पत्र बारावे 6
वसंता, असे हे वाद आहेत. गांधीजींचा प्रयोग आज चालला आहे. काँग्रेस सर्वांना संयम राख असें सांगत आहे. परंतु वरिष्ठ वर्ग जर सुधारणारच नसतील तर पू. विनोबाजी धुळयास एकदां म्हणाले, '' हे गरीब लोक आज भोळया सांबाप्रमाणें जगाचें कल्याण करणारे शिव शंकर आहेत. स्वत: उपासमार, अज्ञान, अपमान याचें विष पिऊन जगाला अमृत देत आहेत. परंतु गरीबांच्या सहनशीलतेचा शेवट होईल आणि मग दरिद्र देव रुद्र होईल आणि पुंजीपतींना तो काकडीप्रमाणें खाऊन टाकील. म्हणून सावध रहा. '' जें जगांत इतरत्र झालें तेंच माझ्या देशांतहि व्हायचें असेल तर त्याला काय इलाज? बर्नार्ड शॉनें एके ठिकाणी इंग्रजांस बजावलें आहे कीं '' तुमच्या ताब्यांतील प्रदेशांस स्वातंत्र्य द्या. त्यामुळें भले संबंध राहतील. परंतु तुमच्या अन्यायाने ते पददलित परतंत्र लोक खवळले म्हणजे रक्तपात होईल, कायमची वैरें राहतील. परंतु तुम्हाला त्या रक्तपाताचेंच डोहाळे होत असले तर त्याला कोण काय करणार? तुमची ती इच्छा पूर्ण होईल -- '' Then you will have blood your own choice.''
त्याप्रमाणें या देशांतील वरिष्ठ वर्गांना गांधीजींचा सर्वोदयाचा मार्ग रुचला नाही तर का दरिद्री जनता अनंत काळ वाट पाहणार आहे? गांधीजीच्या मताचे अहिंसक लोक लाट अडवूं पाहतील. परंतु गांधीजीसारखें विभूतिमतव कोणाजवळ असणार? गांधीजींसारख्या युगपुरुषानें हिंदुस्थानांत आज लाट थांबविली आहे. परंतु गांधीजी नेहमी म्हणतात, '' I see red ruin ahead -- पुढें मला रक्तपात दिसत आहे. '' त्या लाल रक्तमासांच्या चिखलांतून जायचें नसेंल तर वरिष्ठ वर्गानों सावध रहा. गरीबांना जगवा, त्यांचे संसार सुखी करा.
परंतु महर्षि व्यास महाभारताच्या शेवटीं खेदानें व दु:खाने म्हणतात ---
उर्ध्वबाहुविरौम्येष नच कश्रिच्छृणोति माम् !
धर्मादर्थश्च कामश्च स धर्म: किं न सेव्यते !!
सर्व समाजाचें नीट धारणपोषण होईल अशा रीतीनें अर्थकामांस नियंत्रित करा, असें व्यास सांगतात. आज महात्माजी तेंच सांगत आहेत. परंतु हें सांगणें वांयाच जाणार का? काळाला माहीत. आज तरी आपण सारे काँग्रेसच्या प्रयोगांत सामील होऊं या. पुढें व्हायचें तें होईल.
तुझा
श्याम