नामदार गोखले-चरित्र 13
हे जित-जेत्यांचे सामने फार उदबोधक असतात. प्रत्येक देशाचा इतिहास मुक्तरवाने हेच सांगतो की, 'बाबारे, मी असाच तुडविला जात होतो, परंतु धीराने आणि शौर्याने धीर खचू न देता आम्ही स्वातंत्र्याची पुनरपि प्राप्ती करू घेतली आहे.' अमेरिका, इटली, नेदर्लंड या सर्व राष्ट्रांचा इतिहास हीच गोष्ट शिकवतो. कित्येक राष्ट्रांनी झगडून, रक्त शिंपडून, पवित्र स्वातंत्र्य, ईश्वरदत्त हक्क पैदा केले खरे, परंतु आपली पूर्वीची स्थिती पार विसरून दुस-या गरीब राष्ट्रांवर जेव्हा ही राष्ट्रे गुरगुरू लागतात तेव्हा मन खिन्न होते व आशा मरून जाते. ज्या जपानने आपली सर्वांगिण उन्नती करून घेतली तेच जपान आज कोरियात धांगडधिंगा घालीत आहे. त्यास जर अमेरिकेने मज्जाव केला तर त्यास वाईट वाटण्याचे काय कारण? मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आपणावर बेतल्याखेरीज दुस-याची वेदना समजत नाही. आपला पाय विस्तवावर पडून भाजला म्हणजे ज्यास मी विस्तवावरून ओढीत आणीत होतो त्याचीही माझ्यासारखी दशा झाली असेल असे लक्षात येते. परंतु ही जाणीव सुज्ञ असेल त्यास होईल. ज्या अमेरिकेने इंग्लंडबरोबर युध्द पुकारून अभंग चिकाटीने स्वातंत्र्य मिळविले, ज्याचे वॉशिंग्टनसारख्यांनी संगोपन केले, लिंकनसारख्यांनी वर्धन केले तीच अमेरिका नीग्रोंवर जुलूम करिते आणि परकी देशांस मज्जाव करिते. ज्या इंग्लंडने स्वातंत्र्यासाठी विष्णु्स्वरूप राजाची आहुती दिली तेच इंग्लंड दुस-या राष्ट्रावर सत्ता गाजवून दडपशाही व दंडेली चालविते याची उपपत्ती काय? उपपत्ती हीच की, मनुष्यमात्र स्वार्थी आहे. थोडेफार महात्मे सोडून दिले तर प्रत्येकजण दुस-यास लुबाडू पाहणार. हीच वृत्ती जगाच्या इतिहासात आपणास दिसते. लुबाडणारा सवाई चोराकडून जेव्हा स्वत: लुबाडला जाऊ लागतो तेव्हा मग त्यास ब्रह्मज्ञानाची उकळी फुटते. तो मोठमोठी गहन तत्त्वे सांगू लागतो. लुटला जाणारा लुटारूस विरोध करू लागतो, परंतु नागवला जाणारा केव्हा असहाय्य व नि:शस्त्र असतो तेव्हा खरी कसोटी असते. या असमान सामन्या लुटले जाणा-यांचे जे पुढारी असतात त्यांच्या परीक्षेची वेळ असते. त्यांना निराळेच मार्ग आखावे लागतात. शस्त्रास्त्रे बाजूस ठेवून आपली सर्वांगिण उन्नती करून लुटारूस सांगावयाचे :'मी तुझ्या बरोबरीचा आहे; माझे हक्क मला मिळाले पाहिजेत.' ज्यांची आज हिंदुस्थानावर सतत आहे त्यांची विद्या, त्यांचे उद्योग हे आपण आपलेसे केले पाहिजेत. ज्यांस सर्व साधने अनुकूल त्यांच्याबरोबर आपणांस झगडावयाचे आहे. आपल्यांतील शक्य त्या उणीवा आपण नाहीशा करण्याच्या प्रयत्नात लागणे हे प्रथम कर्तव्य आहे. आपणांस कष्टप्रद स्थिती आली आहे तिचे नुसते वाईट