नामदार गोखले-चरित्र 96
गोखले आपली कामगिरी आटोपून परत हिंदुस्तानास आले, मुंबईस त्यांच्या अभिनंदनार्थ जाहीर सभा भरली होती. थोड्याच दिवसांनी गोखले बंकीपूरच्या काँग्रेसला निघून गेले. १९१२ च्या बंकीपूर काँग्रेसमध्ये गोखल्यांनी दक्षिण- आफ्रिका व इतर वसाहतीतील एतद्देशीय यांच्याविषयी ठराव मांडला. हिंदी लोकांचे कोणतेही हक्क आम्ही सोडले नाहीत किंवा हिंदी लोकांनी तिकडे जाण्याबद्दलचा प्रतिबंध तितकासा कबूल केलेला नाही. परंतु मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने सध्या जे लोक तेथे आहेतच त्यांच्या गैरसोयी व गा-हाणी दूर करण्याचा प्रयत्न आधी केला पाहिजे असे गांधींना व मला- दोघांसही वाटले. अडचणीशिवाय येणे वा जाणे, एका प्रांतातून दुस-या प्रांतास मोकळेपणाने जावयास मिळणे, जेथे मनास आवडेल तेथे वस्ती करणे, अडथळा न येता उद्योगधंदा करावयास मिळणे, शिक्षणासाठी सरकारी मदत मिळणे, म्युनिसिपालिटीत व राज्यकारभारात मतदानाचा अधिकार मिळणे, सरकारी नोकरी व इतर सार्वजनिक कामे करण्यास आडकाठी नसणे-वगैरे सर्व गोष्टींचा गा-हाणी नाहीशी करण्यात समावेश होतो. शेवटी गोखले म्हणाले, 'The duty of Indians in India was to support and encourage their country-men in S. Africa as important issues affecting, their whole status as an empire were involved in the struggle.' या राष्ट्रीय सभेमध्ये गोखल्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील कामगिरीचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला, आणि त्यांच्या आभारप्रदर्शनार्थ ठराव पास करण्यात आला.
हे सर्व झाले तरी मेथादिक मंडळी या कामगिरीविषयी साशंक होती. मेथा तर गोखल्यांचे मुंबईस स्वागत झाले त्या वेळेस हजरही राहिले नाहीत. कारण गोखले हात हालवीतच परत आले असे त्यांस वाटले. गोखल्यांनी बोथादिकांजवळ लेखी वचन मागितले होते. परंतु त्या मुत्सद्दीत्रयाने ते म्हणणे लांबणीवर टाकले. गोखल्यांचा गोडपणा, सरळपणा, भोळेपणा येथे नडला. आपल्यासारखेच सर्व सत्याचे पुतळे आहेत, आपल्या शब्दास मान देतील. असे ते घेऊन चालले. परंतु मुत्सद्दी केसाने गळा कापणारे असतात याची गोखल्यांस जाणीव नव्हती. लोक कसे कारस्थानपटू असतात याचा इंगा गोखल्यांस जाणीव नव्हती. लोक कसे कारस्थानपटू असतात याचा इंगा गोखल्यांस अद्याप कळला नव्हता. गोखले तोंडी अभिवचनावर संतुष्ट राहिले, परंतु ही घोडचूक झाली. सत्यावर विश्वास ठेवू नये या स्वत:च्या शब्दांस इंग्रजांनीच काही किंमत ठेविली नाही. या बोटावरची थुंकी या बोटावर करणारे हे जे आपले जातभाई त्यांसही मेकॉले साहेबांनी सत्यप्रिय म्हणून गोंजारले असते काय? याशिवाय गोखल्यांची मुत्सद्देगिरी लोकांस पसंत नसल्याचे दुसरे कारण म्हणजे नुसता तीन पौंड डोईपट्टीचा कर बंद करणे म्हणजे काही मोठे शतकृत्य करणे नव्हे. इतर हजारो बाबीत अन्याय सर्रहा सुरूच राहणार होता! परंतु गोखल्यांचे या बाबतीतील धोरण चांगले होते. सर्व अन्याय दूर होईपर्यंत आफ्रिकेतील आपल्या बांधवांस तुरुंगात रखडत ठेवावयाचे का एकेकाच्या गळ्याभोवतालच्या फास सोडवावयाचा! मुंबईत, पुण्यात आरामखुर्चीवरून राजकारणाचा सवा हात लांब बाता झोकणा-यांस आफ्रिकेतील मजुरास काय हालअपेष्टा भोगाव्या लागत असतील, याची कल्पनाच येणे शक्य नाही. तुरुंगात गेलेल्या हजारो बायका-पोरांस आधी बाहेर तर येऊ द्या, मग पुढील प्रश्नास हात घालू. परंतु खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असला मामला गोपाळरावांस पटत नसे. तेव्हा गोपाळराव तीन पौडांची डोईपट्टी उठवूनच तात्पुरते संतुष्ट झाले. जर ते तसे करते ना, तर येवढेही झाले नसते. साउथ सरकारने केलेल्या स्वागताने गोखले मिंधे बनले नव्हते. असा