पत्र सहावे 6
पण हिंदुमहासभा किंवा मुस्लिम लीग यांचे पुढारी मी सोडूनच देतों. जातीयवादाचा फायदा घेऊन स्वत:चा वर्गीय स्वार्थ साधण्याकरतांच ते सिध्द झाले आहेत. पण आमच्या राष्टवाद्यांनाहि काँग्रेसवाल्यांनाहि या प्रश्राचे खरें स्वरुप समजलें नाहीं. पाया सोडून वरच्या रंगीत इमारतीकडें पाहून ते आपली अनुमानें बांधीत आहेत असें वाटतें. हिंदु-मुसलमानांची एकी ही सांस्कृतिक दृष्टया भिन्न असलेल्या जमातींचीं एकी आहे. केवळ दोन जमातींमधील साम्यविरोधांची तराजू जोखून हा प्रश्न सुटणार नाही. ह्या दोन जमातींची एकी व्हावयाची असेल तर जातीयवादाचा फायदा घेऊन वर्गहित साधणा-या पुढा-याचें स्थान समाजांतून नष्ट झालें पाहिजे. तें स्थान समाजवादी क्रांतीशिवाय नष्ट होणं शक्य नाही. एकजिनसी संस्कृति निर्माण व्हावयाची असेल तर एकजिनसी समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे. जळगांवच्या शेतकरी परिषदेला हजारो मुसलमान शेतकरी आले होते. हिंदु शेतक-यांबरोबर असलेलें त्यांचें आर्थिक एकजिनसी नातें त्यांना कळलें, पण काँग्रेसचा राष्ट्रवाद त्यांना कळत नाही. हयाचा अर्थ मुसलमान शेतकरी जातीयवादी आहेत असा का तूं करणार? पण काँग्रेसचा राष्ट्रवाद म्हणजे आपल्या आर्थिक झगडयांचें तत्वज्ञान आहे हें त्यांना कळत नाही. आणि नाहींहि कळणार कदाचित् कारण काँग्रेसहि बहुजनसमाजाच्या आर्थिक प्रश्राकडे इतक्या आत्मीयतनें अद्याप कोठें पहात आहे?
परंतु अधिक पुढील पत्रीं. सर्वांस सप्रेम प्रणाम व आशीर्वाद.
तुझा
श्याम