नामदार गोखले-चरित्र 99
हिंदुस्तानात आता नवीन मनू उदयास येत होता. लढाई सुरू झाली होती. देशातील लोक शांत व निष्ठापूर्ण होते. लो. टिळकांस कैदेतून नुकतेच ३४ महिन्यांपूर्वी मुक्त करण्यात आले होते. सर्व लोकांनी या युध्दप्रसंगी सरकारास सहाय्य करावे असे टिळकांनी जाहीर केले होते. पूर्वीची स्थिती पालटली होती. लढाई सुरू आहे, या लढाईत आपण योग्य ते साहाय्य केले तर आपणास इंग्लंड भरभक्कम सुधारणा देईल असे टिळकांस वाटत असावे. परिस्थितीप्रमाणे टिळक मार्ग आंखीत. त्याचप्रमाणे ते कैदेत गेल्यापासून राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय सभेपासून अलग राहिला होता. १९१० साली गोखल्यांनी समेट करण्याचा प्रयत्न केला तरी तो सफल झाला नाही. नेमस्त पक्षाबरोबर ते सहकार्य करतील अशो लोकांस- नेमस्त लोकांस- आशा वाटू लागली. टिळकांनी आपल्या घरी राष्ट्रीय पक्षाची सभा भरविली. सर्वांचे म्हणणे काय पडले ते अजमावले आणि भेटीस येणा-या बेझंट व सुब्बाराव यांस काय सांगावयाचे हे मनात ठरवून ठेवले. सुब्बारावांची व टिळकांची गाठ पडली. समेटाचा ठराव व नवीन पक्षास राष्ट्रीय सभेत येण्यास अपमान न वाटावा म्हणून काही जुन्या अटी वगळणे ही कामे बेझंटबाई करणार होत्या. काँग्रेस होईपर्यंत टिळकांचा समेट होणार असे सर्वत्र ध्वनित झाले. गोखल्यांसही वाटत होते की, टिळक खरोखरीच समेट इच्छितात. परंतु सरकारास शक्य तितका विरोध करण्यातंच मख्खी आहे हा टिळकांच्या अंतरंगीचा विचार जेव्हा गोखल्यांस समजला तेव्हा त्यांनी भूपेंद्रनाथांस एक गुप्त पत्र लिहिले. हे पत्र भूपेंद्रनाथांस काँग्रेसच्या कामासाठी निघाले असताना वाटेत मिळाले. अर्थात ही बातमी त्यांच्या बरोबर असणा-या सर्व लोकांस समजली. बेझंटबाई सात डिसेंबर रोजी पुण्यास आल्या. त्यांस राष्ट्रीय पक्षाचे जे मत ठरले होते ते सांगण्यात आले. त्या काँग्रेसमध्ये कॉन्स्टिट्यूशनची दुरुस्ती करणारा ठराव आणणार होत्या. मसुदा सुध्दा गोखल्यांनीच बेझंटबाईस करून दिला. परंतु गोखल्यांची बुध्दी फिरली. टिळकांमध्ये त्यांस काळेबेरे दिसून आले. गोखल्यांनी एक पत्र पाठवून त्यांत 'टिळक हे आयरिश लोकांचे अडवणुकीचे मार्ग स्वीकारणारे आहेत' असे सुब्बारावांस सांगितले. या पत्रांत दुसराही नालस्तीचा मजकूर असावा. कारण बसू गोखल्यांस लिहितात, 'हे पत्र विषयनियामक कमिटीत मांडण्यासारखे नाही तरी दुसरे एक पत्र पाठवा.' तदनुरोधाने गोखल्यांनी दुसरे पत्र पाठविले. विषयनियामक कमिटी भरली. सर्व मंडळी समेटास अनुकूल होती. परंतु 'Boycott of Government हे शब्द वाचल्याबरोबर सर्व मंडळी स्तिमित झाली; बेझंटबाईंनी टिळकांस तार करून खुलासा मागविला. 'सरकारवर बहिष्कार टाका असे मी कधीच म्हटले नाही. राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख लोक म्युनिसिपालिट्यांतून वगैरे कामे करीतच आहेत,' - असे टिळकांनी उत्तर पाठविले. हे उत्तर आल्यावर बसूंनी टिळकांवर न कळत आरोप केल्याबद्दल दोनतीनदा माफी-दिलगिरी प्रदर्शित केली. या प्रकारे समेटाचे बोलणे कालावधीवर ढकलण्यात आले.
