पत्र दहावे 6
आर्य लोक मध्य आशियाच्या बाजूस असतांना आजच्या संस्कृताहून जरा निराळी अशी एक अति प्राचीन संस्कृत भाषा बोलत. पुढें त्या आर्यांची एक शाखा हिंदुस्थानांत आली व एक इराणांत राहिली. हिंदुस्थानांत आले त्यांच्या भाषेस संस्कृत नांव मिळालें. इराणांत राहिले त्यांच्या भाषेस पेहेलवी असें नाव मिळालें. पुढें अरबी मुसलमानांनी इराण जिंकले तेव्हा पेहेलवी भाषेंत अरबीचे मिश्रण होऊन पेहेलवीची पर्शियन भाषा बनली. ही पर्शियन भाषा मुसलमानी सत्तेबरोबर हिंदुस्थानांत आली. हिंदुस्थानांतील व्रज भाषा व ही पर्शियन भाषा मिळून आजची उर्दू बनली. मुसलमानांच्या लष्करांत शेंकडों ठिकाणचे लोक असत. या सर्वांनी एक भाषा तयार केली. ही बाजारांत, लष्करांत सुरू झाली. बहुजन समाजाची ही भाषा उर्दू म्हणून संबोधली जाऊं लागली. हिला ' हिंदुस्थानी ' असेंहि नांव दिलेलें आढळतें. आपल्या हिंदुमुस्लिम पूर्वजांनी संस्कृतप्रचुर व पर्शियन प्रचुर अशी भाषा सोडून आम जनतेला समजेल अशी नवी भाषा निर्माण केली. तिला नांव उर्दू द्यावयाचे की हिंदी? काँग्रेस म्हणते, ' हिंदुस्थानी ' नांव द्या. ही हिंदुस्थानी भाषा सर्वाची होईल. पूर्वजांच्या त्यागानें निर्माण झालेली ही हिंदुस्थानी आपण वाढवूं या. उर्दू ही संस्कृतीशीं संबध्द भाषा आहे. शेंकडो उर्दू शब्द मूळ संस्कृतांतील आहेत. या भाषांचे थोडक्यात मोघम वर्गीकरण करावयाचें झाले तर पुढीलप्रमाणें करतां येईल ----
आर्य एकत्र मध्य आशियाचे बाजूस होते त्यावेळची मूळ भाषा
इराणांतील आर्य शाखेच्या भाषेस पेहेलवी ही संज्ञा मिळाली.
हिंदुस्थानांतील आर्य शाखेच्या भाषेस संस्कृत म्हणूं लागले
या पेहेलवींत अरबी शब्द मिळून पर्शियन झाली संस्कृताच्या प्राकृत व अपभ्रष्ट भाषा होऊन हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, इत्यादी भाषा झाल्या.
हिंदुस्थानी, सबकी बोली, आम जनतेची हिंदी वा उर्दू
अशा रीतीनें हिंदी व उदूर या एकमेकांस परक्या नाहींत. अशी ही बहुजनसमाजाची हिंदुस्थानी भाषा आपण शिकू या. बहुजनसमाजास समजणारी भाषा शिकूं या. रवींन्द्रनाथ म्हणतात, 'देव दिवाणखान्यांत नाही. तो रस्त्यांत काम करणाराजवळ आहे. शेतांत काम करणा-याजवळ आहे. कारखान्यांत, रेल्वेंत काम करणा-याजवळ आहे !'' अशांचें बोलणें आपणांस समजले पाहिजे, अशांना समजेल असें आपण बोललें पाहिजे. ही जी बहुजनसमाजाची वाणी तीच खरी गीर्वाण वाणी, तीच आपली देवभाषा. कारण आपला देव स्वर्गात नाहीं. आपला देव झोपडींत आहे. दरिद्रनारायण हें क्राँगेसचे उपाध्य दैवत आहे. लक्षांत ठेव. सर्वांत सप्रेम प्रणाम.
तुझा
श्याम