पत्र तेरावे 6
१९३० व ३२ च्या लढयांत राष्ट्रीय शिक्षण संस्था सामील झाल्या त्या लढयांत या संस्थांच्या आहुती पडल्या ! त्या संस्था पुन्हा उभारणे जड झाले. गांधीजींनी गुजरात विद्यापीठाला विचारले, 'दहा वर्षे विद्यापीठ चालले. खेडयात काम करण्यात किती तरूण आपण तयार केले? ' समाधानकारक उत्तर मिळाले नाही ! गुजरात विद्यापीठ बंद झाले. महात्माजी वर्ध्याजवळ रहावयास गेले. तेथे पू. विनाबाजीं भोवती सेवकांचा मेळावा होता. जे खेडयापाडयातून हिंडत होते, कामे करीत होते.
महात्माजींना काही मित्र म्हणाले 'तुम्ही खादी भक्कम पायावर उभारलीत. ग्रामोद्योग उभारलात, हरिजनसेवक संघ स्थापलात. हिंदी भोषेला चालना दिलीत. गोरक्षण सुरू केलेंत. परंतु शिक्षणाचा तुम्ही नवीन पाया घातला नाही. आम्ही राष्ट्रीय शाळा काढल्या पण तेच जुने शिक्षण देत बसलो. तुम्ही शिक्षणाकडे एकदां दृष्टि वळवा.'
महात्माजींच्या मनांत शिक्षणासंबंधी विचार आफ्रिकेपासून घोळत होते. राष्ट्र-पुरुष सर्व गोष्टींचा विचार रात्रंदिवस मनांत करीत असतो ! त्याच्या स्मृतीतून, त्याच्या व्यापक दृष्टितून कोणतीही गोष्ट सुटत नसते. निरनिराळया आश्रमांतून प्रयोग चालले होते. शिक्षणशास्त्राचा अभ्यास केलेले श्री. काकासाहेब कालेलकर, पू. विनोबाजी वगैरे मंडळी महात्माजींजवळ होती. वर्ध्याच्या मारवाडी विद्यालयाच्या समारंभाच्या निमित्तानें महात्माजींनी शिक्षणशास्त्रज्ञांची एक बैठक बोलावली. दिल्लीच्या 'जमिया मिलिया' राष्ट्रीय विद्यालयाचे प्रमुख डॉ. झकीर हुसेन हे आले. प्रा. शहा आले. आर्यनायकम् आले. अनेक नामवंत शिक्षणतज्ञ आले. विचार-विनिमय झाला. महात्माजींनी आपले शिक्षणविषयक विचार तेथे मांडले व एक समिती नेमली गेली. डॉ. झकीर हुसेन तिचे अध्यक्ष होते.
समितीने दोन महिन्यांत अहवाल लिहिला. वर्ध्याला ही शिक्षणपध्दती आखली गेली म्हणून हिला वर्धा शिक्षणपध्दती म्हणतात. वास्तविक हिला 'समवाय-शिक्षण-पध्दती' असे नांव दिले पाहिजे. वर्धा शिक्षण पध्दतीवर या लहानशा पत्रात मी कितीसे लिहू. परंतु आजपर्यंत ज्या ज्या शिक्षणपध्दती निघाल्या, शिक्षणशास्त्रांत जे जे सिध्दांत आजपर्यंत जगांत मांडले गेले ते सर्व जमेस धरुन त्यात वर्धा शिक्षणपध्दतीने आणखी नवी भर घातली आहे. वर्धा शिक्षणपध्दती म्हणजे महात्माजी व त्यांचे अनुयायी यांचे अशास्त्रीय ढंग नव्हते, ती एक शास्त्रीय पध्दती आहे. मानसशास्त्र तिने अभ्यासिले आहे. आजपर्यंतचे अनुभव जमेस घेतले आहेत. आपल्याकडे बी. टी. किंवा एस.टी.सी. वगैरे होताते, त्यांना शिक्षणशास्त्राचा इतिहास असतो. युरोपांतील अनेक शिक्षण तज्ञांनी कोणती भर घातली ते त्या इतिहासांत असते. रुसो, फ्रॉबेल, पेस्टॅलॉझी, माँटेसरी अशा शिक्षणाचा विचार करणात्या थोर व्यक्ति तिकडे झाल्या. मॉटेसरीबाई तर आज हिंदुस्थानांत येऊन आपली पध्दती शिकवीत आहेत ! बी. टी. वगैरे होणा-यांस या सर्व पध्दतींचा अभ्यास करावा लागतो. रुसो हा अत्यंत प्रतिभाशाली पुरुष होऊन गेला. तो म्हणत असे, 'निसर्ग हाच मोठा शिक्षक. निसर्ग शिकवील.' शेक्सपीअर या महाकवीने म्हटलें आहे 'Books in brooks and sermons in stones. - झ-यांतून पुस्तके आहेत, पाषाणांतून प्रवचने आहे.' मनुस्मृतीत सांगितले आहे, 'पाऊस पडूं लागला म्हणजे मुलांना सुटी द्यावी !'त्या मुलांना पावसांत नाचूं दे. त्यांच्या भावनाहि नाचूं लागतील. रुसोने निसर्ग शिक्षणावर जोर दिला.