पत्र तेरावे 10
जसें शिक्षण तसें जीवन
प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद,
तू मला परवाच्या पत्रात अचानक एक नवीनच प्रश्र केलास. ठीक केलेंस. राष्ट्रांतील सर्व प्रश्नांची माहिती हवी. भगिनी निवेदिता यांनी एके ठिकाणी म्हटलें आहे, 'तें खरें शिक्षण जें या क्षणापर्यंतच्या सर्व प्रश्नांचे सम्यक् ज्ञान देतें. जास्तीत जास्त पुढे गेलेल्या आजच्या विचारसरणीशीही गांठ घालतें.' तू वर्धा शिक्षण पध्दतीविषयी माहिती विचारलीस मला आनंद झाला. तुझ्या सेवादलांतील एका मुलानें हा प्रश्र तुला विचारला. त्याला वक्तृत्वोत्तेजक सभेंत या विषयावर बोलायचे आहे. चांगलें आहे. तुला जातां जातां एक गोष्ट सांगतों. तुमच्या सेंवादलांतील मुलांसाठी चिकट-बुकें तयार करा. इंग्रजी, मराठी वर्तमानपत्रें येत असतात. त्यांतून निरनिराळया विषयांवरची कात्रणें कापून ती निरनिराळया फायलींतून चिकटवावींत. ही चीनची फाईल, ही महायुध्द फाईल, ही रशिया फाईल, ही काँग्रेस फाईल, ही विद्यार्थी चळवळीची फाईल, ही किसान-कामगार फाईल, ही कम्युनिस्ट फाईल, ही खेळ-व्यायाय फाईल, ही कला व वाङमय फाईल, अशा अनेक फायली कराव्या त्या त्या विषयांसंबंधिची कात्रणें त्या त्या फायलीत ठेवावीं. म्हणजे आपणाजवळ माहिती जमते. आपणांस चीनची माहिती पाहिजे असली म्हणजे ती चीन-फाईल काढावी. शिक्षणासंबंधी माहिती हवी असली कीं शिक्षण फाईल काढावी. जसें हे कात्रणाचें सांगितले, तसेच एक काम म्हणजे अल्बममध्ये निरनिराळया देशभक्तांचे निरनिराळया वेळचे फोटो, युध्दांचे देखावे, इतरही निरनिराळया क्षेत्रांतील फोटो, सुंदर स्थळें व देखावे यांचे फोटो अशांचे सुंदर अल्बम करावें. मुलांना दाखवायला बरें असते. असो.
वर्धा शिक्षण पध्दतीवर लिहिलेली पुस्तके अशी मराठीत अद्याप फारशी नाहींत. आजन्म शिक्षणकार्याला वाहून घेतलेले श्री. आपटे गुरुजी या विषयावर पुस्तक, प्रसिध्द करणार होते. वर्धा शिक्षण पध्दतींत उद्योगद्वारा शिक्षण द्यायचें असते. पू. विनोबाजींनी खादीद्वारा शिक्षण द्यायचें झाले तर कसे द्यावे यावर एक लहान पुस्तक लिहून प्रसिध्दीसाठी दिलें. बोर्डीच्या सुप्रसिध्द शाळेचे थोर चालक आचार्य भिसे यांनी शेतीद्वारां कसें शिक्षण द्यावें तें एका पुस्तकाच्याद्वारां लिहिले आहे. त्यागी व विद्वान आचार्य भाग्यवंत 'वर्धा शिक्षण पध्दति पत्रिका' चालवीत असत. त्या पत्रिकेंतूनही काही निबंध प्रसिध्द झाले आहेत.
शिक्षण हे जीवनाला आकार देण्याचें महत्वाचे साधन. जसें शिक्षण तसे मन. जसें मन तसें जीवन. शिक्षण हा जीवनाचा पाया आहे. जीवन सुंदर करायचे असेल तर शिक्षणाचा खोल विचार करायला हवा. बर्नार्ड शॉ ने एके ठिकाणी म्हटले आहे, 'सा-या शाळा बंद करा. म्हणजे मानवजात सुधारेल !' शॉ नेहमी अत्यंतिक तऱ्हेने लिहितो व बोलतो. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की, शिक्षण हे पुष्कळ वेळां सत्ताधारी हुकूमशहा आपल्या इच्छेप्रमाणे लादीत असतात. जसें सरकार तसें शिक्षण. मनुष्याच्या हृदयाच्या, बुध्दीच्या व देहाच्या भुका व गरजा कोण बघतो? शिक्षणाने देह, मन व बुध्दी या तिहींचा समन्वय करता आला पाहिजे. शिक्षणानें देहाचे पोषण करायला आपण समर्थ बनलें पाहिजे. मनाने उदार झाले पाहिजें. बुध्दि विचार ग्रहण करणारी व स्वतंत्रपणे विचार करणारी झाली पाहिजे.
हिंदुस्थानांत प्राचीन काळापासून शिक्षण आहे. आपल्याकडे बहुजन समाजाच्या शिक्षणाचे साधन श्रवण हे असे. सारेच गुरुगृही जाऊन शिकत असतील असें नाही. स्त्रियांचे शिक्षण तर पुढे बंदच झालें. मुलें-मुली एकत्र शिकत उत्तररामचरित् व शाकुंतल यांतील उल्लेखांवरुन वाटतें. राजांचे मुलगेहि आश्रमांत रहात. त्यांनाही शिस्तीत व आश्रमाच्या नियमांप्रमाणे वागावे लागे. चौदा विद्या व चौसष्ट कला आपण मानीत आलो. आश्रमांतून बौध्दिक व शारीरिक शिक्षण दिले जाई. काही काहींना विशिष्ट असे शिक्षण दिले जाते असावे.
विषय कोणतेही असोत, भारतीय शिक्षणशास्त्राने जर कशावर भर दिला असेल तो एकाग्रतेवर. मन एकाग्र करायला शिका. बुध्दि एकाग्र करायला शिका. मग गायत्री मंत्राने एकाग्र करा, सूर्याकडे पाहून एकाग्र करा, किंवा अर्धोन्मीलित दृष्टि ठेवून एकाग्र करा. कोठूनही हें चंचल मन एकाग्र करायला शिका. मनाची शक्ति अनंत आहे. ही अनंत चैतन्यशक्ति सारखी सर्वत्र वारेमाप जात असते. ती एकत्र केली पाहिजे. सूर्याचे किरण काचेंतून एकत्रित करुन कापसावर सोडले तर कापूस पेटतो ! परंतु कापूस नुसता उन्हांत धरुं तर पेटणार नाही. फांकलेल्या किरणांत ती शक्ति नसते. केंद्रीभूत किरणांत ती शक्ति असते. त्याप्रमाणे मनाची, बुध्दिची शक्ति केंद्रिभूत करुन एखाद्या विषयावर सोडली तर तो विषय समजण्यास कठीण जाणार नाही.