पत्र बारावे 5
पुष्कळदां म्हणण्यात येत असतें कीं, आमच्या देशाच्या स्वातंत्र्यावर हल्ला झाला. अरे, परंतु त्या देशांतील गरीबांना आहे का स्वातंत्र्य? स्वातंत्र्य याचा अर्थ तेथील सत्ताधारी वर्गाचें स्वातंत्र्य, बहुजनसमाजाला मिळण्याचें स्वातंत्र्य ! त्यांच्या सत्तेवर हल्ला होतो आणि ते ओरड करतात कीं, आमच्या स्वातंत्र्यावर आक्रमण झालें. परंतु तेथील बहुजनसमाज पायांखालीं घातलेला असतो. तो बहुजनसमाज त्या आक्रमणाचें स्वागत करतो, जर तें आक्रमण रशियासारखें असेल तर.
समाजवादी अशी बाजू मांडत असतात व शेवटी सांगतात, ''समाजवादी रशियाच्या प्रयोगाकडे सहानुभूतीने पहा. वीसपंचवीस वर्षे तर प्रयोगाल झाली. एकंदरीनें रशिया सुधारला आहे कीं नाहीं ते पहा !''
रवीन्द्रनाथ ठाकुर रशियांतील शिक्षणप्रयोग पहावयास गेले होते. त्यांना तेथील शैक्षणिक क्रान्ति पाहून आश्चर्य वाटलें. त्यांनीं एका रशियन शेतक-यास विचारलें, '' तुमच्या या नवीन प्रयोगांत कुटुंबपध्दति नष्ट नाहीं का होणार? '' तो शेतकरी म्हणाला, '' कुटुंब म्हणजे काय तें आतां आम्हांस समजूं लागलें. पूर्वी कसलें कुटुंब? मी उजाडत कारखान्यांत भोंगा वाजतांच कामावर जात असे. दिवसभर काम करावें. रात्रीं दमून घरीं यावें. भाकर खावी व मेल्यासारखें पडावें ! कामावर जातांना मुलें झोपलेलीं. कामावरुन परत येतों तों मुलें झोपलेलीं !! मुलांजवळ बोलतां येत नाहीं. हसतां खेळतां येत नाही. बायकोबरोबर कोठलें सुखाचें बोलणें? परंतु आतां कामाचे तास कमी होतील. बायकोबरोबर मी फिरावयास जाईन. हंसेन, बोलेन.आम्ही दोधें कामावर गेलों तर पाठीमागें मुलांची चितां नसले. बालसंगोपनगृहांत तीं खेळतात. संध्याकाळीं मुलें घरीं येतात. आम्ही भेटतों. मुलांना जवळ घेतों. आनंद आहे आतां. कुटुंब म्हणजे काय तें आतां कळूं लागलें. समाजवादी समाजरचनेंत वैयक्तिक व खासगी अशी मालमत्ता राहिली नाहीं. तरी पतिपत्नींचे प्रेमळ संबंध राहतील. मुलांचें प्रेम राहील. मुलांसाठीं इस्टेटी ठेवण्याची जरूरी वाटणार नाहीं. '' रवीन्द्रनाथांना त्या कामगारांचें तें बोलणें ऐकून आश्चर्य वाटलें. रवीन्द्रनाथांनी रशियांतून आल्यावर लेख लिहिला. चौदा पंधरा वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. त्या लेखांत रवीन्द्रनाथांनीं रशियानांची पाठ थोपटली. परंतु ते शेवटी म्हणतात, '' हें सारें अहिंसेनें करतां आलें असतें तर? ''
गांधीजी अहिंसेवर भर देतात. महात्माजींचा सर्वोदयाचा प्रयोग आहे. श्रीमंतानीं विश्वस्त व्हावें व गरिबांसाठीं झिजावें. त्यांनाहि जगावें, आणि गरिबांनहि नीट जगूं द्यावें. श्रीमंत न ऐकतील तर गरिबानें अहिंसात्मक सत्याग्रही लढाकरावा. त्या श्रीमंताचा हृदयपालट आपल्या बलिदानानें करावा. असा हा गांधीजींचा मार्ग आहे. हरिजनमध्यें महादेवभाईंनी लिहिलें, '' निवडणुकी समजावादाच्या कार्यक्रमावर लढवून बहुमत मिळवून जर कोणी कायदे करूं लागला तर तें सनदशीर आहे. कारण बहुजनसमाजानें त्या कार्यक्रमांस मान्यता दिली आहे. '' परंतु उद्यां स्पेनमध्यें झालें तसें होईल. या देशांतील भांडवलवाले, सरंजामदार, मठवाले व देवस्थानवाले, संस्थानिक, जमीनदार, खोत सारे एक होतील. त्यांच्या पांढरपेशा स्वयंसेवक संघटना उभ्या आहेत. या संघांच्या लाठया समाजवादी कायदे करणा-यांवर पडतील. अशा वेळीं अहिंसेनें प्रतिकार करावयाचा कीं, सेना उभारायची, गरिबांची श्रमणा-यांची पलटण उभारायची? गांधीजी म्हणतील, '' अहिंसक शांतिसेना उभारूं, मुकाटयानें बसण्यासाठी नाहीं तर शांतपणें प्रतिकार करण्यासाठी. प्रतिकार करूं, परंतु तो अहिंसक. '' परंतु समाजवादी म्हणतील '' आम्हांला तर हिंसेचाच आश्रय करावा लागेल. '' स्पेनमध्यें शेतकरी-कामकरी पडले. कारणे सर्व बाजूंनी भांडवलवाल्या राष्ट्रांनीं घेरलें आणि मदत देणा-या रशियाचेंहि धोरण तऱ्हेवाईक व फसवें होतें. परंतु सर्वत्र काहीं असेंच होणार नाहीं.