पत्र सातवे 4
नागपूरचा एकदां एक बी.ए. च्या वर्गातील विद्यार्थी माझ्याकडे आला व म्हणाला, '' काँग्रेसने इतर देशांत मदत पाठविणें बरें नव्हें. येथले मरणारे लोक कां काँग्रेसला दिसत नाहींत? आपल्या शेजारचा मनुष्य जर संकटात असला तर आपण त्याला गरीब असूनहि मदत नाहीं का देत? आपल्या चतकोरांतही नितकोर भाकर त्याला नाहीं का देत? जग आज जवळ आलें आहे. लांब लांब नाहीं. रेडियो, बिनतारी यंत्रें या सर्वांनीं दुनिया म्हणजे एक घर झालें आहे. अशा या जगांत अलग राहून चालणार नाही. चीनमध्यें चार डॉक्टर काँग्रेसनें पाठविले. ते हिंदुस्थानांत कितीसे पुरले असते? ते चार डाँक्टर पाठवून काँग्रेसनें काय साधले? चिनी हृदय हिंदी हृदयाला जोडलें ! उद्यां स्वतंत्र होणारा हिंदुस्थान चीनच्या बाजूचा राहील, साम्राज्यवादी जपानच्या बाजूचा राहणार नाहीं, हें काँग्रेसनें जगाला जाहीर केलें. चाळीस कोटी चिनी जनतेचें हृदय जोडण्यासाठी काँग्रेसनें जगाला जाहीर केलें. चाळीस कोटी चिनी जनतेचें हृदय जोडण्यासाठी काँग्रेसनें जे चार डॉक्टर पाठविले ते का अनाठायीं गेले? ४० कोटी स्वतंत्र होणा-या चिनी जनतेची सहानुभूति काँग्रेसनें जोंडली. तिची का किंमत नाही?
हिंदुस्थान आज जरी परतंत्र असला तरी तो लौकरच स्वतंत्र होणार यांत शंका नाहीं. एकदा अदविंद घोष कोणी तरी विचारलें, ''तुम्हीं योगसाधना सोडून स्वातंत्र्यासाठी चला ना झगडायला.'' ते म्हणाले, ''हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालेलें मला दिसत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर काय करायचे याचा विचार मी करीत आहे.'' हिंदुस्थानचें स्वातंत्र्य आतां कालावधीचा प्रश्न नाहीं. ४० कोटी लोकांचा स्वतंत्र होणारा हिंदुस्थान उद्यां जगांत कोणाची बाजू घेईल? या स्वतंत्र हिंदुस्थानचें जगात कोणते धोरण राहील? परराष्ट्रीय धोरण कसें राहील? हे प्रश्न एव्हांपासून महत्वाचे होऊं लागले आहेत. जग या प्रश्नांकडें लक्ष देत आहे. काँग्रेसच्या बैठकींतून पास होणारे ठराव दुनियेंतील सर्व देशांतून प्रसिध्द होतात. काँग्रेस लुंगीसुंगी संस्था नाहीं. उद्यांच्या हिंदुस्थानचे परराष्ट्रीय धोरण तीच ठरवील, तींच बनवील, हें जग ओळखतें. आपल्या देशांतील कांही घमेंडनंदन काँग्रसचा उपहास करीत असतील. परंतु अद्याप हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठीं लढणारी साम्राज्यविरोधी संस्था म्हणून एक काँग्रेसच ओळखली जाते. युरोपांतील स्वित्झरलँड वगैरे चिमुकल्या देशांतील वर्तमानपत्रांतूनहि काँग्रेसची हकिगत येत असते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल वगैरेंच्यामुळें काँग्रेस दुनियेला ज्ञात झाली आहे. जवाहरलाल मागें सर्वत्र दौरे करुन आले. युरोपमध्यें ते गेले. ईजिप्तमध्यें गेलें. ते स्पेनमध्यें गेले, चीनमध्यें गेले. काही वर्षापूर्वी ते ब्रह्मदेश, सयाम, जावा वैगरे भागांतहि जाऊन आले. काँग्रेसची प्रतिष्ठा त्यांनीं सर्वत्र वाढविली आहे. ठिकठिकाणी त्यांचा सन्मान झाला. काँग्रेस सर्व जगाला आज माहित आहे.
अशा या काँग्रेसचें उद्याचें धोरण काय राहील? ती साम्राज्यवाद उचलून धरणार नाहीं. स्पेनमध्यें शेतकरी व कामकरी यांनी निवडणुकींत बहुमत मिळविलें. सनदशीर रीतीनें बहुमत मिळविले. गरिबांच्या हिताचे कायदे ते करू लागले परंतु स्पेनमधील सठवाले, सरदार, इनामदार, कारखानदार सारे एक झाले. फ्रँको या हडेलहप्यानें त्यांची बाजू घेतली. स्पेनमध्यें शेतक-यां-कामक-यांचे राज्य झालें तर इटलीला धोका होता. जवळच्या ज्वालाग्रही फ्रान्सला धोका होता. पलीकडे असलेल्या जर्मनीला व इंग्लंडला धोका होता. कारण हीं सारीं भांडवलवालीं राष्ट्रें स्पेनमधील फ्रँकोला इटली व जर्मनी यांनीं मदत केली. फ्रान्समधील क्रातिकारी, स्पेनमधील शेतकरी कामकरी वर्गांस कदाचित् मदत पाठवतील या भीतीनें फ्रान्समधील सरकानें आपली दक्षिण सरहद्य बंद केली ! इंग्लंड नत्त्काश्रु ढाळीत बसले. स्पेनमधील श्रमणा-या जनतेस एका रशियाची फक्त मदत होती. श्रमणा-या दुनियेची बाजू घेणारा रशियाच फक्त. एका हातानें तो दूर स्पेनला व एका हातांनें दूर चीनला मदत देत होता. बाकीचीं साम्राज्यवादी राष्ट्रें काय करीत होती?