हे सर्व प्रकरण अमृतबझार पत्रिकेने चव्हाट्यावर मांडले. केसरीच्या ९ फेब्रुवारीच्या अंकांत 'चोराच्या उलट्या बोंबा' या नावाखालील अग्रलेखात ज्ञानप्रकाशकार व गोखले यांच्यावर सणसणीत टीका झाली. गोखल्यांनी हे आडवेतिडवे मार्ग का शोधिले हे एक गूढच आहे. समेटाची सर्व चर्चा उघडी चालली होती. अमृतबझार पत्रिकेने तर 'गुप्त घाला' असे अन्वर्थक विशेषण या कृत्यास दिले. गोखल्यांस पत्र प्रसिध्द करा असे सांगण्यात आले. पण ते करीनात. ते येवढेच म्हणत की, 'Boycott of Government' हे शब्द माझ्या पत्रात नव्हते. 'मग कोणते ते का नाही सांगत?' पक्षाचा सवाल होता. गोखल्यांचे चेले ज्ञानप्रकाशांतून नुकतीच सहा वर्षांची हद्दपारी भोगून आलेल्या या महानुभाव देशभक्तावर इतकी अश्लील व कठोर टीका करू लागले की, ती वाचणे सुद्धा जिवावर येई. शेवटी ९ फेब्रुवारीच्या केसरीत यावर अग्रलेख येऊन सर्व बातमी प्रसिद्ध झाली. Boycott of Government हे शब्द टिळकांनी पूर्वी १९०७ मधील कलकत्त्यास दिलेल्या व्याख्यानात योजिले होते; त्यांची त्या वेळेची मते आज बदलली असतील असे आम्हांस माहित नव्हते असेही गोखलेपक्षी पत्रे म्हणू लागली. परंतु या समर्थनाच्या प्रयत्नावरून गोखल्यांनी ते शब्द पत्रांत योजिले होते हे मात्र सिद्ध होते. ज्या व्याख्यानाचा उल्लेख ज्ञानप्रकाश देतो ते व्यख्यान कलकत्त्याच्या वृत्तपत्रांनी निराळ्याच शब्दात दिले आहे! खेरीज प्रत्यक्ष गोखल्यांनी १९०७ मधील दौ-यात करबंदी सुद्धा जर सनदशीर धरली आहे. तर टिळक काही त्यापुढे गेले नव्हते! कर न देणे म्हणजे सरकारवर रुसणे नव्हे काय ? आणि १९०७ मध्ये गोखले असे म्हणाले म्हणून मवाळ गोटातून ते थोडेच बाहेर आले? मनुष्य बोलेल पुष्कळ; परंतू काय करावयाचे ते तो परिस्थिती प्रमाणेच ठरवितो परिस्थिती अनुकूल असता लोकांची तयारी असती, तर गोखल्यांनी करबंदीची चळवळ हातांत घेतली असती. सारांश काय १९०७ सालच्या या एका व्याख्यानावरून काहीच सिद्ध होत नाही. तुरूंगवासाने पूर्वीची मते बदलण्याइतके कच्च्या दिलाचे टिळक नव्हते. ‘कोणीकडून तरी टिळकांस सळो का पळो करून सोडावयाचे असेच निदान गोखल्यांच्या अनुयायांस तरी वाटणार. टिळकांस कोणीकडून तरी मारावयाचे, आणि ते सरकारच्या विरुद्ध आहेत असे जाहीर केले म्हणजे आयतीच त्यांची वाट लागेल यापेक्षा यांचा दुसरा विचार नसतो. पण या सदगृहस्थांस आमचे येवढेच सांगणे आहे की, आता हा धंदा पुरे झाला.’ या केसरीच्या उद्गारात थोडेफार सत्य आहे असे आम्हांस वाटते.
१६ फेब्रुवारी १९०५ च्या केसरीत गोखल्यांचे ज्ञानप्रकाशांत प्रसिद्ध झालेले पत्र आणि त्यास टिळकांचे उदार उत्तर ही आली आहेत.
सुब्बाराव प्रथम मुंबईस मवाळांचे म्हणणे काय आहे ते ऐकावयास गेले होते. तेथे त्यांस यश येईल असे दिसतच नव्हते. कारण प्रतिनिधी निवडून पाठविणे त्यास पसंतच पडले नसते. सुब्बारावांचे आणि टिळकांचे भाषण ते मुंबईहून परत आल्यावर झाले. ते ८ डिसेंबर रोजी परत आले. ते गोखल्यांकडेच उतरले होते.