पत्र पहिले 6
पुण्यासारख्या शहरांतून काँग्रेसची स्वयंसेवकदलें सुंदर रीतींने सुरु झाली होती. परंतु एक गोष्ट होती. ही स्वयंसेवक दलें चालविणारे कार्यकर्ते पुष्कळ वेळां समाजवादी असत. महाराष्ट्रांतील काँग्रेसच्या पुढा-यांस या गोष्टीची भीति वाटली. ही तरुण संघटना पुढें मागें समाजवादी तरुणांच्या हातीं जाईल, असें त्यांना वाटलें. अशी समाजवादी संघटना काय कामाची? यापेक्षां संघटना नसली तरी चालेल, असे त्यांना वाटलें. स्वयंसेवक दलास उत्तेजन देण्याचें त्यांनी बंद केलें, परंतु तरुणांना-विद्यार्थ्यांना कोणती तरी संघटना हवी होती. कवाईत, खेळ, एकत्र येणे, गणवेश, बँड या गोष्टी त्यांना आकर्षित होत्या. आणि या गोष्टी जेथें त्यांना दिसल्या तेथें ते जाऊं लागले. काँग्रेसची सेवादल संघटना जवळजवळ बंद पडली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या जातिनिष्ठ संघटना फोंफावल्या. महाराष्ट्रांतील काँग्रेसचे सूत्रधार भ्रमांत राहिले. जातीय संघटना वाढत होती तरी त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलें. काँग्रेसच्या सेवादलांत समाजवाद थोडा फार आला असता तर काय बिघडले असतें? जातीयवादापेक्षां का समाजवाद वाईट आहे? काँग्रेस हळूहळू समाजवादाकडेच जात आहे. महात्माजींनीं सुध्दां एके ठिकाणी लिहिलें, ' या वरीष्ठ वर्गांना मी कंटाळलों. त्यांच्या बाबतींत मी निराश झालों ब्रिटिशांचे ते आधारस्तंभ आहेत. ते आपलें हें स्वरूप सोडतील अशी आशा नाहीं. तेव्हां या पुंजिपतींच्या स्तंभाखालची आधारभूत अशी बहुजन समाजाची शक्ति ती आतां मी उठवतों, म्हणजे ब्रिटिशांचे हे हिंदी आधारस्तंभ कोलमडून पडतील व ब्रिटिश सत्ताहि गडगडेल.'
काँग्रेस हळूहळू का होईना समाजवादाकडेच जात आहे. जवाहरलालांसारखे पुढारी हें सांगत आहेत. महात्माजींनीं एकदां त्रावणकोर दरबारला लिहिलेल्या पत्रांत म्हटलें होतें कीं ' सर्वच्या सर्व समाजवाद कांही वाईट नाहीं. ' तसेंच श्री. महादेवभाईंनीं एकदां हरिजनमध्यें लिहिलें होते कीं, ' उद्यां समजा निवडणुका आल्या; जमीनदारी नष्ट करूं; जमीन वांटून देऊं; मोठे कारखाने राष्ट्राच्या मालकीचे करूं; असा निवडणुकीचा जाहीरनामा जाहीर करून जर एखाद्या पक्षानें निवडणुकींत बहुमत मिळविले व पुढें कार्यक्रमाप्रमाणें तो पक्ष कायदे करुं लागला तर त्यांत आक्षेपार्य काय आहे?''
वसंता, आजच या पत्रांत मी फार खोल जात नाही. सांगायचें एवढेंच की महाराष्ट्रांत समाजवादाच्या भ्रामक भीतीनें काँग्रेसच्या चालकांकडून सेवादल संस्थेची उपेंक्षा केली गेली. परंतु आज जातीय संघटनेची शहरोशहरीं प्रचंड जोर पाहून महाराष्ट्रांतील काँग्रेस कार्यकर्त्यांची दृष्टि निवळली आहे. आणि सेवादलाकडे पुन्हां लक्ष दिले जात आहे. भाईं एस्. एम्. जोशी या कामासाठी सर्वंत्र हिंडूफिरूं लागले आहेत. सेवादलाच्या छावण्या ठायीं ठायीं सुरु होत आहेत. शिक्षण दिलें जात आहे. ही संघटना वाढवणार, फोंफावणार असें माझ्या दृष्टीस दिसत आहे.
वसंता, तूंहि आरंभ कर. तुझ्याभोंवतीं तरुण जमतील. तुझ्यांत तो गूण आहे. तूं दुस-यांची मनें ओढून घेशील. तूं मनमिळाऊ आहेस. बोलका आहेस. गोष्टी सांगतोस. गाणीं म्हणतोस. दुस-यांच्या उपयोगीं पडतोस. तुझें सेवादल उत्कृष्ट चालेल.