Get it on Google Play
Download on the App Store

पत्र अकरावे 2

मग राष्ट्रीय भांडवलशाही जगांत स्वत:ची साम्राज्यें स्थापूं पाहतें. स्वत:च्या देशांतील जादा भांडवल दुस-या देशांत ते नेऊन ओततात. स्वत:चा माल खपविण्यासाठी त्यांना वसाहती लागत असतात. सर्वांचीं स्पर्धा सुरूं होते. मग या भांडवलशाह्या आपापसांत लढूं लागतात. स्पर्धेत टिकाव लागावा म्हणून कांही भांडवलवाल्या राष्ट्रांना आपापल्या राष्ट्रांतील लोकशाही संपुष्ठांत आणवी लागते. आज जर्मनींत हिटलरचा नाझी पंथ आहे. इटलीत फॅसिझम आहे. दोघांचें स्वरूप एकच आहे. भांडवलशाहीची जगण्यासाठी चाललेली शेवटचीं धडपड म्हणजे नाझी पंथ किंवा फॅसिझम ! जर्मनीतील हिटलर व त्याची नाझी संघटना यांना कोणी पैशाची मदत केली? जर्मनींतील क्रप वगैरे जे अब्जाधीश कारखानदार त्यांनीं कोटयवधि रुपये हिटलरला संघटनेसाठी दिले ! नाझी संघटना ही पांढरपेशांची संघटना आहे. तिच्यांत शेतकरी-कामकरी नाहींत. आपली संस्कृति, आपला वंश, आपली भाषा वगैरेंची या वरच्या वर्गांतील तरुणांस ऐट असते. या बेकार पांढरपेशा तरुणांस हिटलरनें हाताशीं धरले. आपलें जर्मन राष्ट्र मोठें करूं, जगांत सर्वत्र साम्राज्य स्थापूं असें तरुणांच्या मनांत त्यानें भरवलें. संघटना उभी राहिली. शेतकरी-कामकरी यांच्या संघटना नष्ट करण्यांत आल्या. शेतक-यांचा माल ठराविक किंमतील सरकारनेंच विकत घ्यायचा असें ठरविण्यांत आलें. कामगारांचीच अधिक भीति असते. परंतु जर्मनींत कामगारांना स्वातंत्र्य  नाहीं. नाझी पंथ वा फॅसिस्ट पंथ कोणालाच स्वातंत्र्य देत नसतों. सरकार ठरवील तें ब्रह्मवाक्य !

कामगारांनी मिळेल तो पगार घेतला पाहिजे. जर्मनी किंवा इटली यांना जगांत वसाहती नाहींत. त्यांचा माल कसा व कोठें खपणार? जगांत तर स्पर्धा आहे. इंग्लडनें स्वत:च्या सर्व साम्राज्याचा एक संघ बनविला. साम्राज्यांतील घटकांनी एकमेकांचाच माल आधीं घ्यावा असें ठरविण्यांत आलें. दुनियेंतील माल स्वस्त असला तरी तो आधीं घ्यायचा नाहीं. जर्मनींतील इंजिनें स्वस्त असलीं हिंदुस्थाननें इंग्लंडमधूनच घेतलीं पाहिजेंत. अशी ही साम्राज्याची भिंत इतरांच्या व्यापाराच्या आड इंग्रजांनीं उभी केली. जकाती अधिक बसविणें सुरू झालें. अशा परिस्थितींत जर्मनी, इटली, जपान वगैरेंनी काय करावें? जपाननेंहि स्वत:च्या देशांत कामगार दडपून ठेवलें. त्यानें चीनशीं लढाई सुरू केली. जर्मनी व इटली आज युध्दांत पडलींच आहेत. आज अमेरिकेची इंग्लंडला सहानुभूति असली तरी लढाईपूर्वी या दोघांची चुरसच होती. आणि अमेरिका आजहि अद्याप साशंकतेनेंच जपून वागत आहे. जगाच्या स्पर्धेत आपला माल स्वस्त देतां यावा म्हणून कामगारांस कमी पगार द्यावा लागतो. कामगार असंतुष्ट होऊ नयेत किंवा भडकू नयेत म्हणून त्यांच्या संघटना बेकायदेशीर ठरविण्यांत येतात. सर्व सत्ता एका पक्षाच्या हातीं घ्यावी लागते. आणि शेवटीं युध्दाची तयारी करून वसाहती मिळविण्यासाठीं, आपलें मोठें साम्राज्य स्थापण्यांसाठी तयार राहावें लागतें. हिटलर व मुसोलिनी युध्द ही पवित्र वस्तु मानतात ! '' युध्दांतच मनुष्याची खरी कसोटी. त्यांच्या गुणांची खरी परीक्षा तेव्हांच होते. युध्द टाळणें योग्य नव्हें. युध्दांत विजयी होण्यासाठी सर्वांनीं पराकाष्ठेचा त्याग केला पाहिजे. सर्व राष्ट्रानें युध्दांच्या तयारींत सदैव असलें पाहिजे. नेहमीं पिस्तुलावर हात असला पाहिजें. '' असें या पंथाचें म्हणणें आहे. युध्द हा यांचा देव आहे.

