पत्र आठवे 3
तो वृध्द मुसलमान पहाटे प्रार्थनेला उठला. एका लहान मुलाच्या अंगावर पांघरुण नव्हतें. त्यानें आपली चादर त्यांच्या अंगावर घातली. त्याची प्रार्थना झाली, आणि आतां सकाळ झाली. ती प्रवासी मंडळी उठली. त्या काजी साहेबांची गाय होती. गायीचें दूध त्यानें त्या मुलाबाळांस, सर्वांस दिलें. मोटार आली तेव्हां त्या मंडळीस, पोंचवावयास गेला. मंडळी मोटारींत बसलीं. म्हातारा उभा होता. लहान मुलानें त्यांच्या पांढ-या दाढीवरुन चिमुकले हात फिरविले काजी म्हणाला, '' बच्चा, तूं नाहीं ना मला भीत? ही दाढी निर्मळ आहे हो ! ''
वसंता, अशीं उदाहरणें किती सांगू? मागील वर्षी माझी वैनी कोंकणांत मरण पावली. किती तरी मुसलमान बंधुभगिनी माझ्या दादाच्या समाचारासाठी आल्या होत्या. माझ्या भावाच्या लहान मुलीला खाऊसाठी त्यांनीं एक रुपया दिला ! एक मुसलमान मित्र म्हणाला, '' दादा रडूं नका. काय करायचें ? जो मायच्या पोटीं आला त्याला धरित्रीच्या पोटीं जावेच लागतें ! वाईट नका वाटून घेऊं. तुमचा संसार लंगडा झाला. तुमचावजीरच गेला ! '' त्यानें पत्नीला वजीराची उपमा दिली. मला कवि कुलगुरु कालिदासाच्या '' गृहिणी सचिव: ' या वचनाची आठवण झाली. आणि ' मायच्या पोटीं आला तो धरित्रीच्या पोटीं जायचाच ' ' किती सुंदर वचन ! ' संस्कृत शब्द त्यानें वापरला, अर्थात् न कळत.
खेडयापाडयांतून असे हे प्रेमळ संबंध आहेत. आम्ही जाऊन पाहूं तर दिसतील. स्त्रियांच्या जुन्या ओव्या मी गोळा करून प्रसिध्द केल्या. त्यांत मुसलमानास भाऊ मानण्याच्या किती तरी ओव्या आहेत ---
मानीयला भाऊ जातीचा मुसलमान
दिवाळीचा सण त्याचा कागदी सलाम
अशा किती तरी सहृदय ओव्या आहेत. ठाणें येथें मला एका मित्रानें विचारलें, '' ही खरी ओवी आहे का? '' द्वेषाचा इतका पूर आम्ही ओतीत आहोंत कीं ते प्रेमळ संबंध, जे पूर्वी होते व ऊन आढळतात ते आम्हाला अशक्य वाटूं लागले आहेत.
काँग्रेस हिंदु-मुस्लीम ऐक्यावर श्रध्दा ठेवून चालली आहे. भारताचा भूतकाळ पाहून श्रध्देनें ती भविष्याकडे पहात आहे. '' महात्माजी किंवा काँग्रेस मुसलमानांना जवळ घेतात, परंतु मुसलमान तर त्यांना लाथा मारतात '' असें आमचे द्वेषपंडित म्हणत असतात, '' मुसलमानांनी गांधींना फसवले, त्यांच्या हातावर तुरी ठेवल्या '' असें ऐक्य-द्वेष्टे म्हणत असतात. परंतु प्रेम हें फसवून घेण्यासहि तयार असतें ! तेंच खरें प्रेम जें निरपेक्ष असतें. कर्तव्य म्हणून आपण प्रेम करतों, सहानुभूति दाखवितों. परंतु महात्माजींना कोणी फसविलें नाहीं. त्यांच्या श्रध्देनें व विश्वासाला फळ लागलें आहे. आपली सर्वांची तशी श्रध्दा असती तर अधिक फळ लागलें असतें.