पत्र बारावे 3
शिवाय अहिंसा हा आमचा मार्ग. जें कांही करावयाचें तें अहिंसेच्या मार्गानें. तुमच्या आमच्यांतील इतर भेद दूर गेले समजा. परंतु हा सार्वभौम भेद राहीलच. कांदे पेरले तर कांदेच उगवतात. आत्याचारानें कधींहि भलें होत नहीं. जे कांही भलें मागून झाल्यासारखें दिसतें ते अत्याचारामुळे नव्हे, आपण जें भलें करूं त्यानेंच भलें होतें. आई मुलांना मारते. परंतु मागून त्याला ती पोटाशीं घेतें. त्याची समजूत घालते. मुलाच्या मनांत आईबद्दल राग आला असला तर मागूनच्या त्या प्रेमानें तो जातो. पण म्हणजे आईच्या मारण्याचा तो परिणाम नव्हे. मुलगा आईजवळ बरा वागतो, तो आईच्या ब-या वागण्याचा परिणाम. हिंसा व अत्याचार समाजांत अनेक प्रकारें विष पेरतात. तीं विषें केव्हां कशीं बरे येतील तें कळतहि नाहीं. म्हणून अहिंसेचा उपाय हाच भला. हिंसेंनें जी सुधारणा लोकांच्या गळी मारावी लागेल ती सुधारणा न होतां शेवटीं शापरूपच ठरेल. म्हणून 'अहिंसेच्या मार्गानें एक पाऊल पुढें पडलें तरी पुरे' असें आमचें मत आहे. घिसाडघाई काय कामाची? मानवजातीचें जीवन सुधारणें म्हणजे माकडचेष्टा नाहीं. घेतलें कोलीत, लावली आग, असा तो प्रकार नाहीं. अहिंसेनें किती वर्षे लागतील, असें विचारण्यांतहि अर्थ नाही. जगाचे प्रयोग पाहतांना हजार वर्षे म्हणजे एक घटका मानावी लागेल. या विशाल विश्वरचनेंत तुम्ही आहांत. तुम्हांलाच कसें पटकन् झटपट रंगारी बनतां येणार आहे?
जंतूंतून मनुष्य उत्क्रान्त व्हायला ५० लाख वर्षे लागली. मानवी जीवन सुखी व्हायला अनंत काळ लागेल. आणि तुमच्या विरोध विकासाच्या सिध्दान्ताप्रमाणें तर अशाला अंतच नाहीं. सारखी एका परिस्थितिच्या परिणतावस्थेंतून प्रसववेदना होऊन दुसरी परिस्थिती निर्माण होणार. मग तुम्हांला किती काळ लागणार याची भीति वाटायची जरूरच नाही. कारण अंत व समाप्ति कधींच नाही.
गांधीवाद्यांच्या या सर्व गोष्टींना उत्तरें अशीं :
यांत्रिक कामामुळें आनंद जातो व ग्रामोद्योगी कामांत आनंद असतो असें जें गांधीवाद्यांचे म्हणणें आहे त्याला समाजवादी उत्तर देतात की, आपल्या कामांतच आनंद मानणें हें काव्य आहे ! एखाद्या विनोबाजींना सूत कांततांना परमानंद होत असेल. त्यांना वाटेल कीं, या कापसाच्या पेळूंतील अव्यत्क परमात्मा सुत्र रूपानें व्यक्त होऊन जणुं बाहेर पडत आहे. त्यांना वाटेल कीं, हें सूत मला सर्व गरीबांशीं जोडीत आहे. त्यांना वाटेल कीं, हिंदुमुसलमानांचे ऐक्य या धाग्यांत आहे. त्यांना वाटेल कीं साधेपणा, सरळपणा, शुध्दपणा या सुतांत आहे. ते चरक्याचें गूं गूं त्यांना ॐ ॐ ची कल्पना देईल. अशा अनेक सहृदय भावनांनी रंगून ते कांततील. परंतु मजुरीनें आठ आठ घंटे कांतणारे आपले पेळू कधीं संपतात याचीच वाट पहात असतील ! शेतक-यांचें जीवन किती छान म्हणून वर्डस्वर्थ कवि नाचेल. ' आम्ही शेतकरी दैवाचें ' असें कवि म्हणोत. पंरतु तो शेतकरी राबत असतो. थंडीत कुडकुडतो. चिखलांतून जातो. पावसांत भिजतो. त्याला ऊन लागतें. पायांत कांटे जातात. कधीं साप भेटतो, कधीं वाघ दिसतो. कधीं पुरांतून त्याला जावें लागतें. कधीं पाऊस येत नाहीं. कधीं पिकलें तर भाव नाहीं. सावकार, सरकार तर आहेतच. कोठला त्याला आनंद? आपल्या महान् कार्यात आनंद मानतां यावा, परंतु या स्थितीस पोंचणा-या माणसाचा परम विकास झालेला असावा लागतो. सर्वसामान्य जनता कामाला कामच म्हणजे व काम केव्हा एकदां संपेल याचीच जनता वाट बघतें.