पत्र सातवे 3
काँग्रेसनें चीनला सहानुभूति दाखविली. चीनमध्यें जखमी शिपायांची शुश्रूषा करावयास डॉक्टर पाठविले. काँग्रेसनें स्पेनला गलबतभर धान्य पाठविलें. कॉग्रेसनें अबी सिनीया, पॅलेस्टाईन यांना सहानुभूति दाखविली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौध्दिक वर्गातून सांगण्यांत येत असते की '' काँग्रेसची बाहेर दृष्टि. ती चीनला मदत पाठवील, स्पेनला पाठवील, तुर्कस्तानला पाठवील. परंतु सक्करच्या हिंदूंना मदत पाठवणार नाहीं. '' काँग्रेसनें सक्करच्या हिंदूनाहि मदत पाठविली. हिंदुमहासभावाल्यांनीं पाठविली त्याहून अधिक पाठविली. साठ सत्तर हजार रुपयांची मदत तेथें काँग्रेसनें पाठविली. सिंधमध्ये हिंदूंचे खून होत आहेत याचा काँग्रेसला कांहीं आनंद नाही. काँग्रेस रडत आहे. महात्माजींनीं सिंधमधील काँग्रेस कमिटीस लिहिलें, '' हे अत्याचार थांबवण्यासाठीं मरा, नाही तर काँग्रेस खतम् करा. '' सिंधमधील त्या आगीत उडी घ्यायला काँग्रेसचे राष्ट्रध्याक्षच शेवटी गेले ! महात्माजींच्या आश्रमांतील मुस्लीम भगिनी तेथें गेल्या. हिंदुमहासभेचे कोण तेथें गेले होते? राष्ट्रध्यक्षांनीं शक्य तें सर्व तेथें जाऊन केलें. केसरी पत्रानें लिहिलें, '' काँग्रेसला हे पूर्वीच करतां आलें असतें ! '' परंतु बाबा काँग्रस तर मुसलमान धार्जिणी ना? तुम्ही तर हिंदूंच्या हितासाठी सवता सुभा उभारलात ना? तुम्हीं कां तेथें जाऊन दिले लावले नाहींत?
काँग्रेस काय करायचें, केव्हां करायचें तें जाणते. सक्करमध्यें हिंदुबंधूचे खून होतात. आमची ही कसोटी आहे. ज्याप्रमाणें डॉ. आंबेडकर अलग राहण्यासाठी कॉग्रेसची परीक्षा घेतात, त्याप्रमाणे मुस्लीम-हिंदी जग अलग करण्यासाठी धर्मांध मुसलमानांचे ते प्रयत्न असतील. परंतु अशाच वेळी श्रध्देची सत्वपरीक्षा असते. सामान्य परिस्थितींत कोणीहि श्रध्दा राखतो. असामान्य व गंभीर परिस्थतींतहि जो आपली मांगल्यावरची श्रध्दा ढळूं देत नाहीं, तोच खरा धर्मात्मा व पुण्यात्मा !
शेतकरी घरांतले मढें झांकून ठेवतो, दु:ख गिळतो व शेतांत पेरणी करायला जातो. त्या दु:खानें तो वेडा होईल तर घरांतील मुलेंबाळे उद्यां काय खातील? त्याप्रमाणें सिंधमध्ये किंवा इतरत्र होणारे अत्याचारहि दु:खानें पोटांत गिळून स्वातंत्र्याची पेरणी करुन, उद्यांचा सर्व भारतीय संसार हिरवाहिरवा दिसावा म्हणून काँग्रेस अहोरात्र झटत आहे. तिची अवहेलना नका करू. तिच्या महान् ध्येयनिष्ठेचें कौतुक करा. समर्थांनी म्हटलें आहे ' अधीर माणसे खोटी '. चुटकी सरसे सर्व प्रश्न सुटणार नाहींत. त्यांनीं पाकिस्तान म्हणतांच आम्ही हिंदूंचें हिंदुस्थान, हिंदूंचे राज्य असें म्हणणें यानें प्रश्र सुटत नाहीं. यामुळें द्वेषाचे वणवे अधिकच पेटतात. ज्यांचें तेंच ध्येय असेल त्यांनीं तसे करावें. माझी माय माउली काँग्रेस शांतीचे कुंभ होऊन हे वणवे विझविण्यासाठीं शक्यतसें सारें करील. श्रध्देनें व विश्वासानें सर्व धर्माचें, सर्व जातींचें, सर्व वर्गांचें कल्याण साधूं पाहील. ती श्रध्देनें आपला दिवा घेऊन जाईल. ज्यानें त्यानें आपल्या हृदयांतील ईश्वराला स्मरून वागावें. दुसरें काय?