पत्र नववे 5
वसंता, रामचंद्रपंत आमात्यांनी शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र म्हणून लिहिलें आहे. निर्णयसागर प्रेसनें तें प्रसिध्द केलें आहे. तें तूं अवश्य वाच. लहानसें बत्तीस पानांचें मला वाटतें तें पुस्तक आहे. परंतु फार सुंदर ! शिवाजी महाराजाच्या राजनीतीचें त्यांत वर्णन आहे. शिवाजी महाराजांनीं कोणते हुकूम काढलें? '' प्रजेनें पोटच्या पोराप्रमाणें वाढविलेलीं झाडें, हयांची फळें खबरदार कोणी तोडून घेईल तर? रयतेच्या गवताच्या काडीसहि कोणी स्पर्श करतां कामा नये ! '' असें हें गोरगरीबांचें राज्य शिवाजी महाराज करूं पहात होते. त्यांनीं वतनें-जहागि-या कोणाला दिल्या नाहींत. शिवाजी महाराज काळाच्या फार पुढें होते. त्यांचें धोरण, त्यांची दूरदृष्टि पुढील लोकांत राहिली नाहीं. मराठयांचे राज्य झालें. परंतु आले नि गेले ! असें कां? भगव्या झेंडयाचा अर्थ आपण विसरलों. पहिले माधवराव पेशवे यांनीं तो अर्थ ओळखला. परंतु हया हि-याला आयुष्य कमी पडलें. मराठयांचें साम्राज्य झालें, पण स्वराज्य गेलें ! जनतेला हें राज्य आपलें आहे असें वाटेना. ठायीं ठायीं मातबर सरदर झाले व प्रजेनें सुख नाहीसें झालें.
भगव्या झेंडयाचा अर्थ बहुजनसमाजाचे हित. हा अर्थ जर हिंदुमहासभेच्या लोकांच्या ध्यानांत येता तर काँग्रेसला त्यांनीं विरोध केला नसता. कूळकायदा, कर्जनिवारण कायदा यांनी त्यांनीं विरोध तर नसताच केला, उलट '' खोती नाहींशीं करा, हे इनामदार, जमीनदार जर जनतेसाठी नसतील तर दूर करा, हे संस्थानिक प्रजेची पोटच्या पोराप्रमाणे चिंता वाहत नसतील तर त्यांना जगायला अधिकार नाहीं. '' असें त्यांनीं म्हटलें असतें. परंतु भगव्या झेंडयाचा अर्थहि न कळण्याइतकी त्यांची बुध्दि कोती झाली आहे. जो जो श्रीमंतांची, संस्थानिकांची, खोतांची, जमीनदारांची, पिढीजाद प्रतिष्ठांची बाजू घेईल त्यानें भगवा झेंडा नाहीं हातीं घेतला, त्यानें तो वस्तुत: भस्म केला, असेंच श्रीशिवाजी महाराज वरून म्हणतील.
आज आमचे पुष्कळ हिंदु संस्थानिक भगवा झेंडा सरकारी इमारतीवरुन लावतात. तो का गंमत आहे? प्रजेला हक्क नाहींत, काहीं नाहीं, जनतेच्या उत्पन्नापैकीं वाटेल तितका पैसा स्वत:च फस्त करतात. अशांना का भगव्या झेंडयाचा अर्थ कळला? त्याला खरोखर भगव्या झेंडयाचा अर्थ कळला जो जनतेला स्वराज्य द्यावयास तयार झाला. आमच्या हिंदु सभावाल्यांनी हा अर्थ हिंदु संस्थानिकांना जरा समजावून द्यावा. हिंदु इनामदार, जमीनदार यांस समजावून द्यावा.
वसंता, खरी गोष्ट ही की तत्वनिष्ठा आमच्याजवळ नहीं. आमच्याजवळ खोटी प्रतिष्ठा, अहंकार, गर्व, घमेंड, हट्ट, दुराग्रह, एकांडे शिलेदारपणा, सा-या गोष्टी शिल्ल्क आहेत. असों आपण काय कारणार? आपण श्रध्देने मोठी राष्ट्रीय दृष्टि घेऊन जेवढें होईल तेवढे करण्याची खटपट करु या.
हिंदुस्थानांत जवळ जवळ सातशें संस्थानिक आहेत. परंतु दहाबाराच संस्थानें मोठी आहेत. बाकी सारी लहान लहान संस्थानें ! काठेवाडांत तर संस्थानिकांचे पीकच आहे ! जणुं एकेक गांव म्हणजे संस्थानच. कांहीं संस्थानें इतकीं लहान आहेत की त्यांचे वर्षाला ९६ रुपयांचेहि उत्पन्न नाही १ हीं संस्थाने म्हणजे केवळ अडगळ आहे. प्रगतीच्या मार्गातील धोंड आहे. हे स्वत: हलत नाहींत, इतरांला हलूं देत नाहींत. हीं लहान लहान संस्थाने कधींहि स्वाश्रयी व स्वावलंबी होऊं शकणार नाहींत. त्यांना ना प्रजेला देता येईल शिक्षण, ना वाढवता येईल व्यापार कशांसाठी हीं आहेंत देव जाणे !