पाहुणचार करणा-या सरकारास कसे दुखवू हाही प्रश्न त्यांच्या मनात नसावा. काही असो, गोपाळरावांवर हिंदुस्थानात पुष्कळ ठिकाणी टीका झाली खरी. मेथांस गोखल्यांचा मवाळपणा व लेखी वचन न मागण्यात झालेला गबाळेपणा ही आवडली नाहीत. त्यांनी गोखल्यांस दोष दिला. शेवटी गोखले फसले असेच सर्वांस वाटले. गोखल्यांनी लेखी वचन घेण्याचा बाणेदारपणा दाखवावयास पाहिजे होता. लेखी वचन आणूनही जर आपले अभिवचन वसाहत- सरकारने पाळले नसते तर जगाला या सरकारचा नैतिक अध:पात सप्रमाण दिसला असता, अगर दाखवता आला असता. हे वचन कितपत पाळले गेले हे पुढे येईलच. हे काम करून गोखले येतात तो पब्लिक सर्व्हिस कमिशनचे काम वाट पाहतच होते. हे काम अत्यंत दगदगीचे व फार जिकिरीचे होते. रोज सहा सहा तास साक्षी ऐकून नंतर घरी त्यावर विचार करून साक्षीदारांची पुन: उलट तपासणी करावयाची! रात्री दोन दोन वाजेपर्यंत गोपाळरावांनी काम केले! १९१२- १३ च्या हिवाळ्यात हे कमिशन सर्वत्र हिंडले. सर्व हिंदुस्तानभर, आणि ब्रह्मदेश वगैरे ठिकाणीही जाऊन माहिती आणि पुरावा गोळा करण्यात आला. काम किती करावयाचे प्रश्न नसे. जे करावयाचे ते उत्तम व जबाबदारपणे कसे पार पडेल इकडेच लक्ष होते. या पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये त्यांस किती त्रास होत असे याविषयी एकदा ते अमृतबझार पत्रिकेच्या संपादकांजवळ सहज बोलले : ''मला बिलकूल विश्रांती मिळत नसून या कमिशनातील माझ्या प्रतिपक्ष्यांशी कसे झगडावे हाच विचार रात्रंदिवस माझ्या डोळ्यांपुढे घोळत असतो. माझे प्रतिपक्षी पुष्कळ असून त्यांना तोंड देणारा असहाय असा मी एकटाच आहे. या कमिशनचे काम पूर्ण होईपर्यंत मी जगेन असे मला वाटत नाही. तरी माझे कर्तव्य मला करावयाचे असून त्यात मला मरण आले तरी पत्करेल.'' १९१३ च्या पूर्वार्धात हिंदुस्तानातील निम्मे काम संपवून कमिशन आक्टोबरमध्ये लंडन येथे भरत असे. इंग्लंडमध्ये काम चालले असता तिकडे युनियन सराकारने फक्त स्त्रियांवरची डोईपट्टी उठविली, परंतु नवीन कायद्याने प्रतिवर्षी स्त्रियांस परवाना काढावा लागेल असे ठरविण्यात आले. एवंच या डोईपट्टीऐवजी दुसरा कर आला. ही बातमी विजेसारखी सर्वत्र पसरली. गोखले चुकले! त्यांची मुत्सद्देगिरी फोल ठरली!! वसाहत- सरकारच जगात शहाणे ठरले. ढोंगी आणि आपमतलबी वसाहत सरकारने गोडीगुलाबीने गोखल्यांस भुलवून थापेबाजी केली. १९१३ च्या एप्रिलमध्ये युनियन सरकारने आपल्या पार्लमेंटपुढे वर सांगितलेल्या नवीन कायद्याचे बिल पुढे आणले. या नवीन बिलाने गांधी आणि गोखले या द्वयास दिलेली वचने मोडण्यात आली. बायकांवरील तीन पौंड तेवढे नाहीसे करून ते भरून काढण्याची नवीन शक्कल त्यांनी काढली होती, आफ्रिकेतील हिंदी पुढा-यांनी गोपाळरावांस विलायतेत तार करून विचारले की, ''फक्त स्त्रियांवरचीच डोईपट्टी नाहीशी करण्याचे तुम्ही अभिवचन घेतले होते काय?'' गोखल्यांनी उत्तर दिले, ''हा कायदा संपूर्णपणे रद्द करण्यात येईल असे वचन मला मिळाले होते.'' परंतु युनियन सरकार काहीच खुलासा करीना. 'मौनं सर्वार्थसाधनम'' हेच चांगले असे त्याने जाणले! गोखल्यांचे म्हणणे खोडून काढण्याच्या भरीस न पडता आपला कार्यक्रम त्यांनी सुरू ठेविला. बर्फचा उपदेश त्यांस कसा रुचणार ? बर्क म्हणे, ''That Asiatic nations have rights and that Europeans have obligations,, that a superior race is bound to observe current morality of the time in all its dealings with its subjects race.'' परंतु या उपदेशाचे या निगरगट्टांस काय होय? वचन मोडण्याचा त्यांचा अव्याहत क्रम होता. जे नीतिज्ञान हिंदुस्तानात दाखविण्यात येत असे तेच प्रचलित व परंपरेने पवित्र गणलेले वचनभंगाचे नीतितत्त्व वसाहतवाल्यांनीही पूर्णपणे अंमलात आणले.