पत्र तिसरे 2
श्रीकृष्णाचा हा संदेश आम्ही विसरुन गेलों. उपनिषदांतील संदेश आम्ही विसरुन गेलों. जेथें पिकते तेथें विकत नाही. हीच गोष्ट खरी. त्यानंतर साधुसंतांनीं पुन्हां या दुष्ट रुढीवर हल्ले चढविले. परंतु साधु-संतांचाहि छळ झाला. जो जो कोणी समाजाला नवीन प्रकाश देतो त्याचा समाजांत छळ होतो. आद्य-शंकराचार्यांनी दक्षिणेंतील निरनिराळया देवतांची उपासना करणा-यांत भांडणे होत तीं मोडण्याकरतां पंचायतन-पूजा रुढ केली. सारे देव एकाच परमेश्वराचीं रुपें आहेत असें प्रदिपादलें. अद्वैत जीवनांत आणा, असें त्यांनी सांगितले. परंतु त्यांचाछळ झाला. ते आपल्या आईला मरतांना भेटायला गेलें म्हणून त्यांच्या मृत आईचा देह न्यावयास कोणी येईना ! शंकराचार्यांना एकटयाला तो देह नेववेना. त्यांनीं त्या देहाचे तुकडे केले. एकेक तुकडा स्मशानांत नेला. मलबारच्या बाजूला मृत मनुष्याचा देह स्मशानांत नेंताना त्याच्या देहावर भस्माच्या तीन रेषा ओढतात. ती खूण राहिली आहे !
साधुसंतांनीं संस्कृतांतील ज्ञान बहुजन समाजाच्या भाषेंत आणण्याची खटपट केली. त्यामुळें त्यांचा छळ झाला. ज्ञान ही कोणा एका वर्गाची मिरासदारी नसावी. ज्यप्रमाणें हवा सर्वांना हवी, ज्याप्रमाणे सर्वांना प्रकाश हवा, सर्वांना अन्नपाणी हवें, त्याप्रमाणें ज्ञानहि सर्वांना हवें. ज्ञान सर्वांना समजेल असें केलें पाहिजे. संतांनीं ज्ञानाच्या बाबतींतील अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ज्ञानाचे दरवाजे सर्वांना मोकळे केले. परंतु ही क्रांन्ति करणा-या संतांचा सनातनी मंडळींनीं छळ केला. ज्ञानेश्वरांसारख्यांवर त्यांनीं बहिष्कार घातला. एकनाथांचे भागवत गंगेंत बुडवायला निघाले. तुकारामांचे अभंग इंद्रायणींत फेंकले. असा छळ केला. परंतु संत आपल्या मार्गापासून परावृत्त झाले नाहींत. आणि आतां महात्मा गांधींनीं त्याच्यापुढचें पाऊल टाकलें आहे. लोक म्हणत असतात कीं आजच कुठलें हें खूळ गांधींनीं काढलें आहे. हें खूळ आज नाही निघालें. हें खूळ प्राचीन काळापासून आहे आणि श्रीकृष्ण भगवानापासून मानव जातीचे सारे उपासक अशा अन्यायांविरुध्द लढत आले आहेत.
अस्पृश्यता ही धार्मिक वस्तू नाही. हा एक वरिष्ठांचा अधिकार आहे. धर्म आम्ही सोयीप्रमाणें बदलतो. उत्तर हिंदुस्थानांत जेथें पाणी लांब असतें तेथें तें आणवयाला हरिजन नोकर ठेवतात ! तेथें पाण्याला विटाळ नाही. आमच्याकडे पाण्यालाहि विटाळ आहे. तेथें पाणी आणणें कठिण आहे म्हणून विटाळ नाहीं. त्यांनी सोय पाहिली, दुसरें काय?
अस्पृश्यतेसाठी शास्त्रे पहाण्याची आम्हांला जरुरी नाहीं. साधी माणुसकी ज्याला कळते तो कधीहि अस्पृश्यता पाळणार नाहीं. एक काळ असा होता की हरिजनांची छाया पडणें म्हणजेहि विटाळ मानीत. अद्यापहि कोठें कोठें असे प्रकार आहेत. कांही कांही ठिकाणीं हरिजनांनी अमक्याच रस्त्यांनी गेलें पाहिजे असे निर्बंध आहेत. मंदिरावर हरिजनांची सावली पडून देऊळ बाटायचे एखादें ! म्हणून हे निर्बंध.
आम्ही हिंदुधर्माच्या बाहेरचे लोकहि ओटीवर घेतों. त्यांना पान-सुपारी देतों आणि वाईटहि कांही नाही. परंतु आमच्याच धर्मातील बंधूंना आम्ही दूर ठेंवलें आहे. सार्वजनिक विहिरीवर मुसलमान पाणी भरतात ! परंतु हरिजन पाणी भरुं शकत नाहीं. मुसलमान अस्पृश्य नाहीत, परंतु आमचेच धर्मबांधव अस्पृश्य ! असें कां बरें?