Get it on Google Play
Download on the App Store

पत्र चवथे 1

भारताचा स्वधर्म ओळखा

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.

मी मागें एकदां एका खेडेगांवात गेलों होतों. रात्रीची वेळ होती. गांवांतील लोक कसली तरी पोथी वाचीत होते. मी त्यांना नम्रपणें म्हटलें, ''आज काँग्रेसची पोथी वाचावयास मी आलों आहें. आजच्या दिवस तुमची पोथी राहूं दे. आज माझी ऐका.'' त्यांनीं ऐकलें. मी माझें काँग्रेसचें आख्यान सुरू केलें. काँग्रेस म्हणजे माझें दैवत. देवाजवळ कोणाला मज्जाव नाहीं. देव सर्वांचा. त्याप्रमाणें काँग्रेसजवळ सर्वांना वाव आहे. सर्वांना तेथें अवसर आहे. काँग्रेस म्हणजे माझें रामनाम. मरतांना माझ्या तोंडांतून 'राम राम' असे शब्द कदाचित् नाहीं येणार. परंतु 'काँग्रेस काँग्रेस' असें शब्द येतील. आणि त्यांत काय बिघडलें? काँग्रेस सर्वांचे कल्याण करूं पहात आहे. म्हणून काँग्रेस हें देवाचेंच नांव. महात्माजी एकदां म्हणाले होते, ''चरका हें माझ्या देवाचें नांव.'' देव तरी शेवटीं कोठें आहें? तुकाराम महाराजांनी सांगितले आहे 'जे का रंजलें गांजले ! त्यांसी म्हणे जो आपुलें !! तोचि साधु ओळखावा ! देव तेथेंची जाणावा !! 'आज देव माझ्या काँग्रेसजवळ आहे. कारण ती कोणत्याहि एका वर्गासाठी, एका धर्मासाठी नाहीं. ती सर्वासाठी आहे. तिच्याजवळ भेदभाव नाहीं. जातगोत नाहीं. म्हणून तर मला काँग्रेसचें वेड आहे. म्हणून तिच्यासाठी जगावें व मरावें असें मला वाटतें. सर्वत्र माझ्या काँग्रेसची सेवा सुरू होवो. तिचा झेंडा गांवोगांव जावो, हृदयाहृदयांत जावो, असें मला वाटतें. कबीरानें म्हटलें आहे.---

'अंदर राम बाहर राम
जहां देखों वहीं रामहि राम'


त्याप्रमाणें मनांत काँग्रेस, जनांत काँग्रेस, शहरांत काँग्रेस, खेडयांत काँग्रेस, सर्वत्र काँग्रेस-काँग्रेस व्हावें असें मला वाटते. 'पायीं बांधुं घुंगुर ! हातीं घेऊं विणा ! मुखानें विठ्ठल गाऊं हो ! नाचत पंढरी जाऊं हो.' असें पूर्वीच्या साधुसंतानीं म्हटलें. त्यांनीं देवाचें नांव सर्वत्र नेलें. ज्ञानेश्वरीत म्हटलें आहे, 'अवघे जगचि दुमदुमित ! नामघोषं भरले.' साधुसंतानी प्रभूचें नांव दशदिशांत नेलें. त्याप्रमाणें काँग्रेसचें नांव सर्वत्र व्हावें असें मला वाटतें. मला वाटतें तसें सर्वांस वाटो. तुझ्यासारख्या लाखों तरुणांस वाटो. शेवटीं आजच्या तरुणांच्या स्वप्नांतूनच उद्यांचा भविष्यकाळ उत्पन्न होणार आहे. एका रशियन लेखकांनें म्हटलें आहे. 'Give me the songs of the young and I shall tell their future -  तरुणांची गाणीं मला सांगा म्हणजे त्यांचें भवितव्य मी सांगेन. ' वसंता, तुमच्या तरुणांच्या ओंठावर कोणतीं गाणीं आहेत? तुमच्या पोटांत कोणत्या संस्थेविषयीं प्रेम आहे? मी तर आशा बाळगतों कीं सर्वांचे कल्याण पहाणा-या, सर्व वर्ग व सर्व धर्म ह्यांना एकत्र गुण्यागोविंदानें नांदवण्याचा महान् प्रयोग हिंमतीनें व श्रध्देनें करणा-या माझ्या काँग्रेसचीं गाणी तुझ्यासारख्या तरुणांच्या ओठावर असतील, त्या संस्थेविषयीचें प्रेम तुमच्या हृदयांत असेल.

