पत्र चवथे 4
अशी ही संस्कृति आपण निर्मित होतो. गुलाब व कमळ एकत्र आणीत होतों. राम व रहिम एकत्र आणीत होतों. मशीद व मंदिर जवळ आणीत होतों. अबीर व बुक्का एकत्र करीत होतों. इतिहासांतहि या गोष्टी आहेत. हिंदुस्थानांतील मुसलमानांस आपण परके असें समजतनासे झालों. शिवाजी महाराजांच्या आरमारावर मुसलमान अधिकारी होते. शिवाजी महाराज अफझलखानाच्या भेंटीस गेले तेव्हां त्यांच्या बरोबर जे शरीररक्षक होते त्यांत एक मुसलमान बंधुहि होता. नादीरशहानें दिल्लीवर स्वारी केली तर बाजीराव दिल्लपितींस लिहितो, 'तुमच्या मदतीसाठीं मी मजल दरमजल येतो. बाहेरच्या शत्रूस काढून देऊं. ''दिल्लीचे बादशहा व मराठें यांचें भांडण असे, परंतु बाहेरचा शत्रु आला तर दिल्लीचा बादशहा हा किती झालें तरी हिंदुस्थानचा, ही भावना होती. पानपतच्या लढाईंत मराठयांकडे इब्राहीमखान गारदी दहा हजार मुसलमान घेऊन होता. तो शत्रूला वश झाला नाहीं. धारातिर्थी तो मेला ! निजामच्या दरबारांत हिंदु मंत्री असत. त्याच्या पदरीं हिंदु सैन्यहि होतें. आम्ही आपसांत लढाया केल्या तरी सारे हिंदुस्थानचे ही भावना होती. मुसलमान बाहेरचे, परके ही भावना नष्ट झाली होती. १८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दांतहि खांद्याला खांद्या लावून लढले.
आपण आपसांत भांडलों नाहीं असें नाही, परंतु ही भांडणें आपसांतील होतीं. म्हणजे आपण एक होतों. भांडणांतून आपण भव्य निर्माण करीत होतों. नवसंस्कृति निर्मित होतों. अरें नवीन अशी राष्ट्र भाषाहि आपण निर्मिली होती. हिंदूंनीं केवळ संस्कृतप्रचुर अशी अपली भाषा दूर केली. मुसलमानांनीं केवळ अरबी व पर्शियन शब्दांनी भरलेली अशी आपली भाषा सोडली. दोघांच्या सल्ल्यानें एक नवीन, संमिश्र, दोघांना समजणारी अशी नवभाषा निर्माण केली गेली. परंतु असे महान् प्रयोग होत असतां हें इंग्रज आले. यांनी येथले उद्योग धंदे मारले. कर्तृत्वास वाव उरला नाही. त्यांनी या देशांत भांडणे लावली. नोकरीशिवाय धंदा उरला नाही. म्हणून त्या नोक-यांसाठीं भांडणे सुरूं झालीं. नोक-यांसाठी प्रत्येकाला अलग रहावें असें वाटूं लागलें. म्हणजे आपआपल्या जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणांत नोक-या मिळतील हा हेतु. ब्राम्हणेत्तर अलग झाले. अस्पृश्य अलग झाले. मुसलमान अलग राहूं जागले. 'आम्हांला इतक्या नोक-या द्या.' या शिवाय दुसरें मागणेंच नाही ! तुकडयांसाठी कुत्री भांडूं लागतील तसें आपण भांडूं लागलों. कोंबडी झुंजवतात त्याप्रमाणे ब्रिटिश सरकार हिंदी जनतेला परस्परांत झुंजवूं लागलें. केवढें हे पाप ! आणि त्यांच्या कारवायांस बळी पडणारे आपणहि किती पापी व करंटे !
वसंता, परकी सत्ता जर आपल्यांत भेद पाडीत असेल तर आपले सर्वांचे काम हें आहे कीं ते भेद मिटविण्यासाठी वाटेल ती किंमत देणें. आपली जी ऐक्यनिर्मितीची परंपरा तिचा सोनेरी धागा हातीं घेऊन आपण जाऊं या. तो धागा इंग्रज तोडीत आहेत. आपणहि मुर्खपणाने तो तोडीत आहोंत. ऐक्य निर्माते ते आपले पूर्वज काय म्हणतील? आपण एकमेकांच्या भल्या गोष्टी गाठवून पुढें जाऊं या. जुन्या उखाळया-पाखाळया काय कामाच्या? जुन्या इतिहासांतील भलें तें स्मरूं व कठीण काळांत तरूं.