पत्र तेरावे 3
सांगा असे गाणें. ते काम करतांना हा कापूस कोठे होतो? काळया जमिनीत. जगांत कोणत्या कोणत्या देशात होतो? हिंदुस्थान, ईजिप्त, अमेरिका, चीन, असा भूगोल सांगा. कापसाचे कापड करण्याचा धंदा हिंदुस्थानांत गावोगांव होता. तो कां मेला? यंत्रे आली, गिरण्या आल्या. परकी सत्ता आली. अशा रीतीनें इतिहास व अर्थशास्त्र जोडा. कापसाचें कापड होईपर्यंत पुष्कळ स्थित्यंतरातून कपसास जावे लागतें. त्याला पिंजून घ्यावे लागतें. चरक्यावर पीळ द्यावा लागतो. त्याप्रमाणे जीवनाला किंमत येण्यासाठी लोकांच्या निदांनी टीकांच्या प्रहारांनी पिंजून घ्यावे लागतें. संयमाचा व निश्चयाचा त्याला पीळ द्यावा लागतो. प्रेमाचा रंग द्यावा लागतो. ध्येयासाठी तें ताणून धरावे लागते.' असे सांगून नीतीची व काव्यसाहित्याची गोडी त्यांत ओता. कर्मद्वावारांच सारे ज्ञान हस्तव्यवसायांद्वारा भूगोल, इतिहास, शास्त्रे, काव्यसाहित्य, नीति सारे शिकवितां येईल. प्रत्यक्ष क्रियेतून हे ज्ञान द्यायचे असल्यामुळे ते जिवंत राहील. ते हवेंत उडून जाणार नाही !
आजपर्यंत आपण बौध्दिक शिक्षण व उद्योगधंद्यांचे शिक्षण अलग गरीत होतों. दोन तास बौध्दिक शिक्षण द्या, दोन तास उद्योगधंद्याचे शिक्षण द्या. परंतु ती खरी शास्त्रीय पध्दती नाही. उद्योगधंदा हेंच शिक्षणाचे माध्यम करा. सरस्वति मोरावर बसून येते. त्याप्रमाणे ज्ञान उद्योगावर बसून येऊ दे. उद्योग, प्रत्यक्ष कर्म हे ज्ञानाचे वाहन होऊं दे. वर्धा शिक्षणपध्दती, उद्योगधंदे बौध्दिक शिक्षण दोन्ही थोडथोडे ठेवा, असे नाही म्हणत. केवळ समन्वय करा असेहि म्हणत. तर समवाय करा असे म्हणे. मडक्यापासून माती निराळी करता येत नाही, त्याप्रमाणे शिक्षणापासून उद्योग निराळा करुं नका. दोन्हीचा एकजीव करा. कर्मातूनच ज्ञान फूलूं दे.
टेनिसन या महाकवीने म्हटले आहे. 'To know a flower is to know the universe ! - एका फुलाचें ज्ञान करुन घेणे म्हणजे सर्व विश्वाचे ज्ञान करुन घेणे आहे.' त्याप्रमाणे एका उद्योगाच्या द्वारां सर्व शास्त्रांचे, सर्व प्रकारचे ज्ञान देता येईल. मात्र तो उद्योग व्यापक हवा. कापसाचा उद्योग, शेतीचा उद्योग, कागदाचा उद्योग कोणता तरी मूलभूत उद्योग घ्या.
याने काय होईल? मुलांच्या हालचालींना वाव मिळेल. त्याला लहानपणी कापावें, फाडावें, मोडावे असे वाटत असते. त्याला क्रिया पाहिजे असते. लहान मुल आईबरोबर विहिरीवर लहान तांब्या घेऊन पाणी आणायला जाईल. तो आईजवळ पोळी लाटायला मागेल. तो म्हणेल मी झाडतो, मी कपडें धुतों. आईला त्याला आवरतां आवरतां नकोसें होते. आपले हातपाय, डोळे सर्वांचा उपयोग सारखा करावा असें त्याला वाटतें. ही जी मुलांत असणारी क्रियाशक्ति तीला चालना मिळेल. प्रत्येकाला सर्वांत जर कोणता मोठा आनंद वाटत असेल तर तो स्वत:च्या निर्मितीचा. लहान मुल लिहित असतांना आपण जर त्याचे हात धरुं तर त्याला तें आवडत नाही. तो वेडयावाकडया रेघा काढील व त्याकडे पाहिले. त्याला वाटत असते, ही माझी कृति ! आजकालच्या रुढ असलेल्या शिक्षणांत ही निर्माण शक्ति नष्ट केली जाते. ज्या राष्ट्रांतील मुलांची निर्माणशक्ति लहानपणीच नष्ट झाली, ती मुलें उद्यां नवं-राष्ट्रनिर्मिती काय करणार? कोणते प्रयोग करणार? कोणते नवीन शोध लावणार?
वर्धा शिक्षणपध्दतीने मुलांची कल्पकता, शोधकता वाढेल; ती मरणार नाही. पुष्कळसे उद्योगधंद्यांतले शास्त्रज्ञ त्या त्या उद्योगधंद्यांतूनच उदयास आले. त्या त्या कर्मांतूनच त्यांची शोधक बुध्दि प्रज्वलित झाली. कर्म हें ज्ञानांचे पेटवण आहे. म्हणून आमच्या नवसुशिक्षितांस भीति वाटायला नको की, मग उद्यां शास्त्रज्ञ, यंत्रज्ञ निघतील की नाही? आज शे-दिडशें वर्षे शिक्षण सुरु आहे. किती यंत्रज्ञ व शास्त्रज्ञ निघाले? निर्माणशक्तीच जे शिक्षण मारते तें काय निर्माण करणार? उलट या वर्धा शिक्षणांतूनच राष्ट्राला उद्यांचे शास्त्रज्ञ व यंत्रज्ञ भरपूर मिळतील.