वाटून काय बरे फायदा? आपण फार श्रीमंत होतो; आज दुबळे झालो आहो. सुख भोगून मग दारिद्रय येणे फार वाईट. आमचा देश वैभवाच्या शिखरावर होतो तो आज खोल दरीत आहे. ज्या आमच्या देशात सतत सुबत्ता असावयाची. त्या आमच्या सुंदर देशास आज अर्धपोटी राहावे लागते अशी हलाखीची स्थिती आली आहे खरी. परंतु अंतरी तळमळून फायदा नाही. डोळयांत अश्रू आणून आणि ढोपरात मान घालून आलेली स्थिती थोडीच पालटणार आहे? रडावयास वेळ नाही. डोळयांतील अश्रू डोळयांतच आटू द्या. परिस्थितीचा विचार करून तिला बदलण्यासाठी, जेथे श्मशान आहे तेथे नंदनवन निर्माण करू या आत्मप्रत्ययाने, कामास लागा. देशाची सध्याची स्थिती ही सत्त्वपरीक्षा आहे. या सत्त्वपरीक्षेत सोज्ज्वलपणे आपण उत्तीर्ण झाले पाहिजे. श्रियाळशैब्यांचे आपण वंशज, ज्ञानेश्वर- नामदेवांचे वारसदार आहो. आपण डगमगून चालणार नाही, आणि उतावीळपणाने अहितकारक गोष्ट करता कामा नये. वाइटातून चांगले बाहेर पडते. आपली परकीयांशी गाठ पडली यात परमेश्वरी सूत्र आहे; काही तरी हेतू आहे. नवीन प्रकाश आपणास मिळावा, नवीन दृष्टी आपणास यावी म्हणून ही ईश्वरी घटना आहे. तो प्रकाश आपलासा करू या. धीर सोडता कामा नये. धीर कोण सोडतो? ज्याला काही करावयाचे नसते तो. आपण सर्व बाजूंनी उचल केली पाहिजे. सर्व बाजूंनी खुंटया मारीत जाऊन जागा व्यापून टाकिली पाहिजे. हा धडा ज्याने राष्ट्रास शिकविला, निराश झालेल्यास आशेचा घोट पाजला- किरण दाखविला, बिगलित व हतबल झालेल्यास हात देऊन उठण्यास लाविले, मृतांस चैतन्य दिले. सचेतनास स्फूर्ती दिली, स्फूर्तियुक्तांस कृती करावयास लाविले, त्या न्या. रानडयांचे देशावर किती उपकार आहेत ते सांगता येत नाही. त्यांचेच उदाहरण हरहमेश डोळयांसमोर ठेवून, त्यांची शिकवणूक हृदयात ठसवून, मुरवून, ज्यांनी आपला सर्व जन्म मायभूमीच्या उध्दारासाठी खर्च केला, सुखाची कास धरिली नाही, दु:खाची पर्वा केली नाही, जे स्तुतीने मोहित झाले नाहीत, ज्यांनी निंदेमुळे प्रारब्ध-कार्य सोडून दिले नाही, दुस-याच्या अंतरास ढका न लावता, परंतु स्वकर्तव्य न सोडता ज्यांनी जनता- जनार्दनाची आमरण सेवा केली त्या चिरंजीव भारतसेवक गोपाळराव गोखल्यांची आयुष्य- कथा पुढील लेखात निरूपण करावयाची आहे. या कथेला सर्वांच्या लिखाणाचा आधार घेतला आहे, मनोरंजन अंक, अभ्यंकर-चरित्र, फर्ग्युसन कॉलेज त्रैमासिक, वाच्छांनी लिहिलेल्या आठवणी, केसरीतील लेख, गोखल्यांचे लेख व व्याख्याने या सर्वांचा आधार घेतला आहे. याशिवाय श्री. मोदी यांनी लिहिलेल्या सर फेरोजशहा मेथा यांच्या चरित्रातील माहिती, मॉडर्न रिव्ह्यू, इंडियन रिव्ह्यू, यांचाही ठिकठिकाणी उपयोग केला आहे. त्या सर्वांच्या प्रस्तुत लेखक ॠणी आहे.