पत्र आठवे 9
ही अशी काँग्रेसची दृष्टि आहे. पाकिस्तानला महात्माजींनीं प्राणत्यागनेंहि विरोध करण्याचें ठरविले आहे. दहा हजार वर्षाचा अखंड भारताचा प्रयोग का धुळींत मिळवायचा? मुसलमानांनी अलग होणें हा हिंदुस्थानचा अपमान आहे. सर्व जाति, धर्म, संस्कृति यांना एकत्र नांदवण्याचा प्राचीन काळापासूनचा आपला प्रयोग का अर्धवट सोडायचा? छे:, महात्माजी तो प्रयोग पुढें नेतील. आणि सर्वांचा वाढता पाठिंबा मिळेल.
एक ' पाकिस्तान ' म्हणूं लागले-तर दुसरे ' हिंदू राष्ट्र ' म्हणून ओरडूं लागले. दोघांचे न कळत एकच धोरण. देशाचे तुकडे करण्याचें. पाकिस्तानमुळें ' हिंदूचा हिंदूस्थान ' जन्माला आला. आणि ' हिंदूओंकाहि हिंदुस्थान ' या घोषणेनें पाकिस्तानाला जोर चढला. दोन्हीं हातांची टाकी आहे ही ! एकानें गाय मारली, दुसरा वासरूं मारतो, हा खरा मार्ग नव्हें. काँग्रेसचा मार्ग हा खरा मार्ग आहे.प्रभु करो व भारतीय तरुणांस सदूबुध्दि देवो.
तुझा
श्याम