नामदार गोखले-चरित्र 66
या गोखल्यांच्या अर्थपूर्ण शब्दांचा मिंटोच्या मनावर योग्य तो परिणाम झाल्याविना राहिला नसेल असे आम्हांस वाटते.
कौन्सिलमधले काम आटोपून गोखले स्वत:च्या जबाबदारीवर पुन: तिस-याने इंग्लंडला निघून गेले. मोर्लेमिंटोची कारकीर्द सुरू झाली होती. हिंदुस्तानास काही तरी नवीन राजकीय हक्क मिळणार अशी दाट वदंता होती. गोखले १९०५ मध्ये जेव्हा इंग्लंडमध्ये होते तेव्हाच त्यांच्या मित्रांनी त्यास इंग्लंडमध्ये येण्यास सुचविले होते. त्या वेळेस त्यांनी सार्वजनिक अशी भाषणे वगैरे केली नाहीत. त्यांचे काम आतून-भेटी, मुलाखती यांच्या रूपाने चालले होते.
गोखले इंग्लंडला गेले परंतु इकडे हिंदुस्तानात कोण हलकल्लोळ सुरू झाला! सर जे. बॅम्फील्ड फुल्लर हे बंगालमध्ये दंडुकेशाही गाजवीत होते. दडपशाहीला ऊत आला होता. सरकार केवळ निष्ठुर बनले होते. या फुल्लर साहेबांच्या हाताखालचे अधिकारीही त्यांस शोभेसेच होते. इतक्यात सर्वांचे लक्ष बारिसालकडे वेधले. वारिसालमध्ये काय बरे चालले होते? बाबू अश्विनीकुमार दत्तांसारख्या लोकप्रिय पुढा-यांच्या नेतृत्वाखाली तेथे बहिष्काराची चळवळ जोरात चालू होती. या वाढत्या चळवळीचे अधिका-यांस वैषम्य वाटू लागणे साहजिक होते. लवकरच खुद्द बारिसाल येथे प्रांतिक सभा भरण्याचे धाटत होते. अविचारी लोक एक अडचण दूर करण्यासाठी दुस-या हजार निर्माण करतात. सरकारचे तसेच झाले. अत्यंत शांतपणे बारिसालच्या रस्त्यातून पुढा-यांची मिरवणूक चालू होती तरी पोलिसांनी पुढा-यांचा अपमान केला. सन्मान्य लोकांवर काठीचा प्रयोग झाला. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या हुकुमाने सुरेंद्रनाथांस गिरफदार करण्यात आले. मॅजिस्ट्रेटने सुरेंद्रनाथांचा अपमान केला तेव्हा सुरेंद्रनाथांनी त्यांचाही केला. ताबडतोब सुरेंद्रनाथांस दंड ठोठावण्यात आला. सभा बिगरपरवाना भरलेली असल्यामुळे या सभेस हजर राहण्याबद्दल त्यांस दुसरा एक दंड ठोठावण्यात आला. मॅजिस्ट्रेटने दाखविलेला हा व्यक्तिद्वेष लोकांच्या मनांस जास्त चिडविण्यास कारणीभूत झाला. परंतु येवढ्यानेच काय झाले? इमर्सन साहेबांनी सभा उधळून लाविली. ही गा-हाणी फुल्लर साहेबांस दूर करिता आली असती. मागील आठवणी, व्रण बुजविता आले असते. परंतु फुल्लरांनी फूस दिली. गुरखे आणि पोलीस शहरावर सोडण्यात आले. लोकांस दहशत घालणारी सरकारी अधिका-यांची भाषणे, कडक जाहीरनामे, शाळेतील विद्यार्थ्यांवर खटले यांचे सत्र सर्रहा सुरू झाले. हायकोर्टाच्या निकालांनी, किंवा मोर्ले साहेबांच्या शिफारशींनी या गोष्टी कमी झाल्या नाहीत. परंतु इतक्यात एकदम फुल्लर साहेब यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्याचा खुलासा मोर्लेसाहेबांनी आपल्या आठवणीत केला आहे. सिराजगंज येथील शाळांतील काही विद्यार्थ्यांस बंडखोर वर्तणुकीबद्दल गुन्हेगार ठरविण्यात आले. ज्या शाळांत ही मुले होती त्या शाळांचा कलकत्ता युनिव्हर्सिटीशी असलेला संबंध युनिव्हर्सिटीने तोडून टाकावा असे फुल्लर साहेबांनी युनिव्हर्सिटीला फर्मावले. या वेळेस हिंदुस्तान सरकार मध्ये पडले. युनिव्हर्सिटीचे नवीन कायदे होईपर्यंत थांबा असे हिंदुस्तान सरकारने फुल्लरांस लिहिले. परंतु फुल्लर फुगले. त्यांनी 'मी जसे लिहिलेले आहे तसे युनिव्हर्सिटीने वागलेच पाहिजे, नाही तर माझा राजीनामा मंजूर करा,' अशी धमकी दिली. परंतु आश्चर्य हे की, त्यांचा राजीनामा ताबडतोब मंजूर करण्यात आला. फुल्लर साहेब जेव्हा विलायतेत मोर्ले यांच्या मुलाखतीस गेले तेव्हा ते म्हणाले, 'माझा राजीनामा मंजूर होईल असे माझ्या ध्यानीमनीही नव्हते.' मोर्ले साहेबांनी पटकन उत्तर दिले. 'I don't believe it is for the good of prestige to back up every official whatever he does, right or wrong.' 'अधिका-याने काहीही केले तरी त्याची प्रतिष्ठा राहण्यासाठी त्याच्या प्रत्येक कृत्याचे समर्थन करणे इष्ट नाही.
फुल्लर साहेब हिंदुस्तानात हलकल्लोळ करीत असताना, गोखल्यांनी इंग्लंडमध्ये त्यांच्या विरुध्द चळवळ केली. अशा अधिका-यास कामावरून दूर करा, अशी त्यांनी आग्रहाची, निकडीची विनंती केली. या फुल्लर साहेबांबद्दल मोर्ले लिहितात:-
"He was quite well-fitted for Government work of ordinary scope, but I fear, no more fitted top manage the state of things in E. Bengal than am I to drive an engine.'' 'माझी आगगाडीचा ड्रायव्हर होण्याची जितकी लायकी, तितकीच पूर्व बंगालचा कारभार पाहण्यासाठी फुल्लरांची लायकी होती. सरकारचे साधारण काम मात्र त्यांस चांगले करता आले असते.' स्वत: मोर्ले साहेबांचे जर हे मत तर हिंदुस्तानांतील लोकांचे या साहेबबहादुराविषयी काय मत झाले असेल?