पत्र दहावे 4
वसंता, आपला हा देश चाळीस कोटींचा आहे. आपण मोठया देशांत राहतों. मोठया देशांत राहणा-यांवर जबाबदा-याहि फार असतात. आपणांस एक राष्ट्रभाषा शिकूनच भागणार नाहीं. इतर भाषांतीलहि थोडें थोडें ज्ञान पाहिजे. थोडें गुजराती, थोडें कानडी, थोडें बंगाली असें केलें पाहिजे.
महात्माजींजवळ ही दृष्टि आहे. महात्माजी पेशावरकडे गेले तर अधिक उर्दू शब्द वापरतात. ते काशीला बोलले तर संस्कृत शब्द अधिक असलेली हिंदी बोलतील. बंगालमध्यें गेले तर तेथील लोकांजवळ दोन चार तरी बंगाली वाक्यें बोलतील. महात्माजींनीं तेलुगु, तामिळ वगैरे भाषांतीलहि कांही शब्द पाठ करून ठेवले आहेत. त्या त्या प्रांतांत ते गेले तर थोडे थोडे त्यांचे शब्द ते वापरतात. येरवडयाच्या तुरुंगांत असतांना हा थोर राष्ट्रपिता मराठी शिकूं लागला ! मनाचे श्लोक पढूं लागला. महात्माजींच्या पत्रांत ' सेवाग्राम वर्धा-होकर ' असें नागरी लिपीत असतें वे उर्दू लिपीतहि असतें. उर्दू व नागरी दोन्ही लिप्या हिंदी मनुष्यास यायला हव्यात असें एकदां ठरलें ना, मग महात्माजींच्या पत्रावर तसें दोन्ही लिपींत लिहिलेलें आढळेल. किती ही राष्ट्रचिंता ! हिंदुस्थान हें अखंड राष्ट्र आहे. सारे प्रांत भाऊ भाऊ, हिंदु-मुसलमान एकत्र राहूं. हे ध्येय रात्रंदिवस डोळयापुढें ठेवून बारीकसारीक गोष्टीतहि लक्ष देऊन वागणारा महात्माजींसारखा दुसरा कोणता महापुरुष या देशांत आहे? माझे डोकें तर या सेवेच्या हिमालयासमोर रात्रंदिवस नमतें. परंतु रागोपालाचारी एकदां म्हणाले, '' देवानें महात्माजींची थोर देणगी आपणाला दिली, परंतु आपणच तिला पात्र नसूं कदाचित् !''
वसंता, आशुतोष मुकर्जीचें नांव तुला माहीत आहे का? आशुतोष म्हणजे बंगालचे एक अति थोर महान् सत्पुत्र. कलकत्याचे विद्यापीठ ही त्यांची निर्मिति. त्यांनीं बंगालमध्यें सर्वांगीण ज्ञानविकासाला चालना दिली. त्यांची बुध्दि असामान्य होती. वयाच्या सतराव्या वर्षीच गणितशास्त्रातील असें कांही सिध्दांन्त त्यांनीं सोडविले, जे रॅग्लरच्या परीक्षेत असतात ! डॉ परांजपे म्हणाले, '' हिंदुस्थानांतील एकागणितज्ञाच्या सिध्दान्तांचा आम्हांस अभ्यास करावा लागे व त्याचा आम्हांस अभिमान वाटे ! '' 'आशुतोष सिध्दांन्त' असें त्या सिध्दांन्ताचे नांव आहे.
एकदां हे सर आशुतोष कांही कामासाठीं मद्रासकडे गेले होते. एका मित्राकडे उतरले होते. त्या मित्रानें आपल्या मुलांना सांगून ठेवलें हातें की, ते बडे पाहुणे आले आहेत, त्यांना त्रास देऊं नका ! तो मित्र बाहेर गेला. आशुतोष काम करीत होते. ती मुलें दारांत येत, डोकावत व जात ! आशुतोष दिसायला उग्र दिसत. त्यांचा रंग काळा होता. मिश झुबकेदार होत्या. डोळे विजेप्रमाणें तेजस्वी होते. त्या मुलांना वाटे कोण आला आहे वाघोबा ! परंतु तो बंगाली वाघ प्रेमळ होता. तीं मुलें जवळ बोलवावीं, त्यांच्याजवळ बोलावें, हंसावें, असें आशुतोषांच्या मनात येई. परंतु मुलांजवळ कोणत्या भाषेंत बोलणार? त्यांना तामिळ, तेलुगु थोडीच येत होती? आशुतोंषांचा मन:संतोष नष्ट झाला. ते खिन्न होऊन बसले. त्यांचा मित्र बाहेरून आला. आशुतोष खिन्न आहेत असें पाहून त्या मित्रानें विचारलें, '' मुलांनी त्रास दिला. होय ना? '' आशुतोष म्हणाले, '' गडया तुझ्या मुलांनी नाही त्रास दिला. परंतु तुझी मुलें दारांतून डोकावत; मी त्यांना हाक मारूं शकलों नाही. त्यांच्याजवळ दोन शब्द मला बोलतां आले नाहीत. मला वाईट वाटलें. दोन चार वाक्यें तुमच्या भाषेंतील येत असती तर किती बरें झालें असतें? ''