काँग्रेस भारताचा आत्मा ओळखते. ज्याप्रमाणें व्यक्तीला स्वधर्म असतो, तसा राष्ट्रालाहि एक स्वधर्म असतो. गीतेमध्ये सांगितले आहे कीं 'स्वधर्मे निधनं श्रेय: ! परधर्मो भयावह:' हिंदुस्थानचाहि एक स्वधर्म आहे. केवळ परकीयांचे अनुकरण करणें हा स्वधर्म नाहीं. जर्मनीने ज्यूंची हकालपट्टी केली तशी आम्ही मुसलमानांची करूं, असें कांही हिंदु तरुण म्हणत असतात. जर्मनीचा स्वधर्म असेल. भारताचा नाही.

आम्ही नेहमी म्हणत असतों कीं इतरं प्राचीन राष्ट्रें काळाच्या पोटांत गडप झालीं. इतर प्राचीन संस्कृति नामशेष झाल्या. परंतु हिंदुस्थान अद्याप राहिला आहे. परंतु हा देश कां राहिला? हिंदुस्थान कां नही नष्ट झाला? हिंदुस्थानचा प्राण कशांत आहे?
हिंदुस्थान सर्व संग्राहक आहे म्हणून जगला आहे. पाऊस पडला नाहीं तरी समुद्र आटत नाही. कारण तो सर्व प्रवाहांना जवळ घेत असतों. त्याप्रमाणें सर्व मानवी प्रवाहांना हिंदुस्थाननें जवळ घेतलें आहे. म्हणून हिंदुस्थान जगला आहे.

 

श्यामची पत्रे

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
पत्र पहिले 1 पत्र पहिले 2 पत्र पहिले 3 पत्र पहिले 4 पत्र पहिले 5 पत्र पहिले 6 पत्र पहिले 7 पत्र दुसरे 1 पत्र दुसरे 2 पत्र दुसरे 3 पत्र दुसरे 4 पत्र दुसरे 5 पत्र दुसरे 6 पत्र दुसरे 7 पत्र दुसरे 8 पत्र तिसरे 1 पत्र तिसरे 2 पत्र तिसरे 3 पत्र तिसरे 4 पत्र तिसरे 5 पत्र तिसरे 6 पत्र तिसरे 7 पत्र तिसरे 8 पत्र तिसरे 9 पत्र चवथे 1 पत्र चवथे 2 पत्र चवथे 3 पत्र चवथे 4 पत्र चवथे 5 पत्र पाचवे 1 पत्र पाचवे 2 पत्र पाचवे 3 पत्र पाचवे 4 पत्र पाचवे 5 पत्र पाचवे 6 पत्र पाचवे 7 पत्र सहावे 1 पत्र सहावे 2 पत्र सहावे 3 पत्र सहावे 4 पत्र सहावे 5 पत्र सहावे 6 पत्र सातवे 1 पत्र सातवे 2 पत्र सातवे 3 पत्र सातवे 4 पत्र सातवे 5 पत्र सातवे 6 पत्र सातवे 7 पत्र आठवे 1 पत्र आठवे 2 पत्र आठवे 3 पत्र आठवे 4 पत्र आठवे 5 पत्र आठवे 6 पत्र आठवे 7 पत्र आठवे 8 पत्र आठवे 9 पत्र नववे 1 पत्र नववे 2 पत्र नववे 3 पत्र नववे 4 पत्र नववे 5 पत्र नववे 6 पत्र नववे 7 पत्र नववे 8 पत्र नववे 9 पत्र दहावे 1 पत्र दहावे 2 पत्र दहावे 3 पत्र दहावे 4 पत्र दहावे 5 पत्र दहावे 6 पत्र अकरावे 1 पत्र अकरावे 2 पत्र अकरावे 3 पत्र अकरावे 4 पत्र अकरावे 5 पत्र बारावे 1 पत्र बारावे 2 पत्र बारावे 3 पत्र बारावे 4 पत्र बारावे 5 पत्र बारावे 6 पत्र तेरावे 1 पत्र तेरावे 2 पत्र तेरावे 3 पत्र तेरावे 4 पत्र तेरावे 5 पत्र तेरावे 6 पत्र तेरावे 7 पत्र तेरावे 8 पत्र तेरावे 9 पत्र तेरावे 10 पत्र चवदावे 1 पत्र चवदावे 2 पत्र चवदावे 3 पत्र चवदावे 4 पत्र चवदावे 5 पत्र चवदावे 6 पत्र चवदावे 7