पत्र तिसरे 6
आम्ही आमची दैवतें पाहूं तरीसुध्दा अस्पृश्यता दूर करावी असें वाटेल. आमच्या देवांना पशु पक्ष्यांची वाहनें आहेत. गणपतीसमोर उंदीर आहे. शंकरासमोर नंदी आहे. विष्णुसमोर गरुड आहे. रामासमोर वानर आहे. सरस्वती मोरावर आहे. ब्रम्हदेव हंसावर आहे. देवांनी सारी सृष्टी जणुं जवळ घेतली आहे. आणि शंकराचेंच रुप पहा. त्यांच्या अंगावर कातडें आहे. हातांत कपालपात्र आहे. अंगाला राख आहे. शंकराचें रुप म्हणजे हरिजनाचें रुप आहे. परंतु स्मशानवासी, व्याघ्रांबरधारी शंकराची आम्ही पूजा करतो. आणि मृत पशु नेऊन त्याचें कातडें काढून समाजाची सेवा करणारा, गांवाबाहेर राहणारा हा मनुष्य देहधारी शिवशंकर आम्ही तुच्छ मानतों. शंकराच्या देवळांत कशाला जाता?
आणि दत्तात्रेयाच्याजवळ तर कुत्रीं आहेत. तीं चार कुत्रीं म्हणजे चार वेद असें म्हणतात. मला तर त्याचा इतकाच अर्थ दिसतो कीं कुत्र्यांनाहि जो जवळ घेईल, ज्यांना आपण हडहड म्हणून हाकलतों, तरींहि जीं प्रामाणिक असतात अशा कुत्र्यांना जो जवळ घेईल त्याच्याजवळ वेद आहेत. अपमानितांचा जो कैवार घेतो तोच खरा थोर.
आम्ही आमच्या लोकांस दूर ठेवलें. परधर्मीयांनी त्यांना जवळ केले. मुसलमानी धर्म समानता शिकवितो. मशिदींत सारे समान. ज्यांना आपण दूर ठेवले ते परधर्मात गेले. मुसलमानांची या देशांत लोकसंख्या वाढली, ती सारीच कांही बाटवाबाटवीनें वाढलेली नाहीं. हिंदुधर्मांतील जुलुमाला कंटाळुनहि लाखों लोक गेले असतील. कोटयवधि लोक केवळ जुलुमाने परधर्म घेत नाहीत. स्वधर्मात ज्यांना मान नाही, ते सत्ताधारी परधर्मीयाच्या धर्मात शिरतांच हिंदू त्यांना मान देतो ! एकाद्या हरिजनाला पाणी देणार नाहीं. परंतु तोच ख्रिश्चन होऊन शिकून अंमलदार होऊन आला की त्याला आम्ही मेजवानी देऊं !
मुसलमानांची लोकसंख्या वाढली म्हणून आम्ही बोंबलत असतों. परंतु बोंबलून काय होणार? त्रावणकोर संस्थानात लाखों लोक ख्रिश्चन झाले. असें कां झाले? कांही विचार करा. मिशनरी लोकांवर रागावण्यांत अर्थ नाही. हजारां मैलांवरुन हे मिशनरी येतात. आपली भाषा ते शिकतात. ज्यांना आपण दूर ठेवलें अश भिल्ल, गोंड, कातकरी वगैरे लोकांत ते जातात. त्यांना औषधें देतात, ज्ञान देतात, त्यांना अन्नवस्त्र देतात. त्यांच्यामध्यें जाऊन चित्रपट दाखवितात. हार्मोनियम वाजवितात. त्यांच्या मुलांना चित्रें देतात, खाऊ देतात. रात्रीबेरात्री कोणी स्त्री बाळंत होतांना अडली तर तिच्या सुटकेसाठी जातात. त्यांनी शेंकडो शाळा चालविल्या आहेत. शेंकडो दवाखाने घातले आहेत. महारोग्यांसाठी हिंदुस्थानात फक्त मिशन-यांचे दवाखाने आहेत. आम्ही काय करतों आहोंत?