पत्र चवदावे 4
''नंदा, आईला मारुं नकोस. अरें जिने जन्म दिला तिला का तूं मारावेंस? पाप रे पाप. असें पुन्हां करुं नकोस. कामाला जात जा. तुझ्या आईला मदत कर. लहान भावंडास सांभाळ. बहिणीस माहेरी आणा. तान्ही बरेंच दिवसांत माहेरीं आली नाहीं. तिला बोलवा. ती तुझी बहीण. तूं मोलमजुरी कर व बहिणीला चोळी-बांगडी कर.''
असा मजकूर तो सांगत होता. त्या दिवशी मला रडूं येत होतें. माझें मन उदास झालें होतें. मायलेंकरांचें प्रेमळ संबंध आपण काव्यांत वाचतों. परंतु या हरिजनाच्या झोपडींत कोठें आहे ते प्रेम? त्या नंदाला आईविषयीं का भक्ति नव्हती? प्रेम नव्हतें? परंतु तें प्रेम दारिद्र्याने गारठून गेलें. त्या मातेला का मुलाविषयीं प्रेम नव्हतें? परंतु कठोरपणें त्याला मोलमजुरीसाठी तिला पाठवावें लागे. आईबापांचें प्रेम, मुलाबाळांचें प्रेम, भावंडाचे प्रेम, स्नहासोबत्यांचें प्रेम या सर्वांचा विकास दारिद्र्यांत नीट होऊं शकत नाहीत. हृदयातील प्रेमळ भावनांचे झरे दारिद्र्यामुळें सुकून जातात. मातृप्रेमाला धन्यतम आनंद, परंतु तो दारिद्रयांत अनुभवतां येत नाही. हे वत्सल व कोमल आनंद हेहि आज वरिष्ठ वर्गांसाठींच उरले आहेत. ज्यांना थोडी फुरसत आहे, त्यांनाच अश्रू ढाळायला सवड आहे. ज्यांना खाण्याची ददात नाहीं, तेच प्रेमळ कोमल भावनांचे आनंद उपभोगतील. त्या भावनांसाठी उचंबळतील, वाचतील, रडतील. परंतु गरिबाला हे आनंदहि वर्ज्य आहेत. त्यांना रडायला तरी कोठें वेळ आहे? आजा-याला कुरवाळित बसायला कोठे वेळ आहे? मृताजवळ बसायला कोठें वेळ आहे ! सा-या भावना दारिद्र्यानें मरतात. आईबापांना मुलांना जवळ घेतां येत नाही. बाप कामाला जातो तेव्हां मुलें झोंपी गेलेलीं असतात. सुटीच्या दिवशीं मुलांना हा आपला बाप असें कळणार ! कोठलें मुलांजवळ प्रेमाचें बोलणें, त्यांना मांडीवर घेणें? कोठलें पत्नीजवळ प्रेमानें बोलणें, तिच्याबरोबर फिरायला जाणें? दारिद्र्यानें सर्व संसाराला कठोर अशी प्रेतकळा येते.
वसंता, दारिद्री जनतेला हें आनंद मिळावे असें तुम्हांस वाटतें ना? आईबापांचे व मुलांबाळांचे प्रेमळ संबंध का फक्त कादंब-यांतून वाचायचे? प्रत्यक्ष संसारांत तसे अनुभव नाही का घेता येणार? येतील. परंतु त्यासाठी क्रान्ति हवी. सारी समाजरचना बदलली पाहिजे. श्रमणा-याची संपत्ति हा नैतिक कायदा स्थापला गेला पाहिजे. नवीं नीतिमूल्यें आलीं पाहिजेंत. श्रमणा-याला प्रथम मान, प्रथम स्थान. दुस-यांच्या श्रमांवर पुष्ट होणार म्हणजे शेणगोळा वाटला पाहिजे. तो तुच्छ वाटला पाहिजे. हें सारें करण्यासाठीं कलांनीं कंबर बांधली पाहिजे. कलेनें आतां क्रान्ति आणवी तरच जीवनांत खरी कला येईल. आणि जीवनांत क्रान्ति होऊन जीवन आनंदमय होऊ लागलें कीं कल पहा कशा बहरतील? कोटयवधि लोकांच्या अंगांत का निरनिराळया कला नाहींत? त्यांना का संगीत आवडत नसेल, चित्र काढावें असें वाटत नसेल, गोष्ट लिहावी अशी स्फूर्ति येत नसेल? परंतु त्यांच्या कला-कोकिळेच्या गळा दारिद्र्यानें पिरगाळून टाकला आहे. ना निघत आवाज, ना उठत तान. परंतु ही परिस्थिति जर बदलली तर किती सुंदर आहे. खरी लोक-कला मग जन्मेल. आम जनतेची कला. आजची कला मूठभर प्रतिष्ठितांची आह. आजच्या कलानिर्मितींत सर्व जनता थोडींच भाग घेत आहे?
मागें रत्नागिरीला साहित्य संमेलन झालेलें तूं ऐकले असशील. तेथें जी साहित्यप्रेमी मंडळी जमली, तिने काय केलें, काय पाहिलें, काय ऐकलें? रत्नागिरीचे सुंदर कलमी आंबे म्हणे मंडळींनीं भरपूर खाल्ले. त्या रसाळ आपुसच्या आंब्यांची त्यांनीं वाहवा केली. परंतु ज्या रत्नागिरी जिल्हयांत असे रसाळ आंबे पिकतात, त्या जिल्हयांतील जनतेचें जीवन कसें आहे हें त्यांनीं पाहिलें का? त्या जीवनांत रस आहे कीं नाहीं तें त्यांनीं पाहिलें का? या साहित्यभक्तांनी खेडयांना प्रदक्षिणा घालाव्या. दरिद्रनारायणाची कष्टमूत्रि पहावी. त्याला अन्नवस्त्र आहे का तें पहावें. त्याला सरकार, सावकार, खोत, जमीनदार कसे छळतात तें पहावें. त्याच्या अब्रूचे धिंडवडे बघावे. रत्नागिरीला गेलेले साहित्यिक त्या अत्यन्त दरिद्री जिल्यांत हिंडते तर त्यांच्या कलेला केवढें खाद्या मिळालें असतें ! किती दारिद्रय आहे त्या कोंकणात ! सृष्टिसौंदर्य भरपूर आहे. परंतु तें कोण पाहणार? काजूच्या दिवसांत काजू खाऊन पहा. करवंदांच्या दिवसांत करवंदें खाऊन दिवस न्या. कधी फणसाच्या आठिळयाच खा. कधीं आंब्यांच्या कोयाच भाजून खा. अशा रीतीनें ते लोक जगतात. साहित्यिकांनी जनतेचा हा विकल संसार पाहिला असता तर .... कोंकणातील शेतक-याला नेसूं धोतरहिं नसतें. ही गोष्ट तें पाहते तर ..... कोंकणात सृष्टिसौन्दर्य भरपूर आहे. परंतु पोटाची चिंता आहे, सदैव विवंचना आहे.