisdom or statesmanship in the interests of India itself to do so. (to do so means - offering political concessions to the people of India.)' नंतर बंगालच्या फाळणीकडे गोखले वळले. या बाबतीत सरकारशी नित्य सहकार्य करणा-यांची मतेही सरकारने कशी धुडकावली, सर्व जनतेचे मत कसे तृणवत् लेखले हे सांगून गोपाळरावांस खालील उद्गार काढावे लागले:-
'If men, whom any other country would delight to honour are to be thus made to realize the utter humiliation and helplessness of there position in their own, if the opinions of such men are to be brushed aside, if all Indians are to be treated as no better than dumb, driven cattle, then all I can say is "Good-bye to all hope of co-operating in any way with the bureaucracy in the interests of the people.'' शत संवत्सर राज्य चालवून जर हाच शेरा या राज्यपध्दतीवर मारावा लागतो तर ही राज्यपध्दती किती घातुक, किती दुष्ट असेल याची कल्पना करा.
बंगालची विभागणी करण्याची तीन मुख्य कारणे त्यांनी सांगितले. बंगालला फोडणे, आसामची भरभराट दाखविणे आणि सिव्हिल सर्व्हंटांचा फायदा. खरे पाहिले तर बिहार, ओरिसा, छोटा नागपूर हे तीन प्रांत एकीकडे काढून त्यांचा निराळा प्रांत बनविला पाहिजे होता. परंतु तसे केल्यास सिव्हिल सर्व्हंटांचा घुस्सा होणार होता. या फाळणीमुळे कर्झनसाहेबांस किती गोष्टी साधावयाच्या होत्या पहा:-