नामदार गोखले-चरित्र 111
गोखल्यांच्या डोळ्यांसमोर ही मेथांची कौन्सिलमधील चळवळ होती परंतु मेथांचे कौन्सिलमधील सर्व धोरण गोखल्यांच्या फाजील सरळपणामुळे त्यांस साधले नाही. कौन्सिलमध्ये प्रेस अॅक्टास गोखल्यांनी संमती दिली. का? तर 'सरकारने जे उतारे दाखविले तशा प्रकारच्या उता-यांविरुध्द प्रेसअॅक्ट असणे हे माझ्या नैतिक बुध्दीस पटले; आणि मला या बिलास विरोध करण्याऐवजी संमती द्यावी लागली,' असे गोखले म्हणाले. मेथांचे धोरण निराळे होते. 'शांतता आणि सुव्यवस्था' राखण्याच्या कामी सरकारी सोंगाला आम्ही मदत करता कामा नये असे त्यांचे म्हणणे असे व गोखले प्रेसअॅक्टला संमती देऊन आल्यानंतर त्यांनी गोखल्यांस हेच सांगितले. गोखले व मेथा यांनी कौन्सिलमध्ये उत्तम काम केले. त्यांनी लोकांची तरफदारी केली. मेथा व गोखले यांनी आपल्या तेजस्वी बाण्याने व वाणीच्या व बुध्दीच्या ओजस्वितेने हिंदुस्तानातील सुशिक्षित वर्गामधून, त्याचप्रमाणे कायदेकौन्सिलांतून प्रत्यक्ष अधिका-यांबरोबर वाग्युध्द करून, त्यांचे दोष निर्भीडपणे मांडून, निरनिराळे प्रसंग ओळखून, निरनिराळ्या युक्तिवादांनी, कुशलतेने, त्याचप्रमाणे अत्यंत स्पष्ट व जोमदार वृत्तीने लोकजागृतीचे कार्य सतत केले. गोखल्यांच्या राजकारणाला हिंदुस्तानातच नव्हे तर इंग्लंडात व दक्षिण आफ्रिकेत सुध्दा महत्त्व आले होते. गांधीच्या तिकडील चळवळीला दुजोरा देण्यासाठी १९१११२ साली गोखल्यांनी हिंदुस्तानात मोहीम काढून अवाढव्य फंड जमविला. यावरून ते केवढ्या दर्जाचे व वजनाचे ओजस्वी पुढारी होते हे सर्वांच्या लक्षात येईल.
देशातील सुशिक्षित समाजात जी जागृती रानडे, मेथा, गोखले यांनी केली ती जागृती खेडोपाडी सर्वत्र सामान्य जनापर्यंत टिळकांनी नेऊन पोचविली ''अत्यंत निधड्या छातीचे, बिनचूक अस्त्रांनी सदैव सज्ज, जनतेत स्पष्ट व ठलक राजकीय भावनांचा संचार करणारे, प्रचंड शक्तीचे लोकाग्रणी'' असे टिळकांचे वर्णन यथायोग्य होईल. राजकारणामध्ये आपल्या पाठीमागे प्रचंड जनसमूह पाहिजे असल्यामुळे सामाजिक बाबतीत मतभेद पाडणारे प्रश्न बाजूस ठेवून ज्यावर सर्व लोकांचे एकमत होईल असे राजकीय जागृतीचे काम त्यांनी आपल्या शिरावर घेतले आणि म्हणूनच ते धर्माचे कैवारी गणले गेले. सतरा डगरींवर हात ठेवून कोणतेच काम होत नसते हा चिरंतनचा अनुभव आहे. आणि हे राजकीय हक्कांचे काम हाती घेताना त्यांनी इतर गोष्टींकडे कानाडोळा केला. ते असेच म्हणत असत की राजकारणाच्या बाबतीत सामाजिक प्रश्न मिसळू नका. सर्व राष्ट्राला राजकारणाचे आज जे बंधन आहे तशा प्रकारचे एकाच प्रकारचे बंधन समाजाला नाही. या टिळकांच्या धोरणास सवंग लोकप्रियता असे म्हणतात. परंतु कार्य करून दाखवावयाचे असताना एकाच गोष्टीवर भर द्यावा लागतो; आणि सर्व लोकांचा पाठिंबा मिळवावा लागतो. नाही तर चार सुशिक्षित लोकांची चळवळ असे सरकारास सांगता येते. गोखले जरी समाजसुधारणेस अनुकूल असले तरी त्यांनाही राजकारण सोडून अन्यत्र फार जाता आले नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.
टिळकांनी सर्व जनतेला जागे करावयाचे काम हाती घेतल्यामुळे जनतेला बरोबर घेऊन त्यांस जावे लागे. 'जनतेला बरोबर घेऊन जातात आणि टिळक लोकच्छंदानुवर्तित्व दाखवितात' असे इतर लोक म्हणतात;परंतु सामाजिक बाबतीत त्यांनी केवळ लोकच्छंदानुवर्तित्व दाखविले याचे कारण राजकीय बाबतीत त्यांना केवळ लोकच्छंदानुवर्तित्व दाखविले याचे कारण राजकीय बाबतीत त्यांना सर्व लोकांस एकत्र पुढे न्यावयाचे होते हे होय. हे काम करीत असताना लोकांस राजकारण म्हणजे काय, परकी सरकार कसे असते, त्याचे डावपेच कसे असतात, प्रजेस हक्क का पाहिजेत, या हक्कांसाठी आपण समर्थ कसे व कोणाच्या उपायाने होऊ, उत्साह, धैर्य, उद्योग, दुर्दमनीय महत्त्वाकांक्षा यांचे सहाय्य का घेतले पाहिजे हे सर्व व्याख्यानद्वारा व पत्रद्वारा, ते रोज शिकवीत होते. ग्लॅडस्टनबद्दल हक्स्ले हे पंडित म्हणत की, ''Here is a man with the greatest intellect in Europe and yet he debases it by simply following majorities and the crowd.'' असेच टिळकांविषयी पुष्कळ लोक म्हणताना आपण ऐकतो. परंतु टिळक किंवा ग्लॅडस्टन केवळ लोकमताचे अंधपणे अनुकरण करीत नसत. ग्लॅडस्टन सुध्दा धार्मिक बाबतीत जुन्या परंपरेचा असे. हा जुन्या परंपरेचा अभिमान ग्लॅडस्टन लोकप्रियता संपादन करण्यासाठीच दाखवीत असे, असे कोण सुजाण मनुष्य म्हणले? टिळकांसही जुन्यापैकी पुष्कळ ग्राह्य असे वाटे, आणि म्हणून ते परंपरेस चिकटून होते. त्यांनी गणपतीपुढील व्याख्यानात अनेक प्रसंगी आपल्या धार्मिक कल्पनांचे समर्थन केले आहे.