मनुष्यांतील सर्व बौध्दिक व हार्दिक उच्चभाव प्रकट होण्यासाठी युध्दाचीच का जरूर आहे? दलदली नाहींशा करणें, रोगराई दूर करणें, पृथ्वी अधिक आनंदमय होण्यासाठीं झटणें यांत का पुरुषार्थ नाहीं? महारोग्यांची शुश्रूषा करण्यांत का धैर्य नाहीं? पुरुषार्थ दाखवावयास रणांगणच पाहिजे असें नाहीं. आणि मनांतील कुरूक्षेत्र तर आहेच मोठें रणांगण ! मुसोलिनी व हिटलर जगाला जिंकतील, परंतु ते स्वत:ला जिंकतील तर अधिक वीरपुरूष होतील. संतहि लढतच असतात. तुकाराम महाराजांनीं म्हटलें आहे -----

''रात्रंदिन आम्हां युध्दाचा प्रसंग. अंतर्बाहय जन आणि मन''

परंतु ही उच्चतेची लढायी यांना नको असते. त्यांना एकमेकांची हत्या करण्याची, आसुरी आनंदाची लढाई हवी असते. वाघाला हरीण मारून जसा आनंद होतो तसा या फॅसिस्टांना अ‍ॅबिसीनियावर विषारी वायु सोडून, लोकांना तडफडत मरतांना पाहून होतो !

श्यामची पत्रे

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
पत्र पहिले 1 पत्र पहिले 2 पत्र पहिले 3 पत्र पहिले 4 पत्र पहिले 5 पत्र पहिले 6 पत्र पहिले 7 पत्र दुसरे 1 पत्र दुसरे 2 पत्र दुसरे 3 पत्र दुसरे 4 पत्र दुसरे 5 पत्र दुसरे 6 पत्र दुसरे 7 पत्र दुसरे 8 पत्र तिसरे 1 पत्र तिसरे 2 पत्र तिसरे 3 पत्र तिसरे 4 पत्र तिसरे 5 पत्र तिसरे 6 पत्र तिसरे 7 पत्र तिसरे 8 पत्र तिसरे 9 पत्र चवथे 1 पत्र चवथे 2 पत्र चवथे 3 पत्र चवथे 4 पत्र चवथे 5 पत्र पाचवे 1 पत्र पाचवे 2 पत्र पाचवे 3 पत्र पाचवे 4 पत्र पाचवे 5 पत्र पाचवे 6 पत्र पाचवे 7 पत्र सहावे 1 पत्र सहावे 2 पत्र सहावे 3 पत्र सहावे 4 पत्र सहावे 5 पत्र सहावे 6 पत्र सातवे 1 पत्र सातवे 2 पत्र सातवे 3 पत्र सातवे 4 पत्र सातवे 5 पत्र सातवे 6 पत्र सातवे 7 पत्र आठवे 1 पत्र आठवे 2 पत्र आठवे 3 पत्र आठवे 4 पत्र आठवे 5 पत्र आठवे 6 पत्र आठवे 7 पत्र आठवे 8 पत्र आठवे 9 पत्र नववे 1 पत्र नववे 2 पत्र नववे 3 पत्र नववे 4 पत्र नववे 5 पत्र नववे 6 पत्र नववे 7 पत्र नववे 8 पत्र नववे 9 पत्र दहावे 1 पत्र दहावे 2 पत्र दहावे 3 पत्र दहावे 4 पत्र दहावे 5 पत्र दहावे 6 पत्र अकरावे 1 पत्र अकरावे 2 पत्र अकरावे 3 पत्र अकरावे 4 पत्र अकरावे 5 पत्र बारावे 1 पत्र बारावे 2 पत्र बारावे 3 पत्र बारावे 4 पत्र बारावे 5 पत्र बारावे 6 पत्र तेरावे 1 पत्र तेरावे 2 पत्र तेरावे 3 पत्र तेरावे 4 पत्र तेरावे 5 पत्र तेरावे 6 पत्र तेरावे 7 पत्र तेरावे 8 पत्र तेरावे 9 पत्र तेरावे 10 पत्र चवदावे 1 पत्र चवदावे 2 पत्र चवदावे 3 पत्र चवदावे 4 पत्र चवदावे 5 पत्र चवदावे 6 पत्र चवदावे 7