पत्र नववे 4
हिंदुमहासभा भगवा झेंडा मानते. ठीक आहे. त्यागाने तो झेंडा पूज्य व पवित्र झालेला आहे; पंरतु प्रतीकें व चिन्हें बदलत असतात. आज राष्ट्राचा निराळा झेंडा करावा लागेल. कारण आज सर्व भारताचा आपणांस विचार करायचा आहे. आपापल्या जातींच्या संघटनांपुरती जातीय चिन्हें वापरा, परंतु अखिल हिंदुस्थानासाठी निराळा झेंडा, निराळी खूण निर्मावी लागेल. काँग्रेसनें ती निर्मिली आहे. तिरंगी झेंडा निर्मिला आहे. परंतु पंढरपूरच्या हिंदु युवक परिषदेंत सावरकर म्हणाले, '' हा तिरंगी झेंडा म्हणजे मुरदाड झेंडा आहे ! '' सर्व राष्ट्राचें एकीकरण करण्यासाठी जें प्रतीक निर्माण झालें, जें त्यागानें रंगलें, लक्षावधि खेडयांतून गेलें, ज्याच्यासाठीं अपार बलिदान झालें तो का मुरदाड झेंडा? चाळीसगांव तालुक्यांत हिंडतांना मीं असें पाहिलें कीं, वंजारी लोक तिरंगी झेंडा पाहतांच धांवत येत. तिरंगी झेंडयाचें ते चुंबन घेत ! रानावनांतील लोकांतहि आशा व चैतन्य या झेंडयानें निर्मिले आहे. या झेंडयानें मढयांना जागृति दिली आहे.
आणि भगवा झेंडा कशासाठीं उभा होता? भगव्या झेंडयाचा आम्ही जरीपटका केला ! आम्ही साम्राज्यवादी झालों ! भगवा झेंडा याचा अर्थ असा होता कीं, राजा संन्यासी आहे. प्रजेच्या पैशावर तो स्वत:ची चैन चालवणार नाहीं. श्रीशिवाजी महाराजांना तो अर्थ अभिप्रेत होता. शिवाजी महाराजांना पांच पातशहा आजूबाजूस असतांहि क्रान्ति करतां आली. कशाच्या जोरावर करतां आली? बहुजनसमाजासाठीं ते उभे होते. मावळे शेतकरी होते. त्यांना नव्हतें पोटभर अन्न, नव्हतें अंगभर वस्त्र, समर्थांनीं लिहिलें आहे, '' न मिळे खावया, खावया, खावया ! '' खावया हा शब्द त्यांनीं तीनतीनदां उच्चारला ! सर्वत्र गढीवाल्यांचें राज्य होतें. प्रत्येक गांवाला गढी असे. तेंथे सरदार असे. गांवच्या लोकांनी राबावे व गढीवाल्यांनीं फस्त करावें ! बखरींत अशा अर्थाचें लिहिलें आहे; '' हे गडीवाले नष्ट करण्याकरतां शिवाजी महाराजांचा अवतार होता ! ''
अवतार म्हणजे वरून खाली येणें. शिवाजी महाराज खालच्या गरीबांत येऊन मिसळलें. त्याच्या सुखदु:खांशीं समरस झाले. म्हणून त्यांना अवतार म्हणावयाचे, त्या वेळेस केवळ मुसलमानांचाच त्रास होता असे नाही, हिंदू गढीवाल्यांचाहि त्रास होता. ठायीं ठायीं हिंदु व मुसलमान सरंजामी सरदार होते. आणि जनता निस्त्राण झाली होती. शिवाजी महाराजांना हिंदू व मुसलमान दोन्ही गढीवाले नष्ट करावे लागले.