पत्र दुसरे 3
आणि या अपमानांतूनच पुढें असहकाराची प्रचंड चळवळ झाली. १९२० च्या १ ऑगस्टला लोकमान्य मरण पावले. महात्मा गांधींनी राष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. देशबंधु दास, मोतीलाल नेहरु, लालाजी सारे गांधीजींना येऊन मिळाले. प्रचंड चळवळ झाली. अमीर फकीर झाले. वकीलांनी वकिल्या सोडल्या. विद्यार्थी बाहेर आले. पुढें महात्मा गांधींना सहा वर्षांची सजा झाली. असहकाराची चळवळ थांबली. वर्षदीडवर्षांने महात्माजीं आजारी म्हणून सुटले. त्यांनी विधायक कार्याकडे सारी शक्ति लावली. खादीची प्राणप्रतिष्ठा केली. ठायीं ठायीं सेवाश्रम सुरू झाले. सेवेला वाहून घेतलेले लोक खेडयापाडयांतून जाऊं लागले. गांवांतून स्वच्छता करू लागले. उद्योगधंदा देऊं लागले. एकदां नेहरु-रिपोर्टाचा विचार करण्यासाठी अलाहाबादेस, मला वाटतें, वर्किंग कमिटीची बैठक होती. महात्माजींना बोलावण्यांत आले. परंतु महात्माजींनी लिहिलें, 'तुम्ही स्वराज्याची जी मागणी करणार आहांत, तिच्या पाठीमागे मी शक्ति उभी करीत आहे. तुम्हीं तुमचें काम करा. '
आणि त्या शक्तीचा प्रभाव दाखविण्याची वेळ आली. काँग्रेसनें स्वराज्याची मागणी केली. महात्माजींनीं अकरा गोष्टींची मागणी केली होती. परंतु सरकार ताठर होतें. आणि ३० सालचा तो अभूतपूर्व असा कायदेभंगाचा लढा झाला. ३१ साली थोडा वेळ तो थांबला. महात्मा गांधी विलायतेंत गोलमेज परिषदेला गेले. परंतु रिक्त हस्तानें त्यांना परत यावें लागलें. ते परत येतांच पुन्हां लढा सुरू झाला तो ३४ सालपर्यंत सुरू होता. या प्रचंड चळवळीमुळे खेडीपाडी जागृत झाली. स्वातंत्र्याचा संदेश सर्वत्र गेला. आणि पुढे सनदशीर राजकारण आलें. कौन्सिलांचे राजकारण आले. जेथे-गाडगीळ यांची ती ऐतिहासिक निवडणूक झाली. आणि पुढे प्रांतिक निवडणुकी झाल्या. काँग्रेसला अपार यश मिळालें. स्वातंत्र्याच्या लढयासाठी जनता अधिक तयार करतां येईल, या हेतूने काँग्रेसनें मंत्रिमंडळे बनविली. 'गव्हर्नर मंत्र्यांच्या कारभारांत पदोपदी हात घालणार नाही ' अशी कबुली घेऊन काँग्रेसनें हें काम सुरू केले. सरकारशी झगडून सत्याग्रही शेतक-यांच्या जप्त जमिनी परत देवविल्या. कर्ज-निवारण कायदा, कूळ-कायदा, दारूबंदी, वर्धा शिक्षण पध्दती, साक्षरता-प्रसार, खादी-ग्रामोद्योगांस उत्तेजन असें बहुविध कार्य केलें. मंत्र्यांनी केवळ ५०० रुपये पगार घेतला. कारण कराची काँग्रेसच्या ठरावांत जास्तींत जास्त ५०० रुपये पगार स्वराज्यांत द्यावा असें होतें. काँग्रेस शब्दाप्रमाणे वागणारी. काँग्रेसचा असा कारभार चालू असतां पुन्हां हे महायुध्द आले. एका शब्दानेंहि जनतेच्या प्रतिनिधीस न विचारतां हिंदुस्थानहि युध्दांत सामील आहे, असें जाहीर करण्यांत आलें. आम्ही केवळ गुलाम आहोंत, याची तीव्र जाणीव पुन्हां झाली ! काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. युध्दासंबंधी तें ऐतिहासिक पत्रक काँग्रेसनें प्रसिध्द केलें, 'युध्दाचे हेतु काय?' असे काँग्रेसनें विचारलें. 'युरोपांतील देशांचे स्वातंत्र्य ' असे पार्लमेंटमध्ये चेंबर्लेन म्हणाले. काँग्रेस आतां काय करणार? वैयक्तिक सत्याग्रह करणार की प्रचंड चळवळ पुन्हां करणार? बघूं या. तेजस्वी दिवस येत आहेत. सर्वांनीं तयार राहिलें पाहिजे.
वसंता, काँग्रेसचा असा हा पन्नास-साठ वर्षांचा धांवता इतिहास तुला मी सांगितला. महात्माजींच्या चळवळीनें जर सर्वांत मोठें कोणतें कार्य केलें असेल तर तें निर्भयता देण्याचें. बंगालमधले एक मोठे पुढारी एकदां म्हणाले, '' १९१९-२० सालापूर्वी स्वराज्याची चर्चा करायची झाली तर ती आम्हीं तिस-या मजल्यावर बसून करींत असूं. परंतु गांधीजी आले व दिवाणखान्यांतील राजकारण रस्त्यावर आलें. ' हें सरकार आम्हांस नको ' असे रस्त्यातील सर्वसामान्य लोकहि निर्भयपणे म्हणू लागले. ''
महात्माजींचे हें सर्वांत मोठें कार्य. त्यांनी निर्भयतेचे वातावरण आणले. त्यांनी भिक्षादेहीला आळा घातला. त्यांनी स्वावलंबनाचा व सत्याग्रहाचा मार्ग दर्शविला. जनतेंचें व जनतेच्या पुढा-यांचे तोंड सरकारकडे असे, तें महात्माजींनी दरिद्रनारायणाकडे वळविले. जनतेंत जा, जनतेची सेवा करा, तिला निर्भय बनवा, असें तें सांगूं लागले. जनतेला स्वत:च्या शक्तीचा साक्षात्कार घडविणें हें महान कर्म होतें. तें गांधीजींनी केलें.