पत्र पहिले 4
काँग्रेसचा आज साठ वर्षांचा इतिहास आहे. काँग्रेसचा इतिहास हें पुस्तक तूं वाचले असशील. आरंभी काँग्रेस किती लहान होती, परंतु ती आज किती महान् झाली आहे ! इतक्या वर्षात काँग्रेसनें स्वयंसेवक दलें स्थापण्याचे प्रयत्न का कधीं केले नाहींत? केले असे प्रयत्न अनेकदां केले. परंतु परकी सरकारचा पुन:पुन्हां या संघटनांवर रोष होई. पुन: पुन्हां या संघटना नष्ट होत. वंगभंगाच्या चळवळींच्या वेळेस १९०६ ते १९०८ सालच्या काळांत स्वयंसेवकदलें स्थापण्याचे पहिले प्रयत्न झाले. व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यानें बंगालचे दोन तुकडे केले म्हणून प्रचंड चळवळ सुरु झाली होती. त्याच काळात जपाननें रशियाचा पराभवं केला होता. आज जपान म्हणजे सत्तांध असें एक सैतानी राष्ट्र झालें आहे. परंतु त्यावेळच्या जपानी विजयानें पौर्वात्य देशांत एक प्रकारचें नवजीवन संचरले. आपणहि पाश्चिमात्यांचा पराजय करूं शकूं, असा आत्मविश्वास आला. हिंदी चळवळीवर जपानी विजयाचा असाच परिणाम झाला. एक प्रकारचें नवतेज राष्ट्रांत आलें. बंगालमध्ये पुलिनबाबूंनीं तरुणांची मोठी संघटना उभी केली. पुलिनबिहारी उंच होते. त्यांचे डोळे अत्यंत तेजस्वी होते. ते शिंग फुंकीत, बिगुल वाजवीत तें दहा मैलांवर ऐकूं जाई ! महाराष्ट्रांतहि त्या वेळेस कवायती सुरु झाल्या होत्या. परंतु सरकारी दडपशाहीचा वरवंठा फिरुं लागला. सा-या कवायती थांबल्या. सा-या संघटना बेकायदेशीर ठरविण्यांत आल्या.
त्यानंतर १९२० चा काळ आला. महात्माजींची पहिली असहकाराची चळवळ सुरू झाली. शाळा-कॉलेजें सोडून विद्यार्थी बाहेर पडले. विदेशी मालावर निरोधन करण्याकरतां स्वयंसेवक पथकें उभीं राहूं लागलीं. सरकारने स्वयंसेवक दलें बेकायदा ठरवली तेव्हां काँग्रेसनें 'स्वयंसेवक दलांत सर्वांनी सामील व्हा ' असा आदेश दिला. स्वयंसेवकांना तुंरुगातून डांबण्यांत आलें. बावीस हजारांवर लोक तुरुंगात गेले. कांही ठिकाणी फटकेहि मारण्यांत आले. आणि पुढें नागपूरचा झेंडा सत्याग्रह सुरु झाला. त्यासाठी सर्व हिंदुस्थानातून स्वयंसेवक येऊं लागले. अशा या चळवळींतून संघटना उभी राहात होती. परंतु तिला व्यवस्थित स्वरुप नव्हते.
स्वयंसेवकदलास संघटित स्वरुप देण्याचें काम डॉ. हर्डीकर यांनी प्रथम सुरु केलें. डॉ. हर्डीकर पूर्वी अमेरिकेंत होते. तेथें लाला लजपतराय यांचे ते सहकारी होते. हिंदुस्थानांत आल्यावर त्यांनी ही तरुण संघटना हाती घेतली. हर्डीकर व हिंदुस्थानी सेवादल यांचा अविभाज्य असा संबंध आहे. ही संघटना वाढत असतांनाच हिंदुस्थान स्वराज्यास लायक आहे की नाही हें पाहण्याकरितां सायमन कमिशन हिंदुस्थानांत आलें. १९१७-१८ मध्यें ज्या वेळेस मॉटेग्यु-चेम्सफर्ड सुधारणा प्रथम जाहीर झाल्या, त्या वेळेस दर दहा वर्षांनी हिंदुस्थानच्या लायकीची परीक्षा घ्यायची असें ब्रिटिश पार्लंमेंटने ठरविले होतें ! हिंदुस्थान स्वराज्यास लायक आहे की नाही हें का ब्रिटिशांनी ठरवावयाचें? एडमंड बर्क म्हणून एक मोठा ब्रिटिश मुत्सद्दी होऊन गेला. त्यानें सरकार चांगले की वाईट हें ठरविण्याच्या दोन कसोटया सांगून ठेविल्या आहेत ----