पत्र चवदावे 6
भारताचें आजचें ध्येय गांधीजी दाखवीत आहेत. कोणतें ध्येय खरें मानावें? जें ध्येय जास्तींत जास्त जनतेचें कल्याण साधूं पाहील तें थोर ध्येय. हिंदु-मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यांवर, खादी, गरिबांचे स्वराज्य, गरिबांची सेवा अशीं महान् ध्येयें उत्पन्न झाली आहेत. या ध्येयांना सुंदर पोषाख घालुन ती सर्वत्र नेणें हें कलावंताचें काम आहे. मी चित्रकर असून तर हिंदू मुस्लिम ऐक्याचें चित्र रेखाटीन. खादीमुळें गरिबांस कसा घास मिळत आहे ते दाखवीन. हरिजन डबक्यांतीलच पाणी कसें नेत आहे तें दाखवीन. जर सर्व प्रकारचे कलावान् महान् प्रज्ञावंतानीं जीं ध्येयें निर्माण केली, बहुजनसमाजाला सुखी करण्यासाठी जीं ध्येयें निर्माण केली, त्या ध्येयांना जर आपल्या ब्रशानें, लेखणीनें, वाणीनें रंगवतील तर जीवनाला कळा चढेल. जीवन सुंदर होईल. जीवनांत खरा टिकणारा आनंद येईल. इंग्रजींत डी किन्सी म्हणून एक थोर लेखक झाला. दुसरें सामर्थ्यसंपन्न वाङमय, Literature of knowledge and literature of power. ज्ञानमय वाङमय म्हणजे ऐतिहासिक, शास्त्रीय किंवा त्वज्ञानात्मक वाङमय. हें वाडमय बदलत असतें. एक सिध्दांन्त जातो, दुसरा येतो. टॉलेमीचा शोध खोटा ठरला. केप्लूरचाव कोपर्निकसाचा आला. न्यूटनचा शोध होता तो आइन्स्टीननें बदलला. राजवाडे यांचें कांहीं सिध्दान्त होते. ते आज मागें पडले. अशा रीतीनें हें वाङमय निश्चयात्मक नसतें. तें चुकांतूनच वाढत जातें.
परंतु दुसरे जें सामर्थ्य-संपन्न वाङमय, जीवनांतील वाङमय, तें कधीं मागें पडत नाही. रामायण कितीहि काळ गेला तरी ताजेंच वाटेल. प्रभु रामचंद्र सत्याचा महिमा सांगत राहतील. भरत व लक्ष्मण बंधुप्रीति शिकवीत राहतील. सीता त्याग शिकवील. हनुमान सेवा शिकवील. ते अमर आदर्श आहेत. अशा वाड्मयाला सामर्थ्यमय वाङमय समजावें. असें जें सामर्थ्य-संपन्न वाङमय असतें तें जडांना चैतन्य देतें, मढयांना उठवितें, निद्रितांना जागृति देतें. सूर्याचे किरण येतांच सारी सृष्टि चैतन्यमय होते, त्याप्रमाणें सामर्थ्यवान लेखणी सर्वांना अंधार दूर करायला लावते, अन्याय दूर करण्यास उठवितें. असें सामर्थ्यवान वाङमय आज हवें आहे. समाजांतील विषमात, दास्य, अन्याय, पिळवणूक वैगरे अनंत विपत्तींनी घाबरुन नाहीं जातां कामा. तिकडे कानाडोळा करुन दिवाणखान्यांत आनंदाच्या भ्रमांत राहण्यानें वस्तुस्थिती बदलत नसते.
असें प्रतिभासंपन्न व सामर्थ्यसंपन्न वाङमय, जनतेचें जीवन आपण पाहूं तर निर्मिता येईल. सागरांत बुडया मारुं तर मोती मिळतील. तीरावर गंमत कराल तर शिंपा व कवडया याशिवाय काय मिळणार? आज आमचे साहित्यिक जनतेच्या जीवनांत खोल शिरावयास भीत आहेत. ते घाबरतात. त्यांची छाती होत नाही. ते तीरावरच शीळ वाजवीत बसले आहेत ! अशांना साहित्यिक ही पदवी मी कशी देऊं?
पूज्य विनोबाजींनीं गीताई लिहिली. गीतेची मराठी समश्लोकी लिहिली. त्यांची आई त्यांना म्हणत असे, '' मला ही संस्कृत गीता नाही रे समजत. '' विनोबाजींनीं वामनपंडिताची समश्लोकी आईला दिली. तीहि तिला नीट समजेना. शेवटीं गीतेतीलच सोपे लोक काढून त्यांनी ते आईला दिले. तेव्हांपासून त्यांच्या मनांत स्त्रिया, मुलें, अशिक्षित लोक सर्वांना सहज समजेल असें गीतेचें समश्लोकी भाषांतर करण्याचें होतें. तें त्यांनी पुढें केले. १९३२ मध्यें तें प्रसिध्द झाले. सर्व जनतेला सुटसुटीत असें गीताधर्माचें पुस्तक मिळालें ! तें पुस्तक लिहितांना विनोबाजींच्या समोर हा महान् महाराष्ट्र होता. दिवाणखान्यांतील महाराष्ट्र त्यांच्या डोळयांसमोर नव्हता. भाषांतरित श्लोक रोज आश्रमांतील मुलींना ते देत. त्या मुलींना समजलें म्हणजे विनोबांजींना समाधान होईल. मराठीत हें अपूर्व व ईश्वरी प्रसादानें भरलेलें गीताई पुस्तक लाखांवर खपलें. परंतु एकाहि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षानें त्या गीताईचा उल्लेख केला नाहीं. ! जें पुस्तक जनतेनें जवळ घेतलें, त्याचा आमच्या साहित्यिकांना पत्ताहि नाही !! ते आपल्याच दिवाणखानी जगांत आहेत. तेथें त्यांच्या चर्चा चालल्या आहेत. परंतु दु:खी, कष्टी, अडाणी, जनतेची चर्चा करावयास कोणीहि उठत नाहीं. ती जनता त्यांच्या डोळयांसमोर नाहींच मुळीं.