पत्र नववे 6
या संस्थानिकांनीं युरोप-अमेरिकेच्या सफरी केल्या तरी जगांतील वारा त्यांना कधीं लागत नाहीं ! हिंदी संस्थानिकांची टाईम्स वगैरेंतून येणारीं वर्णनें वाचावीं. अमक्या शर्यतींत यांचे घोडे नाचले, अमुक टीम घेऊन ते विलायतला गेले, अमक्या ठिकाणीं ते नाच खेळले, अमक्या ठिकाणी त्यांनीं शिकार केली, त्यांच्या लग्नांत इतके हत्ती होते, त्यांच्या खान्याच्या वेळेस साहेब होते, याशिवाय त्या वर्णनांतून काय असतें? पतियाळाच्या महाराजांची घोडी म्हणे शर्यतींत पहिली आली नाहीं म्हणून ते संतापले व पेट्रोल तिच्या अंगावर ओतून त्यांनीं ती जिवंत जाळली ! असे हे संस्थानिक प्रजेची काय स्थिति करीत असतील बरें? गुराख्यांना वाघाच्या भक्ष्यस्थानीं उभें करण्यांत येतें. वाघा वास घेत येतो. गुराखी डोळे मिटतो. परंतु राजेसाहेबांचा अचूक नेम जातो व वाघ मरतो ! आणि वाघ न मरता तर गुराखी फाडला गेला असता ना ! अशा हया संस्थानिकांच्या लीला आहेत ! कोणाला सुंदर स्त्रियांचाशौक, कोणाला कुत्र्यांचा शौक. कोणाला कुस्त्यांचा नाद, कोणाला शर्यतीचें वेड. कोणी कबुतरें पाळतो, तर कोणी पोलो टीम्स घेऊन युरोपांत जातो. कोणा एका लहान संस्थानिकांनें म्हणे कुत्र्यांसाठीं बंगले बांधले आहेत ! त्या कुत्र्यांना खारीक घालून खीर देण्यांत येते ! त्यांच्या प्रजेने मरून देवाजवळ कुत्र्यांना तरी जन्म मागावा, म्हणजे त्यांची हायहाय टळेल !!
हे संस्थानिक म्हणजे हिंदुस्थानला डाग आहेत. हे जगभर जातात. परंतु या देशाचें ते हंसें करतात. कांही अपवाद आपण सोडून देऊं या. परंतु बहुतेक संस्थानिक केवळ जंगली व रानटी आहेत. त्यांना माणुसकी नाहीं, कांही नाहीं. शिकार करावी, खान-पान-गान करावें, अनंगरंगांत दंग व्हावें, असा हयांचा खाक्या आहे !
अशा या संस्थानांतून चळवळ करणें कठीण आहे. या संस्थानांच्या मागं ब्रिटिश सत्ता आहे. ब्रिटिशांचीं बागनेटें संस्थानिकांचा चावटपणा चालूं देत आहेत. ब्रिटिश साम्राज्याचा मुख्य राजा तो प्रजेच्या उत्पन्नापैकीं कितीसा पैसा खर्च करतो? परंतु ब्रिटिश साम्राज्याच्या राजाला जे हक्क नाहींत ते आमच्या संस्थानिकांनाआहेत ! त्यांना ना कोणी शास्ता ना पुस्ता.
हिंदुस्थान सरकारनें मध्यें एक कारस्थान केलें. लष्करी सुधारणा करण्याच्या निमित्तानें संस्थानांतील लष्कर अद्यावत् करण्याचें त्यानें ठरविलें. संस्थानिकांनी अर्थात् मान डोलावली ! ठिकठिकाणच्या संस्थानांतील हें अद्ययावत लष्कर उद्यां स्वतंत्र होणा-या हिंदुस्थानावर गोळया झाडण्यास उपयोगी पडेल ! संस्थानिकांना स्वत:ची चैन चालूं ठेवावयाची आहे. तेव्हां तें स्वातंत्र्याची चळवळ दडपून टाकण्यास सदैव तयारच राहतील !
संस्थानांतून जर लोकशाहीची चळवळ झाली तर खुशाल गोळीबार होतात. ढेकानल वगैरे ओरिसा प्रांतांतील संस्थानांतील कहाण्या ऐकून अंगावर शहारे येतात ! नावा चालवणारे नावाडी मध्यरात्री झोपलेले असावेत. अशा वेळेस सरकारी अधिका-यांनीं जावें. नाव काढायला हयांनीं सांगावें. थंडी मी म्हणत असावी. ते नावाडी जरा कुरबुरत आहेत असें दिसतांच त्यांना गोळा घालाव्यात ! असे प्रकार तिकडे झाले. हजारों लोक संस्थान सोडून बाहेर पडले. लोकशाहीसाठी आज लढणारें ब्रिटिश सरकार, त्याला हया गोष्टी कशा पाहवतात? म्हणे आमचे पूर्वीचे तहनामे आहेत. प्रजेवर वाटेल तसे जुलूम कले गेले तरी का शांत बसावयाचें? सत्याची चीड ब्रिटिशांना किती आहे हें माहीत आहे ! त्यांच्या मनांत आलें तर ते आंतून किल्ल्या फिरवूं शकतात. संस्थानिक म्हणजे कळसूत्री बाहुलीं आहेत !