नामदार गोखले-चरित्र 79
या संस्थेसाठी गोपाळरावांनी पैसे कसे मिळवले हे त्यांचे त्यांनाच माहीत, त्यांना फार श्रम झाले, अत्यंत दगदग झाली. परंतु पोटच्या पोरापेक्षाही संस्था त्यांना प्यारी. स्वत:चे स्मारकच त्यांनी जणु उभारून ठेवले. आपले कर्तृत्व, आपली ध्येये, आपले जीवनसर्वस्व त्यांनी येथे ओतले, गोखल्यांस मुंबईच्या धनिक लोकांचा पाठिंबा चांगलाच असे. पारशी समाजातही त्यांचे वजन होते. गोखल्यांनी पैसे मागितले म्हणजे त्यास नकार कोण दाखविणार? अशा प्रकारचा नि:संग भिकारी दारी येणे म्हणजेच खरोखर भाग्य! गोखले पुष्कळदा स्वत:च वाटेल तो आकडा घालून श्रीमंत शेटजीकडे पाठवीत व लगेच शेटजीकडून पैसे येत. तुम्ही पैशाचे काय करता असे कोण विचारील? त्याशिवाय जोपर्यंत वरिष्ठ कायदे- कौन्सिल कलकत्त्यास होते, तोपर्यंत दरवर्षी कौन्सिलच्या बैठकीहून परत येताना गोपाळराव धनसंपन्न बंगाली जमीनदारांकडून व लक्षाधीशांकडून दहावीस हजार रुपये घेऊन यावयाचे. गोपाळराव जोपर्यंत ह्यात होते तोपर्यंत पुष्कळ बंगाली लोक दरवर्षी नियमाने पैसे पाठवीत असत. गोखल्यांच्या या भारतसेवक समाजासाठी इंग्लंडातील एका गरीब बाईने एक गिनी पाठवून दिली होती. राजवाडे यांच्या ग्रंथप्रकाशनासाठी चिपळूणच्या एका गरीब माणसाने असेच एकदा चार आणे दिले होते. गोपाळरावांस त्या गिनीचे फार कौतुक वाटले व ते म्हणाले, 'This is real affection' यांनाच कामाची माहिती खरी समजली. आता संस्थेला कायमचे स्वरूप आले आहे. निसर्गसौंदर्य, शुध्द हवा, गावापासून जरा दूर जागा, राजकीय स्वरुपाच्या ग्रंथांचा, रिपोर्टांचा, सर्व प्रकारच्या कागदपत्रांचा व उत्तमोत्तम ग्रंथांचा संग्रह व निरनिराळ्या वर्तमानपत्रांच्या फायली, मासिके अशी येथे सर्व जय्यत तयारी आहे. काम करणा-याला येथे पूर्ण वाव आहे. इच्छा व उद्योग यांची जोड मात्र लाभली पाहिजे. नाही तर जड पुस्तकांचा काय फायदा?
गोपाळरावांच्या भारतसेवक समाजाचे हे पहिले अधिवेशन पार पडत असता सर्व देशाला आग लागली होती. बाबू बिपिनचंद्र पाल हे मद्रासच्या समुद्रकिना-यावर आपल्या जळजळीत व्याख्यानांनी तरुणांची मने पेटवून देत होते. पालबाबूंचे अमोघ व अटूक परिणामकारी वक्तृत्व आणि तरुण लोकांची उत्साही व भावनापूर्ण मने, मग काय विचारता? वक्तृत्वाने केलेले असे परिणाम हिंदुस्तानच्या इतिहासात अपूर्व होत. ज्या धोक्याची सूचना कौन्सिलमधील भाषणात गोखल्यांनी दिली होती, ती संकटे भराभर येऊ लागली. वक्तृत्वाचा गडगडाट आणि ओजस्वी, तेजस्वी लेखणीचा चमचमाट देशातील स्थिती कशी आहे आणि वारा कोणत्या दिशेने वाहत आहे हे दाखवू लागला. कोठे ना कोठे सर्वत्र धामधूम चालू होती. खुद्द मुंबईमध्ये मुंबईच्या म्युनिसिपालिटीचे केवळ जीव की प्राण जे मेथा, त्यांच्यावर अधिकारी वर्गाने काही लोकांस खाकोटीत घेऊन गिल्ला चालविला होता. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी मुंबईस जंगी जाहीर सभा भरली होती. गोपाळराव तेथे अध्यक्ष झाले.
या गडबडीत असता गोपाळरावांवर एक अकल्पित कौटुंबिक आपत्ती कोसळली. त्यांचे वडील बंधू गोविंदराव - ज्यांनी त्यांस वडिलांच्या मागे शिक्षणाची गोड फळे चाखविली व वडील आहेत की नाहीत याची स्मृतीही होऊ दिली नाही, असे पितृतुल्य बंधू हा लोक सोडून २१ जून १९०७ रोजी गेले. घरी गरिबी होती तरी गोपाळास त्यांनी कधी उणे पडू दिले नव्हते. असा उदार मनाचा, प्रेमळ भाऊ मरण पावल्यामुळे हळूवार मनाच्या गोपाळरावांस फार शोक झाला. त्यांच्या मनाला धक्का बसला. भावाच्या मुलांमाणसांस आता गोपाळराव हेच आधार होते. देशातील बिकट परिस्थितीमुळे त्यांस चार अश्रू ढाळण्यासही फुरसत नव्हती.
पंजाबमध्ये असंतोषाच्या लाटा उसळत होत्या. कॉलनायझेशनचे बिल व लँड ऍक्विझिशन बिलांच दुरुस्ती करण्याचे बिल यांनी पंजाबात फार खळबळ माजली. लोकांस संताप आला. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. लाला लजपतराय व अजितसिंग या दोन पुढा-यांना अटक करण्यात येऊन त्यांस शिक्षा झाली.