पत्र नववे 8
अशा वेळेस काँग्रेसनें काय करावें? महात्माजींनी निजाम स्टेट सत्याग्रह थांबवावा असें सुचविले. गल्लत नकों. प्रश्नांची गुंतागुंत नको. आर्य समाजाला त्यांची समाजाची पूजा करण्याचे स्वातंत्र्य हवें होतें. काँग्रेसचा लढा हा सर्व जनतेच्या नागरिक स्वातंत्र्याचा लढा होता. त्या लढयाला कोणतेंहि जातीय स्वरुप देऊं नये याला काँग्रेस जपत होती. आधींच काँग्रेसकडे कोणत्या दृष्टीनें लोक पहातात तें सर्वांना माहीत आहे, म्हणूनच तिला फार जपून पाऊल टाकावें लागतें.
हिंदुमहासभेचासत्याग्रह जातीय होता. कशावरुन? असें कोणी विचारील तर त्याला उत्तर हें कीं जेव्हां कोल्हापूर संस्थानातील सत्याग्रह सुरू झाला तेव्हां हिंदुमहासभेच्या पुढा-यांच्या व इतर श्री. भास्कर जाधवांसारख्यांच्याहि तारा गेल्या कीं, '' छत्रपतींच्या राज्यांत सत्याग्रह होतां कामा नये ! '' छत्रपतींच्या राज्यांत अन्याय होत असेल तरी सत्याग्रह नाहीं होता कामा, परंतु निजामांच्या राज्यात मात्र झाला पाहिजे, असें म्हणणा-यांची ही चळवळ केवळ जातीय व एकांगी हाती हें का सांगायला पाहिजे?
बॅ. जिना म्हणतील काश्मिरांत चळवळ करा व हिंदूमहासभावाले म्हणतील कीं फक्त निजाम स्टेटमध्यें करा. परंतु काँग्रेस म्हणेल ''परिस्थिती, वेळ, तयारी हें सारें पाहून जेथें जेथें अन्याय असेल तेथें तेथें चळवळ करा. जेथें आपलें संबंध आहेत, पुढा-यांचे संबंध आहेत तेथें आपण आधी चळवळ करूं या. '' जमनालालजी जयपूरला जावोत. मी राजकोटला जातों. असें धोरण गांधीजींनी सुरू केलें. कारण इतर संस्थानांतल्या प्रश्नांपेक्षां हया संस्थानांतील प्रश्न सोडविणें जरा सोपें. कारण हीं संस्थानें लहान, एकजिनसी आणि चळवळ करणारेहि मूळचें त्याच संस्थानचें.
राजकोटला स्वत: महात्माजी गेले. परंतु राजकोटचा प्रश्न रंगला. सारें हिंदुस्थानचे राजकारण तेथें आलें. हिंदुस्थानच्या राजकारणांत ज्याप्रमाणें कांही मुसलमान, कांहीं आंबेडकरवाले अडथळा आणतात तसें राजकोट येथेंहि झालें. जिनाहि तेथें ठाण देऊन बसले ! आंबेडकरहि तेथें धांवले ! आणि हिंदुस्थानांत हिंदु-मुसलमान, स्पृश्य-अस्पृश्य हे भेद निर्मून हिंदुस्थानची गुलामगिरी कायम ठेवणारे तेथेंहि लोकांचा प्रश्न सोडविण्याच्या आड आले ! सरकारी एजंटानींहि नाना कारवाया केल्या. महात्माजींनीं उपवास केला. राजकोटचा तो सत्याग्रही इतिहास अति दु:खदायक आहे.
आमच्या महाराष्ट्रांतील काँग्रेसद्वेष्टे जातीय लोक म्हणूं लागले, '' महात्माजी, निजामस्टेट सत्याग्रह बंद करतात. परंतु राजकोटचा प्रश्न प्राणांतिक उपवासानें धसास लावूं पाहतात. कारण राजकोट गुजरातमधील आहे. गुजरातचे नाक त्यांना वर ठेवायचें आहे ! '' किती क्षुद्र व मत्सरानें भरलेले हे विचार ! अरे बाबा, तूं जातीय घोडें दामटलें नसतेस तर निजाम स्टेट सत्याग्रह बंद झाला नसता. आमचे बाहेरचे हिंदुमहासभेचे सत्याग्रही औरंगाबादला जात व गिरफदार होत. तेथील जनतेला काय चालेलें आहे याचा पत्ताहि नाही? तात्यासाहेब केळकरांनीं ही गोष्ट लिहून जाहीर केली कीं, '' आपण जाऊन गिरफदार होतों पण तेथील जनतेंत काय? ''
महात्माजींनीं सत्याग्रह थांबविला, परंतु पुढील सत्याग्रहासाठीं जनतेंत विधायक कार्याच्या द्वारा जागृति करण्यास सांगितले. हिंदुमहासभेचासत्याग्रह थांबला. डॉ. मुंजे यांनी निजामसाहेबांची पाठहि थोपटली ! परंतु काँग्रेसची पुन्हां सत्याग्रहाची तयारी आहे.