पत्र पहिले 7
आणि मरतुकडें सेवादल नको. सेवादलास सर्व कांही हवें. बँडहि हवा. मुलांना हें सारें हवें असतें. यासाठीं पैसे हवेत. कोठून आणायचे पैसे? सारीं सोंगें आणतां येतात, परंतु पैशाचें सोंग आणतां येत नाहीं. मला पुष्कळ वेळां वाटतें कीं २६ जानेवारीला आपण स्वातंत्र्य-दिन पाळतों. त्यादिवशी हजारों ठिकाणीं आपण सभा घेतों. त्या सभांतून त्या दिवशीं सेवादलासाठीं मदत गोळा करावी. आधीं जाहीर करुन ठेवावें कीं प्रत्येकांनें जास्तींत जास्त मदत सेवादलासाठी आज आणावी. एक चादर पसरून ठेवावीं. सर्वांनीं तिच्यावर आणलेली मदत टाकावी. किंवा सेवादल स्थापनेचा दिवस पाळावा. आणि त्या दिवशीं दलांतील प्रत्येकानें जास्तींत जास्त मदत आणून द्यावी. काँग्रेसच्या सेवादलाविषयीं ज्यांना ज्यांना म्हणून आपलेपणा वाटत असेल त्या सर्वांनी त्या दिवशीं देणगी द्यावी. काँग्रेसविषयीं जनतेंत अपार श्रध्दा आहे. स्वातंत्र्यासाठीं पुन:पुन्हां वनवास भोगणारी, आगींतून जाणारी थोर काँग्रेस संस्था ! त्या काँग्रेसचेंच सेवादल हें अत्यंत महत्वाचें असें एक अंग आहे. हे अंग अत:पर मरतां कामा नये. त्याची उपेक्षा होतां कामा नये. जनतेनें सेवादल मरूं देऊं नये. ते वाढीस लावावें. पालकांनी या सेवादलांतच मुलें पाठवावी. मदत द्यावी. होईल, असें होईल. 'सत्य संकल्पाचा दाता भगवान ! ' ही माझी श्रध्दा आहे. सेवादल वाढणार यांत शंका नाहीं. महाराष्ट्रभर ठायीं ठायीं सेवादलाच्या शाखा होणार. माझ्या डोळयाला तें दिव्य दृश्य दिसत आहे. खरी निर्दोष राष्ट्रीयता सर्वत्र जाईल. जातीयतेचा अंधार दूर होईल.
वसंता, आज पुरें, किती तरी वेळ हें पत्र मी लिहीत आहें. बाहेर बरीच रात्र झाली आहे. दूरच्या स्टेंशनवरील घंटा ऐकू येत आहे. जणूं दूर असलेल्या ध्येयाची हांकच कानी येत आहे. ऊठ, कामास लाग, असें जणूं तें सांगत आहे. ज्याला ध्येयाची हांक ऐंकू येते तो धन्य होय. ती हांक ऐकून जो कार्यार्थ प्रवृत्त होतो, त्या ध्येयाला गांठण्यासाठी सर्वस्व द्यायला तयार होतो, तो धन्यतर होय. वसंता, तूं असा एक ध्येयार्थी तरुण हो. तूं होशील अशी मला आशा आहे. आणखी काय लिहूं? तुझ्या सर्व लहान मोठया मित्रांस माझे सप्रेम प्रणाम.
तुझा
श्याम