नामदार गोखले-चरित्र 2
वरील हकीकतीवरून दिसले की, अर्वाचीन थोर पुरुषांच्या चरित्रांची भूक महाराष्ट्रात दिवसेंदिव वाढत आहे यात संशय नाही. पूर्वीची चरित्रे अगदी फुटकळ असत. तेव्हा तितकी माहिती नसे व तत्कालीन पुढारी मंडळींचा व्यापही लहान असे असे सापेक्षतेने वाटते. हल्ली कर्तृत्व वाढले आहे, साधने वाढली आहेत व जिज्ञासाही वाढली आहे. ही सर्व सुचिन्हे आहेत व याचेच एक प्रत्यंतर रा. साने यांनी आणून दिले आहे.
थोर पुरुषांची चरित्रे ही राष्ट्राची बहुमोल संपत्ती आहे. त्या भांडवलाच्या बळावर राष्ट्रे आपला भावी संसार चालविताना हिंमतीने पुढे पाऊल टाकतात. तरुण मंडळींच्या बुध्दीस ही चरित्रे म्हणजे एक प्रकारचा खुराकच असतो. तो त्यांस सतत पुरविणें अगत्याचे आहे. थोरांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मार्ग चोखाळणे हे जसे पवित्र कर्तव्य आहे; त्याचप्रमाणे त्यांच्या मार्गांचा, हेतूंचा, ध्येयांचा उलगडा करून ती लोकांपुढे ठेवणे ही देखील मोठी राष्ट्रसेवा आहे. कर्त्या पुरुषांची संप्रदायगंगा अखंड वाहती ठेवण्यास या चरित्रांचा मोठा उपयोग होत असतो. गोपाळराव गोखले हे रानडे, दादाभाई यांच्या संप्रदायात मोडतात. ब्रिटिश साम्राज्याच्या कक्षेत राहून आपल्या प्रिय भारतभूमीस सुखाचा स्वर्ग गाठता येईल अशी या संप्रदायाची दृढ श्रध्दा आहे. शुध्द स्वातंत्र्यवादाला या संप्रदायात अवकाश दिलेला नाही.
गोपाळराव किंवा रानडे यांच्या चरित्राचे रहस्य यथावत् उलगडून सांगण्यास जर त्यांच्या वर वर्णिलेल्या संप्रदायातलाच कोणी एकनिष्ठ पाईक मिळेल तर तो त्यांचे जे चरित्र निर्माण करील त्यात त्यांच्या अंत:करणाचे सूक्ष्म पापुद्रे तो मोकळे करून दाखवील. अंत:करणाच्या सामरस्यामुळे सांप्रदायिकाच्या चरित्रात भक्तिरस ओथंबलेला असतो. थोरल्या नेपोलियनने धाकटया नेपोलियनने काढलेले चित्र या भावनेचे द्योतक समजता येईल. गोपाळरावांनी रानडे यांचे चरित्र जर संकल्पनाप्रमाणे लिहिले असते, तर एका सच्छिष्याने आपल्या सदगुरूचे काढलेले नामी चरित्रचित्र आपणास पाहण्यास सापडते व त्यात भक्तिमत्त्वाचा उद्रेक आपले नजरेत उत्तम भरता. माधवरावांचे जसे गोपाळराव तसे गोपाळरावांचे असल्यास कोण हे सांगणे अमळ कठीणच आहे. परंतु कोणी तसली मूर्ती कल्पिल्यास गोपाळरावांचे भक्तिरसपरिपूर्ण उज्ज्वल व मधुर चरित्र आपणास तिच्याकडून वाचावयास मिळेल. ही सांप्रदायिक चरित्र जरी एका दृष्टीने आतील भक्तिरसामुळे मोठी रसाळ वठतात तथापि त्यात गुणगौरवाचा अतिरेक झालेला असतो आणि त्यामुळे चरित्रवस्तूचे हीनांग झाकले जाऊन यथार्थ बोध होत नाही,आणि अपूर्ण वस्तुदर्शनाने सत्यही लोपून आपली दिशाभूल होते. एकीकडे रसाळपणाचा उत्कर्ष होतो,तर दुसरीकडे चोखटपणास आपण आचवतो. या जातीच्या चरित्रांचे पर्यवसान चरित्रवस्तूच्या देवीकरणात (डीइफिकेशन) होते.
उलट फिशर रोझबरीसारख्या इंग्रजांनी नेपोलियनची काढलेली चरित्रतसबीर घ्या. ती उत्कट भक्तिरसाने तितकी रंगलेली असणार नाही अथवा जर्मनीची शकले एकत्र सांधून प्रबल जर्मन राष्ट्र निर्माण करणारा महान् मुत्सद्दी जो बिस्मार्क ह्याचे एखाद्या इंग्रज किंवा फ्रेंच चरित्रकाराने लिहिलेले चरित्र घ्या. त्यात विपरित दर्शन व्हावयाचाच संभव विशेष. येथे चरित्रवस्तूविषयी चरित्रकाराच्या मनात भक्तिरस उचंबळत नसून भय किंवा अशाच अन्य अनिष्ट विकारांची छाप पडलेली दिसेल. प्रेमाची आर्द्रता येथे न आढळता विरोधाची कठोरता आपणांस प्रत्ययाला येईल. सांप्रदायिक चरित्रकार जर गुणसागरात बुडून वाचकांस बुडवू पाहत असेल तर विरोधी चरित्रकार दोषगर्तेत आपण उडी घेऊन वाचकांसही तीत लोटू पाहील. सांप्रदायिक चरित्रकार जर चरित्रविषयास देव बनवील तर विरोधी चरित्रकार त्यास दैत्य ठरवील. परमाणूएवढा गुण पाहिला तर,त्याचा पहिला जर पर्वत करील,तर उलट दुसरा 'कुसळा' एवढा दोष असला,तर तो 'मुसळा' एवढा फुगवील. एकूण काय,पहिल्या पध्दतीत देवीकरणाचा तर दुस-या पध्दतीत दानवीकरणाचा पण अतिरेकच दृष्टीस पडावयाचा.