पत्र पाचवे 3
पुष्कळ वेळां हिंदूंच्या रुढींमुळेंहि हिंदुस्त्रिया अनाथ होतात. जरा वांकडे पाऊल पडलें तर त्या स्त्रीला आपण जवळ घेत नाही. जणुं आपण सारे पुरुष पुण्यात्मेच असतों ! अशा निराधार स्त्रिया मिशनमध्यें जातात किंवा मुसलमान त्यांना जवळ करतात. याचा अर्थ असा नाही कीं कांही मुसलमान गुंड अत्याचार करीत नसतील, परंतु गुंडांना शिक्षा करा. सारे मुसलमान बायका पळविणारे असें म्हणूं नका. सबंध जातच्या जात नीच मानूं नका. त्यांच्यातहि आयाबहिणी आहेत, हें आपण विसरतां कामा नयें.
जे मुसलमान गुंड असतील त्यांचे शासन होऊं नये असें काँग्रेसनें कधींच म्हटले नाहीं. स्त्रियांवर अत्याचार झाला तर महात्माजी किती संतापतात. मागें मुंबईला आस्ट्रेलियन टॉमींनीं हिंदी स्त्रियांचा अपमान केला. त्या विरुध्द शेवटी कोणी लेखणी उचलली? उठल्यासूटल्या मुसलमानांच्या काल्पनिक वा अतिशयोक्तीने भरलेल्या अत्याचारांवर टीका करणारे आमचे सारे जातीय हिंदु पुढारी व त्यांचीं पत्रें मूग गिळून बसली होतीं. मुसलमानांवर टीका करतील, परंतु साहेबावर आणि त्यांतल्या त्यांत लढाईच्या काळांत डिफेन्स अॅक्ट चालूं असतां, कोणी टीका करावी? परंतु महात्माजींनीं जळजळीत लेख लिहिला. हिंदी स्त्रियांची अब्रु सांभाळण्यासाठी हाच एक धीरवीर महात्मा उभा राहिला. व्हाइसरॉय का झोपले, सैन्याचे अधिकारी का झोपले, असें त्यांनी विचारलें, अणि शेवटी लिहिलें, '' हिंसा वा अहिंसा, स्त्रियांची विटंबना होतां कामां नये. हिंदी स्त्रियांच्या अब्रुला धक्का लागता कामा नयें. जनतेनें तत्क्षणीं त्याचा प्रतिकार केला पाहिजे. ''
गुंडांचें पारिपत्य झालें पाहिजे. स्त्रियांच्या अब्रुचें रक्षण केलें पाहिजे. परंतु तेवढयासाठी संबंधच्या सबंध मुसलमानांस सारख्या शिव्या देण्याची जरुरी नाही. 'लांडे असेच !' असें म्हणण्याची जरूरी नाही. आणि आपणहि आपल्या स्त्रियांना अधिक उदारपणें वागविले पाहिजे.
'कृण्वन्तो विश्रमार्यम्' याचा अर्थ काय? सर्वांना का तुमच्या धर्माची दीक्षा देणार? सर्वांना का शेंडया व जानवी देणार? जगांत केवळ आर्य जात नहीं. या देशांतच द्रविडीयन लोक आहेत. ते का आर्य आहेत.? आर्य तेवढे चांगले असा अहंकार भ्रममूल आहे. जगाच्या संस्कृतींत सर्व मानवी वंशांनी भर घातली आहे. आज हिटलर म्हणतो कीं '' आर्य तेवढे सर्वश्रेष्ठ. ज्यूंना द्या हांकलून. '' परंतु आइन्स्टीन सारखे शास्त्रज्ञ ज्यूंत निर्माण झाले. कोणतीही एक जात, कोणताहि एक मानववंश इतरांपेक्षां श्रेष्ठ असें नाहीं. कोणासहि अहंची बाधा व्हायला नकों.
'कृण्वन्तो विश्रकार्यम्' याचा अर्थ इतकाच कीं आपण सर्व जगाला उदार व्हायला शिकवूं यां. आर्य म्हणजे दार-चरित. आपण एक जात मुसलमानांना निंद्य म्हणू तर आपणच अनुदार व अनार्य ठरुं. आर्य म्हणवून घेण्यास नालायक ठरूं ' अरिषु साधु: स आर्य: ' शत्रू जवळहि जो प्रेमानें वागतो तो आर्य, असा आर्यपणा आपणांजवळ कोठें आहे? आपण आपल्या शेजारी शेंकडों वर्षे राहणा-यांना आज पाण्यांत बघत आहांत. हा का आर्यपणा?